मोदी हैं तो (सबकुछ) मुमकीन हैं!

    दिनांक :08-Aug-2019
दिल्ली वार्तापत्र  
श्यामकांत जहागीरदार  
 
देशातील कोट्यवधी लोकांनी कित्येक वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शिक्कामोर्तब करत इतिहास घडवला.
 
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या मृत्यूपूर्वी ट्विटमधून व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या एकटीच्या नाहीत, तर देशातील कोट्यवधी लोकांच्या होत्या. याच दिवसाची अनेकांना प्रतीक्षा होती. यासाठीच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून आतापर्यंत हजारो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले आहे. देशाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण म्हणावा लागेल. ऑगस्ट महिन्यात देशात दुसर्‍यांदा क्रांती घडवली गेली. 

 
 
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’चा नारा दिला होता, तो मोदी यांनी खरा करून दाखवला. 370 कलम एवढ्या सहजासहजी रद्द होईल, याची स्वप्नातही कल्पना कुणी केली नव्हती, मात्र पंतप्रधान मोदी यांनी ते स्वप्न खरे करून दाखवले. यात त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
 
मोदी यांच्यावर देशातील कोट्यवधी जनता प्रेम का करते, याचे उत्तर त्यांच्या धाडशी अशा निर्णयप्रक्रियेत आहे. मोदी यांनी एखादा निर्णय घेतला की, त्यापासून त्यांना कुणी परावृत्त करू शकत नाही. तो निर्णय व्यापक देशहिताचा असेल, तर जगातील कोणतीही शक्ती त्यांना त्यापासून परावृत्त करू शकत नाही, याचा अनुभव देशवासीयांनी या आधी अनेकदा घेतला, पण आता जो निर्णय मोदी यांनी घेतला, त्याबद्दल समस्त राष्ट्रभक्त जनता त्यांचा जयजयकार केल्याशिवाय राहणार नाही!
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत जो गनिमी कावा केला, त्यामुळे काँग्रेससह समस्त विरोधक चारीमुंड्या चीत झाले. विरोधकांना बेसावध ठेवून िंखडीत गाठण्याचे जे कौशल्य मोदी आणि शाह यांनी साधले, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
 
विशेष म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांत, जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठनाबाबतचे विधेयक मांडताना तसेच त्यावर दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी जे भाषण केले, ज्या प्रभावीपणे आणि आक्रमकतेने विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले, त्याला तोड नाही. अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आणि पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले, यावर विश्वास बसत नव्हता. एखाद्या कसलेल्या आणि अनुभवी नेत्याप्रमाणे संसदेत शाह यांची वागणूक दिसत होती.
 
मोदी सरकारच्या दुसर्‍या कारकीर्दीला नुकतेच 50 दिवस पूर्ण झाले, पण या काळात मोदी सरकारने हा निर्णय घेऊन पाच वर्षांत आपली वाटचाल कशी राहणार, याचे संकेत दिले आहेत. राममंदिराचा मुद्दा तर मोदी कोणत्याही क्षणी निकालात काढू शकतात, समान नागरी कायदा आणि गोहत्या बंदीचा मुद्दा चुटकीसरशी सोडवू शकतात, असा विश्वास मोदी यांनी आपल्या कार्यपद्धतीने निर्माण केला, ही त्यांची मोठी उपलब्धी मानावी लागेल.
 
मोदी यांनी जम्मू-काश्मिरातून घटनेचे 370 वे कलम फक्त रद्दच केले नाही, तर जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढत त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करत आणि या दोन्ही भागांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत जो षट्‌कार लगावला, त्याची कल्पनाही कुणी केली नसावी. यामुळे काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
रा. स्व. संघाने 17 वर्षांपूर्वी केलेल्या ठरावात, जम्मू-काश्मीरचे त्रिभाजन करण्याची मागणी केली होती. जम्मू, काश्मीर आणि लडाख असे राज्याचे तीन भाग करण्याची संघाची मागणी होती. त्यामुळे जम्मू-काश्मीर एकत्र न ठेवता त्याचे जम्मू आणि काश्मीर असे दोन भाग करत दोघांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला असता, तर अधिक चांगले झाले असते. मात्र, या दोघांना एकत्र ठेवण्यामागेही मोदी आणि शाह यांची काही योजना असावी.
 
लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत मोदी सरकारने या भागाची खूप जुनी मागणी मान्य केली आहे. लडाख हा चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लडाखचे भौगोलिक महत्त्व खूप आहे. आता हा प्रदेश केंद्रशासित झाल्यामुळे लडाखची सुरक्षा केंद्र सरकारच्या अखत्यारित आली आहे. जम्मू-काश्मीर राज्याचा भाग असताना लडाखवर खूप अन्याय झाला, जम्मू-काश्मीरपेक्षा लडाखचे क्षेत्रफळ जास्त आहे. मात्र, लडाखला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. याबाबतची वेदना लडाखचे भाजपा खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांच्या भाषणातून व्यक्त झाली.
 
जम्मू-काश्मीरची सर्वाधिक लूट तीन घराण्यांनी केली, असे अमित शाह यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटले. यातील एक घराणे फारुख अब्दुल्ला यांचे, तर दुसरे मुफ्ती मोहम्मद सईद यांचे, याबाबत कुणाला शंका नव्हती. मात्र तिसरे घराणे कोणते, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. याबाबतची विचारणा संसदेत करण्यात आली असता, ते तुम्हाला माहिती आहे, असे उत्तर शाह यांनी दिले. त्यामुळे ते तिसरे घराणे गांधी घराणे तर नाही, अशी चर्चा सुरू झाली. कारण जम्मू-काश्मीरशी गांधी घराण्याचा जुना संबंध आहे.
 
जम्मू-काश्मिरात विधानसभा असली आणि विधानसभेसाठी निवडणूक होऊन नवे सरकार स्थापन झाले, तरी या सरकारला आता पहिलेसारखे अधिकार राहणार नाहीत. जम्मू-काश्मीर सरकारची स्थिती दिल्लीतील केजरीवाल सरकारसारखी होणार आहे.
 
370 कलम रद्द झाल्यामुळे जम्मू-काश्मिरात पाकिस्तान आता कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकणार नाही, खोर्‍यातील हिंसाचाराला आणि दहशतवादाला खतपाणी घालू शकणार नाही, याबद्दल शंका नाही. 370 कलम रद्द करण्याबाबतच्या विधेयकावर काँग्रेसने घेतलेली भूमिका अनाकलनीय होती. जो शहाणपणा बसपाच्या मायावती आणि आपचे अरविंद केजरीवाल यांना दाखवता आला तो काँग्रेसला दाखवता आला नाही. काँग्रेसच्या सरकारने भूतकाळात केलेली मोठी चूक सुधारण्याची संधी काँग्रेसला वर्तमानकाळात मिळाली होती. पण, काँग्रेसने आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवत ही संधी गमावली.
 
जम्मू-काश्मिरातील गुलाम नबी आझाद विरोधी पक्षनेते असल्यामुळे, राज्यसभेत काँग्रेस या मुद्यावर आक्रमक होती. या मुद्यावरील मतदानासाठी पक्षादेश काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, मात्र या मुद्यावर पक्षादेश काढता येणार नाही, असे सांगत राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद कलिना यांनी काँग्रेसचाच नाही, तर खासदारकीचाही राजीनामा देत काँग्रेसला आधीच एक धक्का दिला.
 
राज्यसभेत काँग्रेस जेवढी आक्रमक होती, तेवढी ती लोकसभेत दिसली नाही. लोकसभेत आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी स्वत:ला आणि पक्षालाही अडचणीत आणले. 370 कलमाच्या मुद्यावरून कोणती भूमिका घ्यावी, याचा नेमका निर्णय काँग्रेसला करता आला नाही. त्यामुळे या मुद्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. जनार्दन द्विवेदी, अभिषेक मनू सिंघवी, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, अदिती सिंह, रंजिता रंजन हे 370 कलम रद्द करण्याला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत होते. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील दुसरा गट याच्याविरोधात होते.
 
370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेत मोदी आणि अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे आतापर्यंत बोलले जाणारे वाक्य प्रत्यक्षात आणले आहे. खोर्‍यातील हिंसाचार आणि दहशतवादाच्या मुळावरच घाव घातला आहे. चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह देशातील कोट्यवधी भारतीयांचे खर्‍या अर्थाने नायक (हीरो) झाले आहेत!
 
9881717817