मेळघाट पुराच्या विळख्यात, सर्व नद्या 'ओव्हर फ्लो'

    दिनांक :08-Aug-2019
 
अमरावती/धारणी,
धारणी तालुक्यातील कावरा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने जवळच्या गावांना धोक्याचा इशारा तहसिलदार सचिन खाडे यांनी दिलेला आहे. जवळपास सर्वच नद्यांना पूर आले आहे. जिल्ह्यात गेल्या 20 तासापासून अखंड पाऊस सुरू असला तरी मेळघाट वगळता इतरत्र धोक्याची स्थिती नाही. 

 
 
मागील वर्षाच्या 8 ऑगस्टपर्यंत धारणी तालुक्यात 467.5 मि.मी. पाऊस झालेला होता. यावर्षी मात्र 786.02 झाल्याने तुलनात्मक दृष्ट्या यावेळी 59.41 टक्के पाऊस जास्त झालेला आहे. गेल्या 24 तासात धारणी तालुक्यातील हरिसाल, सावलीखेडा, धुळघाट रोड आणि धारणी राजस्व भागात सरासरी 125.5 मि.मी. पाऊस झाला. आता यावर्षीचा एकूण पाऊस 786.2 झालेला असून सर्व नदी नाले क्षमतेपेक्षा जास्त व रोजाने वाहत आहे तर शेतातील विहिरींना झरा फुटलेला आहे.
धारणीचे तहसीलदार सचिन खाडे यांनी कावरा तलावाजवळच्या खिडकी, कासमार, रबांग, धोदरा, कवडाझिरी, सावर्‍या गावांना सूचना देऊन धोक्याची आशंका व्यक्त केलेली आहे. या शिवाय सिपना नदीच्या काठावरील हरिसाल, दुनी, दिया, उतावली, हरदोली ह्या गावांना पण पुराची अग्रीम सूचना दिलेली आहे. धारणी तालुक्यातील तापी, सिपना, गडगा, मधवा, खंडू, खापरा आणि इतर सर्व तापीच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहे. सर्वात मोठा कावरा डॅम ओव्हर फ्लो झाल्याने त्याला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. कावरा तलावातून पाण्याची झालर पडतांना पाहण्यासाठी धारणीतून अनेक लोक विरंगुळा म्हणून धोदरा पोहचत आहेत. 

 
 
बैरागडचा धबधबा करुन सडकेवर कोसळत असल्याने हा नजारा डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटक लालायीत होतांना दिसत आहेत. तहसीलदार खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खारी, मांडवा, रबांग, लवादा, जुटपाणी, नांदुरी, गंभेरी, गवलानडोह सर्व तलाव शंभर टक्के भरल्याने त्यांच्या जवळच्या नद्या, नाल्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. म्हणून सावधगिरीचा इशारा करण्यात आलेला आहे.
 
दिया शिवारातील सिपना नदीवरील पुलाला लागून पूर जात असल्याने तात्पुरत्या स्वरुपात बैरागड जिल्हामार्ग 3 बंद करण्यात आलेला आहे. हा रस्ता बंद पडल्याने 25 गावाचा मोठ्या वाहनाने संपर्क खंडीत झालेला आहे. मागील 24 तासापासून जोरदार अतिवृष्टी झाल्यावरही वीज पुरवठा मात्र सुरळीत सुरु असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
 
जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये गेल्या 20 तासापासून कधी जोरदार तर कधी रिमझीम असा अखंड पाऊस सुरू आहे. कुठेही अप्रिय घटनेचे वृत्त दुपार पर्यंत प्राप्त झाले नव्हते. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8 वाजता झालेल्या 24 तासात 32 मिमी पाऊस झाला असून पावसाने अपेक्षित पाऊसमानाची सरासरी ओलांडली आहे. आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 58.8 टक्के पाऊस झाला आहे.