पावसामुळे अमरावतीतल्या शाळांना उद्या सुट्टी

    दिनांक :08-Aug-2019
अमरावती,
अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या सार्वत्रिक पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पाऊस कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उद्या शुक्रवारी (9 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसा संदेश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना रात्री प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. 
 
 
धारणी येथील मांडवा येथे वीजेचे खांब कोसळले असून, त्यामुळे धारणी शहर व परिसरात वीजपुरवठा बंद आहे. पाऊस थांबताच तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. धारणी तालुक्यात सिपना व गङगा नदीला पूर आल्यामुळे बैरागड पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक, माध्यमिक शासकीय व संस्थांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महसूल प्रशासनाव्दारे आपत्ती व्यवस्थापन पथक व नियंत्रण कक्ष 24 तास सुसज्ज आहे. शहानूर व चंद्रभागा धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने दोन्ही धरणांचे दोन दरवाजे पाच सेंमीने उघडण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सुसज्ज असून तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.