पाऊस चहा आणि प्रेम

    दिनांक :08-Aug-2019
नितीश गाडगे  
दुपारपासूनच रोहनचे मन ऑफिसच्या कामात लागत नव्हते. सारखं सारखं मनगटावरचं घड्याळ पाहत पाच कधी वाजतात, याची तो वाट पाहत होता. अखेर दिवसभराचा वर्क रिपोर्ट त्याने आपल्या बॉसला ई-मेल केला आणि कॉम्प्युटर शट डाऊन करून तो ऑफिसमधून बाहेर पडला. बाहेर आभाळ दाटून आले होते. कुठल्याही क्षणी पाऊस बरसेल, असे ते वातावरण! तो गाडीत बसला आणि घराच्या दिशेने निघाला. गाडीतला एफएम सुरू होता. रोहन आपल्याच विचारात मग्न होऊन गाडी चालवत होता, आणि एफएमवर ‘मेरा सया’ सिनेमातले ‘तू जहॉं जहॉं चलेगा ... मेरा साया साथ होगा....’ हे गाणं सुरू होतं. 
 
 
एफएमवर सुरू असलेलं गाणं आणि बाहेर पावसाचं बनलेलं आल्हाददायक वातावरण हे दोन्ही जणू एकमत करून रोहनला त्याच्या मनात सुरू असलेल्या कुणाच्या तरी आठवणीत रमण्यासाठी प्रोत्साहितच करत होते की काय, कुणास ठाऊक! रस्त्याने फारसे ट्राफिक नसल्याने तो अर्ध्या तासातच घरी पोहोचला. हातपाय धुऊन फ्रेश झाल्यावर रोहनला आलं घातलेला गरमागरम चहा लागतो. रोहन घरी आल्यावर त्याची आई त्याला न विचारताच त्याच्यासाठी चहा ठेवते. त्यातल्या त्यात आज तर वातावरण काही औरच होते. त्यामुळे तो चहाची आतुरतेने वाट पाहत होता. तेवढ्यात त्याची आई चहा घेऊन त्याच्या रूममध्ये आली. ‘‘काय मग, कसा गेला दिवस ?’’ हा रोजचाच प्रश्न तिने रोहन समोर टाकला आणि रोहननेसुद्धा ‘‘बरा गेला!’’ हे त्याचे नेहमीचे उत्तर पुढे सरकाविले. आईने चहाचा कप रोहनच्या हातात दिला आणि तिथून निघून गेली.
 
एव्हाना बाहेर पाऊस सुरू झाला होता. वातावरणातला तो गारवा, धो धो बरसणारा पाऊस आणि आलं घातलेला गरमागरम चहा हे फक्त रोहनलाच नाही तर मानसीला सुद्धा फार आवडते. मानसी रोहनची प्रेयसी ! त्यांच्या प्रेमाला गेल्या दोन महिन्यांपासून स्वल्प विराम लागलेला आहे. चार वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, पण शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे दोघांचाही अहंकार दुखावल्या गेला आणि दोन महिन्यांपासून हा अबोला संपविण्यासाठी दोघांपैकी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. त्यादिवशी रोहनला मात्र मानसीची फार आठवण येत होती. पावसाळ्याच्या दिवसात धो धो पाऊस पडत असताना ते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी त्यांचा स्पेशल आलं घातलेला चहा प्यायला हमखास जायचे. या सगळ्या आठवणींची उजळणी होत असताना रोहन मात्र मानसीच्या आठवणीने बैचैन होऊ लागला होता.
 
 
व्हॉट्‌स ॲपवरचा मानसीचा डीपी पाहण्यासाठी त्याने मोबाईल हातात घेतला, तिचा डीपी पाहता पाहता चुकून त्याच्या हातून तिला व्हॉट्स ॲप कॉल लागला. फोन लागताच त्याने तो कट केला. तो काही विचार करेल त्या आधीच मानसीने त्याला परत फोन केला. मानसीचा फोन त्याने क्षणाचाही विलंब न करता उचलला. ‘‘काय ! चुकून फोन लागला वाटतंय्‌ ?’’ मानसीने रोहनला टोमणा मारला. पण रोहनने तो तिच्या आठवणीत किती बेचैन झाला आहे, हे सरळ कबूल करून टाकले. मानसीनेही जुन्या गोष्टी न ताणता त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी स्पेशल चहा पिण्यासाठी बोलावले. क्षणाचाही विलंब न करता रोहन त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला. मानसी तिथे आधीच पोहोचली होती. आकाशी रंगाचा सलवार सूट, मोकळे सोडलेले केस आणि आणि लाजल्यावर तिच्या गालात पडणारी खळी पाहून रोहन परत एकदा मानसीच्या प्रेमात पडला. मानसी रोहनच्या गाडीत येऊन बसली. बाहेर पाऊस सुरू असल्याने चहावाला भय्याने त्यांचा स्पेशल चहा त्यांना गाडीतच आणून दिला. दोन महिन्यांच्या विरहानंतर भेटल्यावर नेमके काय बोलावे, हे दोघांनाही कळत नव्हते मात्र चहाचा घोट घेत नजरेतूनच त्यांनी आपला अबोला सोडविला.