मोदी आबा, हे असं का?

    दिनांक :08-Aug-2019
भक्ती जोशी
9588453736
 
हो! मोदी आबाचं, कारण माझे आबा पण तुमच्याच वयाचे आहेत. माझे आबा मला लहानपणापासून नेहमी म्हणत असायचे- ‘‘खूप अभ्यास कर, मोठी हो आणि माझ्यासारखी शिक्षक हो!’’माझ्या आजोबांना मला कुठेतरी प्राध्यापक म्हणून बघण्याची इच्छा होती आणि मी ती पूर्ण करेल, असा त्यांना मी विश्वास दिला होता. 
 
 
मला असे वाटते, मी उगाच त्यांना विश्वास दाखविला. मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. कारण हे सध्या नोकरीतले, परीक्षेचे आणि पास होण्याचे म्हणजेच टक्केवारीची पद्धत बघितली की असं वाटतं- बुद्धिमत्तेमध्ये कुठली आली सवलत! प्रश्नपत्रिका सर्वांना एकसारखी, परीक्षेला वेळ सारखा, परीक्षेला बसणार्‍या मुलं सारख्या वयाची! परीक्षेपासून ते नोकरीपर्यंतचे ध्येय, स्वप्न सर्वांची एकसारखी! मग परीक्षा फी त्यांना कमी आम्हाला जास्त! पास होण्यासाठी टक्केवारी त्यांना 45% खाली, आम्हाला 55% वरती! हा कुठला आला न्याय ? बरं एवढं करूनही 55% वरची बुद्धिमत्तेच्या भरोशावर पोहोचलो तर मग नोकरीमध्ये आमच्यासाठी जागाच नाही. शिष्यवृत्ती काय तर ठराविक लोकांना! अरे, ज्यांना खरोखर शिष्यवृत्तीची गरज आहे, त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा नियम काढा तो योग्य न्याय होईल.
 
सांगा मोदी आबा, कशी बघायची आम्ही भावी आयुष्याची स्वप्नं ? आधीच्या सरकारने मते मिळविण्यासाठी म्हणून विचार न करता सवलतीची नियम काढले. कारण त्यांना लोकांच्या भावनांचा विचार नव्हता ना कुणाचं हित, फक्त स्वत:च्या तिजोरीवर लक्ष! मोदी आबा, तुमच्यावर तर सगळी जनता खूष आहे. कार आज भारतातील प्रत्येक लहान, तरुण, वृद्ध प्रत्येकांना तुमच्याबद्दल एक विश्वास आहे, की- मोदी आबा आपल्या भावनांची कदर करतीलच. आज देशातील असंख्य तरुण मोदी आबा तुमच्याकडे आशेने बघत आहे. आमच्या सारख्या तरुणांचा, स्वप्न पूर्ण करणे हे फक्त आणि फक्त मोदी आबा तुमच्याच हातात आहे.
 
आजच्या घडीला निवृत्तीचे वय 62 आणि 65 करून काय साध्य करायचे आहे ? ज्यांचे निवृत्तीचे वय 62, 65 आहे त्यांना सुद्धा तरुण मुलं-मुली आहेत. त्यांची काही स्वप्ने असतील, त्या प्रत्येक लोकांनी स्वत:च्या मुलांचा विचार करून जरी सरकारला स्वत:च्या निवृत्तीचे वय कमी करायला लावले, तरी अशा प्राध्यापक किंवा इतर अधिकारी लोकांचे भारतमातेच्या लेकरांसाठी खूप मोठं बलिदान ठरणार आहे. आज या लोकांच्या पगाराचा आकडा इतका मोठा! तो कुणाला कमी वाटला म्हणून 3 टक्क्यांनी त्यांच्या पगारात वाढ केली. मोदी आबा यापेक्षा आम्हाला घडविणार्‍या आमच्या अंगणवाडीच्या शिक्षिका ज्यांनी आम्हाला लिहायला वाचायला शिकविले, समाजात लोकांशी कसे वागायचे याचे धडे दिले अशा आम्हा तरुण पिढीला घडविणार्‍या आमच्या अंगणवाडीच्या शिक्षिकांकडे अजून लक्ष दिले असते तर त्या कित्येक पटीने कार्यरत राहू शकतील, यात शंका नाही. आज महागाई काय आणि आमच्या अंगणवाडीच्या शिक्षकांचे पगार काय ? त्याही पिढी घडवित आहे आणिआमचे प्राध्यापकही मग मोदी आबा त्यांच्या आणि यांच्या पगारात एवढी तफावत का?
 
आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणं हे आपल्या आयुष्यातलं एक मोठ्ठ भाग्य समजल्या जाते. सरकारी नोकरीमध्ये प्रामाणिक परीक्षा देऊन, पूर्ण फी भरून, टक्केवारी 55 च्या वरती मिळवून पुन्हा नोकरीच्या जागा येतात, तेव्हा सरकारी नोकरीमध्ये फक्त 100 जागांपैकी फक्त 40 जागा खुल्या वर्गासाठी! मोदी आबा, तुम्हीच सांगा हा कुठला न्याय ? कुठे प्राध्यापकाची नोकरी करायची म्हटली तर भरपूर टक्केवारी असूनही आपल्यासाठी जागा नाही म्हणून मागे राहायचे आणि जागा असेल तर 40 लाखांची बॅग घेऊन मुलाखतीला सामोरे जायचे. आज हे शिक्षण क्षेत्र जिथे बुद्धिमत्तेच्या भरोशावर पुढची पिढी घडणार असते. अशा ठिकाणी तरी मोदी आबा तुम्ही थोडा तरी न्याय द्या.
 
एगाद्याला सरकारी नोकरी मिळाली तरी त्याला पूर्वीसारखे पट्‌कन नोकरीवर रुजू होता येत नाही. त्याला असंख्य सर्टीफिकेट सादर करावे लागतात. उदा. चारित्र्याचा दाखला, शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला, रहिवासी दाखला आणि हे सर्व दाखले घ्यायला त्याला सरकारी हॉस्पिटल महानगपालिका, स्थानिक पोलिस स्टेशन अशा सर्व ठिकाणी जावे लागते. तिथे जाऊन एका दिवसात तर हे काम होणे शक्य नाही. कारण तिथल्या पदावर असलेल्या अधिकार्‍याला हे माहीत असते ही ती वेळ आहे, आपलं महत्त्व वाढवून घेण्याची आणि त्यावेळी तासन्‌ तास रांगेत उभे राहून एक एक नोट सरकवत गेलो तरच तुमचे काम होणार, पण मोदी आबा तुम्ही विचार करून बघा! ज्याच्या जवळ बुद्धिमत्ता असेल त्याच्याजवळ पैसा असेलच असे नाही. अशावेळी काय करायचे ?
 
आता खरोखर या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण लाखो करोडो तरुणांच्या अपेक्षा तुमच्यावर आहेत आणि सर्व तरुणांना हे माहीत आहे, की- मोदी आबा स्वत:साठी नाही इतरांसाठी कार्यरत असतात. आधीच्या सरकारनी मतांसाठी आरक्षण देऊन मोठा इतिहास घडविला, अशी समजूत करवून घेतली. अहो, पण आरक्षण अशांना द्या, ज्यांना खरोखर गरज आहे. जे दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांची एकवेळा खाण्याची सोय नाही. आर्थिक निकषाद्वारे आरक्षण दिले तर भारत मातेचया लेकरांसाठी ही मोठी कामगिरी होईल. पण आज सवलत अशांना मिळते, जे गर्भश्रीमंत आहे. घरी चारचाकी वाहन, हातात स्मार्ट फोन, भारी भारी कपडे, जिथे इतर 70 हजार फी भरतात त्या ठिकाणी हे सवलत घेणारे 500 रुपये फी भरून मोठ्या थाटात निघून जातात. मोदी आबा, तुम्ही सांगा अशांना सवलतीची गरज आहे ? आता निर्णय देण्याची वेळा आली आहे. आम्हा सर्व तरुणांची स्वप्ने पूर्ण करणे फक्त आणि फक्त मोदी आबा तुमच्या हातात आहे.