त्याची आक्रमकता

    दिनांक :09-Aug-2019
वैशाली व्यवहारे-देशपांडे
 
आज ती ची कामवाली रेखा जरा उशिरा कामाला आली. ती ने विचारलं, का गं, आज एवढा उशीर? जरा चिडचिड्या सुरात रेखा म्हणाली, काही नाही ताई, नवरा आल्ता घरी. मी कामावर होती, कांदे, बटाटे, डाळ, तुम्ही दिलेलं ब्लँकेट विकून दारू पिऊन आला. पोलिसातच देनार व्हती, पन त्याच्या भावाला फोन करून दटावलं आणि याला घिऊन जा म्हून सांगितलं. असं धमकावलं की पुन्हांदा येनार न्हाई.
 
ती च्या अनेक गुरूंपैकी तिच्या घरात काम करणार्‍या दोघी तिच्या महागुरू. परिस्थितीला तोंड देत मुलांवर शिक्षणाचा संस्कार करण्यासाठी दिवस-रात्र झगडणार्‍या या खर्‍या स्वयंसिद्धा!
 
ती ऑफिसमधे पोहोचली, तेव्हा कॉफीचा कप हातात घेऊन उभी असलेली जास्मिन दिसली. तिचा विझलेला चेहरा बघून काय समजायचे ते ती समजली. बायकोपेक्षा कमी पगाराची नोकरी असली म्हणून काय झाले? मान त्याचाच. नवरा हे बिरूद मिरवतोय तो माणूस, जास्मिन उपहासाने हसत म्हणाली. माझा पगार घरातच खर्च करते, तरी त्याचा हिशोब द्यावा लागतो, घरातल्या एकूण एक कामाची जबाबदारी माझीच आणि तरीही नवरा म्हणून शिव्या द्यायचा मान त्याचाच. जास्मिनच्या उपरोधाला आता संतापाची धार चढली होती. 
 
 
ती ला वाटलं, आजचा दिवसच वाईट.
दुपारच्या मिटिंगमधे, जाहिरात देणार्‍या कंपनीने जेव्हा आमच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीत, घरातली स्त्री स्वयंपाक करताना दिसली पाहिजे, असा आग्रह धरला तेव्हा मात्र तिचा संयम सुटतो की काय, असे तिला वाटायला लागले. बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी, असा विचार करणार्‍या ती ला जाहिरातीतील गृहिणी फक्त स्वयंपाक करतानाच दाखवली पाहिजे, असं म्हणणार्‍या पुरुषाचा, फाडफाड बोलून अपमान करावंसं वाटलं तर नवल काय?
 
संध्याकाळपर्यंत ती तशी शांत झाली होती, पण रात्री जेवताना नवरा आणि मुलगा असे दोघे समोर आले तसा ती चा सकाळचा राग उफाळून आला. ती चा असा स्वभाव दोघांच्याही चांगलाच परिचयाचा होता. एकदा का भडाभडा बोलून टाकलं की ती शांत व्हायची. आताही नेमकं तसंच झालं.
 
मुलगा म्हणाला, आई, मी आणि बाबा आपल्या घरातील कोणतंही काम करू शकतो. मला पोळ्या लाटता येत नाहीत, पण बाबा तर पोळ्याही लाटतो. घर आवरणं, बाथरूम धुणं, आमच्या डब्याबरोबर तुझाही डबा सहज भरतो आम्ही. का?
कारण मी सवय लावली आहे तुम्हाला. थोडा अभिमान डोकावलाच ती च्या आवाजात तिच्याही नकळत. दोघांनीही सहज त्याकडे दुर्लक्ष केलं. मुलाने परत प्रश्न केला, सवय म्हणजे?
ती ला कळेना त्याला काय म्हणायचं आहे ते. तो म्हणाला, सवय म्हणजेच कंडिशनिंग. म्हणजे शब्दश: नाही, पण एका अर्थाने कंडिशनिंगच.
 
हो. अगं, मग वर्षानुवर्षं, शतकानुशतकं आपल्या समाजाचं कंडिशिंनग झालेलं आहे ना. स्त्रीने असं वागायचं, पुरुषाने असं वागायचं, घरातली कामं स्त्रियांचीच, हा तसा सोयीचा आणि सवयीचा पण रिवाज आहे ना? पैसा पुरुषाने कमवायचा म्हणजे आपोआप कर्तेपण त्याच्याकडेच. स्त्रीने पैसे कमवायला सुरुवात केली आणि दोघांमधे स्पर्धा सुरू झाली. पैसे तर दोघेही कमवायला लागले, पण कर्तेपण पुरुषाने का सोडावं? मीच पैसे कमवू शकतो, हा अहंकार गेला, पण मीच कर्ता हे कंडिशनिंग अजून गेलेलं नाही. ती आणि तो दोघेही कौतुकाने आपल्या लेकाकडे बघत राहिले.
 
ती च्या मनात आलं, याचं कंडिशनिंग छान झालंय, भाग्यवान असेल याची बायको.
स्वत:च्या प्रत्येक विचाराचं विश्लेषण करायची ती ला सवय होती. आपल्या मुलाची बायको त्याच्यामुळे सुखी होईल, असा विचार कुठून आला असेल? एक आई म्हणून माझंही कंडिशिंनग झालं आहेच. ती आता बरीच शांत झाली होती.
ती आणि तो रात्री बराच वेळ बोलत बसले. ‘पुरुषाचं मानसशास्त्रीय कंडिशिंनग’ या विषयावर चर्चा सुरू झाली. का झालं असेल पुरुषाचं कर्ता म्हणून कंडिशिंनग?
 
त्याच्या शारीरिक ताकदीच्या बळावर? तो होताच नेहमी शारीरिकदृष्ट्या ती च्यापेक्षा ताकदवान. त्याची शक्ती जास्त असणं हे त्याच्या पुरुषत्वाचं भूषण होतं आणि अजूनही आहे. ती ने मात्र नाजूक असणं हे तिचं भूषण. हेही दोघांचं कंडिशनिंगच. स्त्री-पुरुष, शिव-शक्ती ही संकल्पना खरंतर एकमेकांसाठी पूरक म्हणून तयार झाली. पण, पूरक असणं ही संकल्पनाच आदर्श आहे, वास्तववादी नाही. कारण, पूरक असणं, ते समजणं यासाठी बौद्धिक, मानसिक या दोन्हीबाबतीत एका पातळीवर असायला हवं. सगळ्या समाजासाठी ही अशी आदर्श परिस्थिती कायमस्वरूपी टिकून राहणं अशक्यच आहे.
 
पुरुषाने त्याच्या शारीरिक सामर्थ्याचा सगळ्यात जास्त उपयोग स्त्रीला दडपण्यासाठी केला. शारीरिक ताकदीबरोबरच आली आक्रमकता. त्या आक्रमकतेचंही समर्थन झालं. पुरुषाच्या आक्रमकतेला, पुरुष असतातच आक्रमक, अशी मान्यता मिळाली. त्यापाठोपाठ त्यांच्या स्वभावात संयम नसतोच, हेही समाजमान्य झालं. समाजमान्यता मिळाली म्हणजे संपूर्ण कंडिशनिंग. स्त्रीजवळ त्याला शरण जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. स्त्री-पुरुष प्रणयातली शृंगार आणि शिव-शक्तीचे मिलन कधी संभोग या क्रियेपुरतं उरलं कळलंच नाही.
 
बाप रे! ती च्या अंगावर काटाच आला या विचाराने. खजुराहोतील शिल्प, वात्स्यायनाचे कामशास्त्र या सगळ्यातून भावनिक, मानसिक पातळीवरील एकरूप होणार्‍या प्रणयाला फक्त शारीरिक पातळीवर आणलंय की आपण!
कोण जबाबदार याला, ती का तो?