सापडली दुर्मिळ प्रजातीची घोरपड; युवकांनी सुरक्षित सोडले जंगलात

    दिनांक :08-Aug-2019
 

 
धारणी,
गुजरातच्या वडोदरा शहरात नदीच्या पुरातून एका मगरीने शहरात प्रवेश केल्याची घटना सोशल मिडीयावर जगभर ट्रेंड करत होती. आता मात्र आमच्या मेळघाटातील कावरा नावाच्या तलावातून एका घोरपडने जवळच्या गावात प्रवेश केल्यावर एकच दहशत पसरलेली होती. मात्र आदिवासी युवकांनी या बिनविषारी दुर्मिळ प्राण्याची ओळख पटवून तिला सुरक्षितरित्या जंगलात सोडले. अनेक वन्यप्राण्यांचे मोहरघर असलेल्या मेळघाटात ‘मॉनिटर लिजर्ड’ नावाची मोठी घोरपड सापडल्याने प्राणी संपदेत वाढत झालेली आहे.
 
धारणीपासून 18 किमी अंतरावरील कावरा तलावात पाणी भरुन ओव्हर फ्लो झालेले आहे. पुराच्या पाण्यातून वाहता-वाहता एक चार फुट लांबीची घोरपड जवळच्या गावात आली. घोरपड गावातील गल्लीतून मजेत फिरत असल्याचे पाहून महिला तथा बालके घाबरली. एका युवकाने मगरी सारखी दिसणारी ही घोरपड असून ही विषारी नसल्याचे ओळखले. तोपर्यंत इतर लोक ह्याला मगरमच्छ समजत होते. युवकांनी तिला पकडून एका बांबूवर बांधून जवळच्या जंगलात सोडले, तेव्हा दहशत कमी झाली.
 
 
 
शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी या प्रजातीची घोरपड आपल्या सोबत ठेवायचे आणि वेळ पडल्यास किल्ल्याच्या उच्च भिंतीवर फेकून त्याच्या मदतीने आक्रमणासाठी चढायचे. ही घोरपड पाल प्रमाणे भिंतीवर घट्ट चिपकून असते. या मॉनीटर लिजर्डस्च्या पाठीवर डिझाईन असते तर तिचे हात नोकदार असतात. सापासारखी फुंकरणार्‍या जिभेमुळे ही मोठी घोरपड विषारी वाटते. घोरपडीच्या अवयवाद्वारे विविध औषधी बनतात, असा गैरसमज असल्याने शिकारी अशा दुर्मिळ घोरपडी मारुन टाकतात. यामुळे मॉनिटर जिजर्डस् ह्या संकटग्रस्त जनावरांच्या सूचित मोजल्या जात आहे. मेळघाटात रंगीत वटवाघुड (पेंटेड बॅट) सापडल्यानंतर या दुर्मिळ घोरपडीचे अस्तित्व सापडल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेले आहेत.