तोल जाऊन नाल्यात पडल्याने शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू

    दिनांक :07-Aug-2019
- मोठ्या पुलाची निर्मितीअभावी दुर्दैवी घटना.
अहेरी,
बारावीत शिकत असलेली विद्यार्थिनीचा गावातील नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात घडली आहे. आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बारावीत शिकत असलेली विद्यार्थिनी शेवंता गणपत सातपुते महागाव येथील राजे धर्मराव शाळेत जात असताना आपापल्ली-दीनाचेरपल्ली-सुभाषनगर या मार्गावर असलेल्या नाल्यात वाहून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवंता ही महागाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होती. सकाळी महाविद्यालयात जात असताना आपापल्ली-सुभाषनगर-दिनाचेरपल्लीच्या लगत असलेल्या रपट्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. मृत विद्यार्थीनी आणि तिच्या  दोन मैत्रिणींनी पाण्यातून मार्ग काढून शाळेत जाण्याचे ठरवले असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शेवंताची सायकल पाण्याच्या प्रवाहात अडकली. त्यामुळे सायकल वाचविण्याच्या प्रयत्नात शेवंताही पाण्याच्या प्रवाहात ओढली गेली. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या माधुरी चापले व सिडाम यांनी शेवंताला वाचविण्याच्या प्रयन्त केला. मात्र, हा प्रयन्त पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने निष्पळ ठरला.
 
घाबरलेल्या अवस्थेत मुलींनी पालकांना ह्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मृतक शेवंताचे पालक व गावकरी घटनास्थळी आले. पाण्यात वाहून गेलेल्या शेवंताचा शोध सुरु झाला. त्यात घटनास्थळावरून २ अंतरावर शेवंताचा मृतदेह मुत्तापुर नाल्याजवळ आढळून आला. या घटनेनंतर शाळेसह गावात शोककळा पसरली. घटनेची माहिती अहेरी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
 
 
एकीकडे शासन "बेटी बचाओ बेटी पढाओ"नारा देत आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थीनिसाठी परिवहन महामंडळातर्फे मानव विकास मिशन अंतर्गत निःशुल्क बससेवा चालविली जाते. मात्र ही बससेवा खेड्यापाड्यात रस्त्याभावी पुला अभावी पोहोचू शकत नाही. त्यामुळे पालक आपल्या पाल्ल्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन सायकलने ,पायदळ शाळेत पाठवावे लागते.
 
खराब रस्ते व पूल दुरुस्त व्हावे यासाठी अनेकदा अहेरी चे आमदार व माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांना निवेदन सादर केले होते. वेळीच दखल घेऊन मोठ्या पुलाची निर्मिती झाली असती तर आजची दुदैवी घटना टाळता आली असती. आजच्या घटनेची माहिती होताच लोकप्रतिनिधी मृत मुलीच्या घरी भेट देऊन सात्त्वांना देत असले तरीही वेळीच त्यांनी मोठा पूल बनविण्यासाठी लक्ष घातले असते तर दुदैवी घटना टाळता आली असती त्यामुळे सामान्य नागरीकांनी लोकप्रतिनिधीच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.