आई आणि कुटुंब!

    दिनांक :09-Aug-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
घरात आपल्या लोकांशी बोलताना, आईशी बोलताना रागाच्या भरात येणारे अपशब्द नकळतच त्यांचे मन दुखावणारे ठरून जातात, की ज्याची गणतीही कधी केली जात नसेल. आपण तिला एखादा अपशब्द बोलल्यावर ती किती दुखावली गेली असेल, त्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आले असेल का? अपशब्द म्हणजे अपमानच खरा तर!
 
आईचा मुलाकडून होणारा अपमान, पत्नीचा पतीकडून होणारा अपमान, बहिणीचा भावाकडून होणारा अपमान नकळतच तिच्या जिव्हारी लागणाराही ठरू शकतो. बोलताना वाक्यागणिक येणारी शिवी असो किंवा तिला कमी लेखून केला जाणारा तिचा अपमान असो, तिचं उलट न येणारं उत्तर म्हणजे तिला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. 
 
 
घरामध्ये कुटुंबासमोर, लहान मुलांसमोर, बाहेर मित्र-परिवारासमोर, ऑफिसमध्ये, पार्टीमध्ये, फोनवर बोलताना, ती सोबत असताना, हॉटेल असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी तिला अपशब्द वापरून तिचा केलेला अपमान हा तिला वेदनादायीच ठरू शकतो. तिला काही कळत नाही, तिची पात्रता नाही, तिचं शिक्षण कमी, तिला समाजात वावरता येत नाही, आदी अनेक कारणं तिचा अपमान करण्यास पुरेशी ठरतात, तर तिच्या स्वयंपाकावरूनही तिला बोलणी खावी लागत असतील, तर तिचं घरासाठी राबणं, जीव तोडून घरातल्यांसाठी कष्ट उपसणं व्यर्थच मानावं लागेल. कुटुंबासाठी आपला सारा वेळ खर्ची करणारी ती स्वत: दमलेली असतानाही सतत काम करत राहते, मात्र त्या गोष्टीची कदर केली जात नसेल तर किमान तिला अपशब्द ही नाही वापरले तर ते तिच्यासाठी आदराचेच ठरू शकते.
 
वाक्यावाक्यात साठलेले अपशब्द, नियमित ओठात बसलेले अपशब्द, शिव्या ऐकून तिला या सार्‍याची जरी सवय झाली असली, तरी तिचं मन नेहमीच्या या शब्दांनी दुखावत तर असेलच ना! कधी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला खावा लागणारा ओरडाही तिचं मन दुखावणाराच असू शकतो.
 
एखादा शब्द आपल्या एवढा तोंडात बसलेला असतो की, तो तिचं काही चुकलं की लगेच ओठातून बाहेर पडतो. तो शब्द घरात उच्चारलेला असो किंवा सार्वजनिक ठिकाणी, तो तिच्या अपमानास कारणीभूत ठरू शकतो हे निश्चित!
 
प्रॉक्सी थॉटमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील. त्याकरिता तुम्हाला मोजक्या शब्दांत तुमचा प्रश्न, तुमच्या मुलाचे वय, तुमचे संपूर्ण नाव लिहून [email protected] वर मेल करायचा आहे.