श्रावणाचे काही अनवट संदर्भ...

    दिनांक :07-Aug-2019
यथार्थ  
श्याम पेठकर  
 
अगदी सहजपणे ऋतू आपले अंतरंग पालटून घेतात. ऋतू तोच असतो, मात्र संदर्भ थोडे बदलतात. हे अलवार बदलणारे संदर्भ जाणिवेच्या पातळीवर प्रकट होण्यासाठी मन तितकंच हळुवार करावं लागतं. ऋतूंचे बदलते रंग अगदी सहजपणे टिपता यायला हवेत. आषाढ संपत आला की, पिवळ्या चोचीच्या जांभळ्या मैना अंगणात येतात. त्या डौलदार असतातच. त्यामुळे नादमयसुद्धा असतात. एव्हाना परसदार फुलारलं असतं. जाई ऐन संध्याकाळी आपल्याच सुगंधात न्हायलेली असते. काट्यांच्या नाकावर टिच्चून गुलाबाला कळ्या आलेल्या असतात. तगराला पांढर्‍या चांदण्यांनी वेढा घातला असतो. निशिगंध, बटमोगराही चांगलेच तरारले असतात. झाडांच्या पावलाशी पावसाचे पाणी साचलेले असते. पिवळ्या चोचीच्या जांभळ्या ‘श्रावणी मैना’ बटमोगरा आणि निशिगंधाच्या पावलाशी साचलेल्या इवल्याशा तळ्यात आंघोळ करतात, तेव्हा श्रावण आला असे समजावे.
या डौलदार आणि नादमय मैना गवतफुलांशी लडिवाळ खेळ मांडतात. त्या अंगणात रिंगणच धरतात. या मैना अंगणातून तुरुतुरु चालायला लागल्या की, गुलाबाच्या अंगावर बारीक काटा येतो. शेपट्यांवर थांबलेले पाणी उडविण्यासाठी शेपट्यांची मजेदार हालचाल करीत त्या फिरत राहतात. अशा दिवसात या मैना, उडण्यापेक्षा जमिनीवर लगीनघाई सुटल्यागत फिरत का राहतात, असा प्रश्न सहजच पडावा. कदाचित पायात पाण्याचे चाळ बांधून उडता येत नसावे किंवा मग गवतफुलांशी खेळताना गळ्यात गाणे पेरता येत असावे. आभाळात कदाचित या दिवसात मिटल्या चोचींनीच फिरावे लागत असावे. अंगणात वाढलेल्या गवतातून त्या मैना चालायला लागल्या की छुनुक... छुनुक... छुन... असा पैजणांचा आवाज येत असला पाहिजे. मात्र तो आवाज, ती प्रणयधून ऐकू यायला प्राणांचे कान आणि मनाचा कोन करता आला पाहिजे.
 
 
 
श्रावण आला की अंगण सजीव होतं. थुईथुई नाचू लागतं. कुंपणावरील कामुन्यांच्या उर्मट झुडुपांनादेखील फुलं आलेली असतात. पाखरांसोबत उन्हंही खेळगडी होतात. त्यासाठी ते पावसाशी सलगी करतात. मैना येतात. त्यापाठोपाठ हळूच काही चिमण्या येतात. त्या उगाच स्वच्छतेबाबत जादाच जागरूक असतात. पंखावर नसलेली धूळ तुळशीच्या वृंदावनात साचलेल्या पाण्यात बसून साफ करतात. मैनांची आणि या चिमण्यांची मैत्री असते. त्यांची मैत्री परसदारी असलेल्या गाईच्या गोठ्यासमोर झालेली असते. सांजेला गाय रानातून येण्याआधी अवसरलेल्या वासराला चिवचिव करून या चिमण्या खेळवीत असतात. मैनांना ते आवडते म्हणून कदाचित ही मैत्री असावी. आभाळाइतकीच माया जमिनीवरही दाटलेली असते. हे बघून मैना मग जास्तीत जास्त जमिनीवरच राहू लागल्या असाव्यात. मैना आणि चिमण्यांच्या मैत्रीला असे वेगळे संदर्भ आहेत. पण, अंगणात त्या स्वच्छंद असल्या तरीही निर्भय नाहीत. चिमण्या आणि मैनांचा खेळ रंगात आला असतानाच कावळे येतात. घराच्या कुंपणावर बसून गरगर डोळा फिरवीत उगीच कावकाव करतात. ओसरीत बसलेल्या भालू कुत्र्याच्या हे सवयीचं झालं आहे. कावळ्यांची कावेबाज कावकाव ऐकून तो कान टवकारत गुरकावतो. चिमण्या आणि मैनांना आधार देतो. कावळ्यांच्या अंगावर धावून जातो. नेमका त्याच वेळी भर उन्हात पाऊस येतो.
 
हळद-कुंकवाचा करंडा घेऊन शंकराला शिवमूठ वाहायला निघालेली, कळसाचं पाणी पडल्यानं तजेेलदार झालेल्या नव्या सासुरवाशिणीला रस्त्यातच पाऊस गाठतो. कुंकवाच्या करंड्यावर हिरव्या शालूचा जरीदार पदर झाकत गोंधळलेली ती स्वस्तिकाच्या झाडाखाली आश्रय घेते. स्वस्तिकाच्या पानावरील थेंब तिच्या अंगभर होतात. एक पांढरे फूल नेमके तिच्या गालावर स्वस्तिक काढते. किडा-किटकुल समजून ती गालावरचे ते स्वस्तिकाचे फूल झटकायला जाते आणि तिच्या केसांतील जाईचा गजरा सुगंध उधळून टाकतो. जांभळ्या मैना मग चेकाळतात. अंगणभर फेर धरायला लागतात. गोरेटली सासुरवाशीण अधिकच बावरते. मैनांना चुकवीत लगबग निघण्याच्या गडबडीत तिच्या हातातील करंडा खाली पडतो. हिरव्या गवतावर हळद-कुंकू पसरते. अपशकुन झाला, आता काय करावे, असे म्हणत ती गाभुळली सासुरवाशीण जांभळ्या मैनेसारखीच सैरभैर होते. अपशकुनावर तोड विचारायला नाना बामनाच्या घराकडे चालू लागते. अचानक लाभलेले सौभाग्य उजागर करीत हिरवळ आपली उगाच मुरडत असते.
 
नाचर्‍या मैनांसारखे सणही या दिवसांत उत्साही झालेले असतात. त्यामुळे दिवस डौलदार आणि रात्री नादमय होतात. वार्‍याने ढग हलले तरीही टचटचल्या ढगांमधून पाण्याचे थेंब टपटपतात. पारिजातकाची फुलं पडावीत तसा पाऊस हलकेच पडतो. वार्‍यानेही पावसाचे थेेंब दूर जाऊन पडतात. टपटपताना फुलभाराने वाकलेली गवताची पातीदेखील लवलवू नये याची काळजी तो घेतो. या दिवसात पाऊस भलताच हळवा झाला असतो. हलकेच येतो आणि अधूनमधून डोकावतो. आभाळ जरा झाकोळून येते.
बांगडीवाला झकीरचाचा पाटलाच्या दरवाजासमोर थांबतो. ‘बांगडीवालाऽऽऽ...’ अशी हाळी मात्र देत नाही. डोईवरील सौभाग्यकंकणांच्या भाराने झकीरचाचाची चाल डौलदार झालेली. पावसाची चाहूल लागल्याने तो लकसपकस निघतो. पण, वाड्याजवळ मात्र डोईवरील बांगड्यांच्या किणकिणाटालाही घरंदाज अदब येते. आताशा वाडाही आभाळासारखा झाकोळला आहे. चिरेबंदी वाड्याच्या फटीत रातकिड्यांनी घरे केली आहेत. वरच्या बुरुजाच्या भिंतीवर या हिरव्या शेवाळावरून सरडे रंग बदलविण्यासोबतच सरपटण्याचाही खेळ करायला लागले आहेत. पण, जुन्या जाणत्या झकीरचाचाने ती अदब पाहिली आहे. ती अदब अजूनही राखली आहे. म्हणून तो वाड्याजवळून जाताना दिंडी दरवाजापाशी थबकतो. ओरडत मात्र नाही. वाड्यातला जुना गडी हातात पितळी गुंड घेऊन बाहेर पडत असतो. झकीरचाचाला बघून परत आत वळतो. बांगडीवाला आल्याची आत वर्दी देतो आणि परत निघताना गुंडासोबत तांब्याची एक कळशीसुद्धा घेऊन येतो. पलीकडच्या बोळीतून सावकाराच्या घराकडे चालू लागतो. उदास मैना रंग उडालेल्या छकड्यावर बसून असतात. गतवैभवाची तुर्रेबाज नथ चोचीत धरून जुन्या मैनांनी कुठे टाकली असावी, असा प्रश्न त्यांना पडतो. तरीही पाऊस पडत नाही. पाऊस पडून गेला की सारेच कसे निरभ्र, स्वच्छ होते. पण, मैना उदास झाल्या म्हणून श्रावणातला पाऊस पडत नाही. तो त्याच्या लहरीनुसार पडतो. डौलदार मैना मग चौसोपी वाड्यातील चौकोनी अंगणात मधोमध असलेल्या तुळशीवृंदावनापुढे बसून राहते. तुळसही श्रावणी झालेली. हिरवाईवर सावळ्याची लव चढू लागलेली. मग सावळा येईल, आपल्याला चोरून नेईल, म्हणून ती शहारत असते. पण, पाऊस मात्र पडत नाही. श्रावणात पाऊस काळ्या आभाळातून पडतच नाही. तो सोनमुशीतून बाहेर पडणार्‍या सप्तरंगी सूर्यकिरणांमधूनच जमिनीवर पडतो. पावसाची वाट बघून दुपार केविलवाणी होते. वाड्याची सावली ओशटवाणी होते. वृंदावन झाकोळून टाकते. झकीरचाचा मुंजाच्या पिंपळाखाली शिदोरी सोडतो. भाकरीच्या चतकोराचे चार तुकडे करून चार दिशांना टाकतो. गावचे सारेच जुने संदर्भ झकीरचाचाच्या डोक्यात सरींसारखे धावून येतात. गावाला सौभाग्याचं स्वप्न दाखवीत झकीरचाचाची हयात गेलेली. बामणाच्या पोरानं याच झाडावर फाशी घेतल्याची गोष्ट चाचाला आठवते. तो शहारतो. दचकतो. त्याला ठसका लागतो आणि एकाएकी आभाळाचा एक डोळा उघडतो. त्यातून सूर्याचे बुबुळ बाहेर दिसू लागते. विश्वाच्या त्या डोळ्यातून श्रावणातली सांज गावातल्या कौलांवर पसरते. भुकेचा धूर हळूहळू गावाच्या प्रत्येक कौलघरातून बाहेर येतो. संध्याकाळी सोमवार सोडायचा असतो. पुन्हा एकदा लहान सर धावून येते. आभाळ आता मोकळे होते. शेतातून निघालेल्या परतीच्या पाऊलवाटांना आणि चकोल्यांना जीव फुटतो. किणकिणणार्‍या घुंगरमाळांनी वाट, अभंगी ठेक्यात गोर्‍या कुंभारागत नाचू लागते. हा आवाज घरात बसून ऐकण्यासाठीही मनाचे कान आणि प्राणाचा कोन करावा लागतो. असा कोन साधला की, भाकरी थापणारे स्वयंपाकघरातील उजागर सौभाग्य मग भाकरीच्या कपाळावर आपल्या धन्याचे नाव हाताच्या रेषांनी उमटवू लागते. सांज भुकेली होत घरात शिरते. सुना गोठा आणि वाटुली पाहून अवसरला उंबरठा बागडायला लागतो. बांडा बैल दारातून आत शिरताना उगाच धसमुसळेपणा करतो. धन्याचा धसमुसळेपणा आठवून ती आतल्या आत हसते आणि श्रावणातली संध्याकाळ कातर होऊन तिच्या डोळ्यांतून अंगणात उतरते. पिवळ्या चोचीच्या जांभळ्या मैना डौलदारपणे उडून जातात. तुळशीपाशी दिवा लावायला जाताना सावळ्या साळुंकीचे पैंजण मात्र नादमय होतात...