निखळला तरीही अढळ तारा...!

    दिनांक :08-Aug-2019
 
खरंच मनस्ताप होतो कधीकधी. नियतीचे विचित्र वागणे बघून त्रागा होतो. तिची करडी नजर सारखी देवमाणसांवर असावी, हेदेखील मनाला पटत नाही. आकाशाला गवसणी घालण्यासाठीच जन्माला आल्यागत सारा सभोवताल आपल्या मनमिळावू स्वभावानं कह्यात घेणारी, मनामनावर अधिराज्य गाजवणारी माणसं पदरी पाडून घेण्यासाठी चाललेली नियतीची धडपड चीड आणणारीच खरंतर! भारतीय राजकीय पटलावर स्वत:च्या कर्तृत्वातून टाकलेली अमिट छाप, गेली कित्येक दशकं आपल्या अमोघ वाणीतून, ज्ञान, चारित्र्यातून, शालीन वर्तनातून, ओजस्वी वक्तृत्वातून सिद्ध करत जपणारे ‘सुषमा स्वराज’ हे नाव स्मृतिशेष झाल्याची बातमी, नियतीबाबतची ही भावना अधिक दृढ करणारी. ज्यांनी त्याग, बलिदान, समर्पण आणि साधनेतून भारतीय जनता पक्षासारख्या एका राजकीय संघटनेच्या बांधणीची बीजं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, दृढ संकल्पातून पेरलीत, भविष्यात त्याचा वटवृक्ष साकारला, त्या पिढीतील एक प्रतिनिधी, सुषमा स्वराज यांच्या रूपात आज स्मृतिशेष झाला आहे. 

 
 
भविष्यात कधीकाळी सत्ता हातात येईल, ही बाब स्वप्नवत वाटावे असेे ते दिवस. राज्या-राज्यातील विधानसभा असोत वा मग संसद, विरोधी बाकांवर बसणे हेच प्राक्तन होते. पण, तरीही संघर्षाचा बिंदू कधी हातून निसटला नाही कुणाच्याच. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यांवर उतरून उभारलेला लढा असो, की मग संसदेच्या दोन्ही सभागृहांत नियम, कायद्यांवर बोट ठेवून चालवलेली लढाई... तोच लढाऊ बाणा, तोच निर्धार, तीच जिद्द, सरकारला तुकविण्याची तीच ताकद... त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे एक नाव हमखास सुषमाजींचे असायचे. गोड, हसरा चेहरा. सालस, लोभसवाणे व्यक्तिमत्त्व.हिंदी, इंग्रजी, संस्कृतसह अन्य विविध भाषांवरचे कमालीचे प्रभुत्व, मुद्यांच्या प्रभावी मांडणीची त्यांची स्वतंत्र आणि तेवढीच प्रभावी अशी शैली. वर्तणुकीतील शालीनता तर जनामनावर हुकुमत गाजवणारी. ती बघून कार्यकर्ते त्यांच्या प्रेमात न पडले तरच नवल! त्या जातील तिथं सभोवताल जमणारा चाहत्यांचा गराडा, त्याचीच साक्ष ठरायचा.
 
जवळपास एक दशकापूर्वीचा प्रसंग. मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांसाठी एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा जेमतेम सहा-सात राज्यांत भाजपा सत्तेत होती. दिल्लीसहित उर्वरित सर्व ठिकाणी विरोधी बाकांवर बसून आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी तो पक्ष पार पाडीत होता. सुषमा स्वराज लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. विरोधी पक्ष म्हणून आपल्या जबाबदार्‍या कशा पार पाडायच्या यासोबतच जिथे सत्ता आहे, तिथे विरोधकांशी कसं सौजन्यानं वागलं पाहिजे, याचे धडे कार्यकर्त्यांना देण्यासाठी, त्या शिबिरातील एका सत्रात वक्ता म्हणून त्या उपस्थित झाल्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या ते सत्र एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी होतं. पण, सुषमाजींनी तर सार्वजनिक जीवनात माणसानं माणूस म्हणून कसं जगलं, वागलं पाहिजे, याचा वस्तुपाठ आपल्या भाषणातून मांडला होता. सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. इथे तर सत्ता हाती येताच माज चढतो लोकांना. अशा स्थितीत वास्तवाचेे भान राखत, माणुसकीचा परिचय देत आपली वर्तणूक सौजन्यपूर्ण कशी राखायची, याची शिकवण सुषमाजी त्यांच्या मांडणीतून देत होत्या. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हुरळून जावे अन्‌ जराशा सत्तेने हवेत तरंगायला लागलेल्यांनी ताडकन्‌ जमिनीवर यावे, असा प्रभाव होता सुषमाजींच्या ओजस्वी वाणीतून बहरलेल्या शब्दांचा.
 
तो केवळ भाषणातून दिलेला कोरडा उपदेश नव्हता. व्यक्तिगत जीवनात त्यांनी स्वत:देखील ही मूल्ये जोपासली होती. हमीद अन्सारी नामक युवकाला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडवण्यासाठीचे प्रयत्न असोत, की युनोच्या आंतरराष्ट्रीय मंचावरून भारताची बाजू मजबूतपणे मांडणे असो, प्रयत्नांची पराकाष्ठा सार्‍या जगाने दखल घ्यावी अशीच. एरवी परराष्ट्र मंत्रालय, सर्वसामान्यांच्या आकलन आणि आवाक्यापलीकडचे. पण, सुषमा स्वराज यांनी ते सर्वसामान्यांच्या कक्षेत आणून सोडले. कुणीही अर्ध्या रात्री ट्विटरवरून त्यांच्याशी संपर्क साधावा आणि परराष्ट्रमंत्र्यांनी गंभीर दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करावी, इतका सहज झाला होता, गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांशी संपर्क.
 
अपहरण झालेल्यांना, मुत्सद्देगिरीचा वापर करून सहीसलामत परत आणण्याचा मुद्दा असो, की संसदेत 370 कलम रद्दबातल ठरविण्याचा प्रस्ताव मंजूर होताच, गंभीर आजारपणातही, डोळ्यांत तरळणार्‍या अश्रूंच्या माध्यमातून आनंद व्यक्त करणे असो, सुषमाजी विलक्षण, अद्भुत असे व्यक्तिमत्त्व होते, हे सांगायला याहून वेगळ्या उदाहरणांची गरज पडू नये! विद्यार्थिदशेतच सामाजिक चळवळीचा एक भाग झालेल्या सुषमा स्वराज, वयाच्या अवघ्या पंचविशीत राजकारणात आल्या. हरयाणा प्रांतात आमदार झाल्या. मंत्री झाल्या. नंतरच्या काळातील राष्ट्रीय राजकारणातील त्यांचा प्रवेश, उज्ज्वल भविष्याची साक्ष देणारा ठरला. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळण्याचा विषय असो, की पक्षाने आदेश दिला म्हणून, पराभव स्पष्ट दिसत असतानाही दूरस्थ, अनोळखी बेल्लारीतून सोनिया गांधींच्या विरोधात निवडणूक लढवून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावण्याचा, पक्षनिष्ठेला सर्वोपरी मानण्याचा पायंडा त्यांनी कायम कार्यकर्त्यांसमोर ठेवला.
 
राजकारणापासून तर धर्मकारणापर्यंत अन्‌ समाजकारणापासून तर महिलाजगतापर्यंत... मंचावर धर्माचार्य बसले असतील तर तसं, तिथे कलावंत बसले असतील तर तसं. मंच साहित्याला वाहिलेला असेल तर त्यांच्या तळपत्या शब्दांची धार साहित्यप्रतिभेनं बहरायची, तिथे शंकराचार्य विराजमान असतील, तर धार्मिक अंगाने ज्ञान आणि प्रतिभासंपन्नतेची झालर तिथे व्यक्त झालेल्या त्यांच्या विचारांना आकार द्यायची. तेच संसदेत, तेच विद्यार्थ्यांसमोर, तेच महिलांसमोर. तर्कसंगत विचार प्रभावीपणे मांडण्याची तर्‍हा म्हणूनच लोकप्रियही ठरली. राजकारणात इतकी वर्षे घालवताना सहकार्‍यांसमवेत मतभेदांचे प्रसंग उद्भवलेच नाहीत असे नाही. आयुष्यभर लक्षात राहतील असे राग-लोभाचे क्षणही गाठीशी बांधले गेले कधीतरी. पण, म्हणून भावनिक ओलाव्याला व्यवहारी कोरडेपणाची बाधा होऊ दिली नाही त्यांनी कधी.
 
मृत्युपश्चात, पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यदर्शन घेणार्‍यांची रीघ बघितली, कधी थेट संबंध आला नाही, अशा लोकांच्या ओथंबलेल्या भावनांचा कल्लोळ बघितला की, या माउलीच्या प्रेमात ओलेचिंब भिजलेल्या अलोट गर्दीची कल्पना यावी. कुणाच्या डोक्यावर मायेनं हात ठेवणारी बहीण, राष्ट्र सेविका समितीचा कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या जुन्या सहकार्‍यांना प्रेमाने आलिंगन देणारी जीवलग मैत्रीण... सारंच हरवून बसलंय्‌ आज. सारा गोतावळा मागे टाकून ही माउली स्वर्गस्थ झालीय्‌. घळाघळा गळणारे अश्रू असोत की दाटून आलेले हुंदके, आवरण्यापलीकडच्या भावना असोत की मग जीवनात त्यांचा अनुनय करीत आयुष्य घडविण्याचा संकल्प, त्या सर्वांतून प्रतििंबबित होतात त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या धनी राहिलेल्या सुषमा स्वराज! जीवनाच्या सारिपाटावरील सर्वच टप्प्यांवर निकरानं लढलेल्या सुषमाजींनी, नियतीने मांडलेल्या डावातही शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. सत्तेच्या राजकारणातून स्वत:हून स्वत:ला बाजूला केले. आजारपणाशी झुंजतानाही चेहर्‍यावरचे हसू, लोकांशी वागतानाची अदब कधी ढळू दिली नाही. बहुधा म्हणूनच यात्रा संपली, तरी इहलोकीच्या इतिहासात त्या अजरामर असणार आहेत. लौकिकदृष्ट्या निखळला तरीही तो तारा वास्तवात अढळ असणार आहे...!