भैरवी संपताना घरी परत फिरा रे पाखरा...

    दिनांक :09-Aug-2019
डॉ. वीणा देव
 
पहाटे पहाटे आकाशातल्या तांबड्या रंगाचा कोवळा प्रकाश स्वयंपाकघरात पसरायचा. आजीची चहाची तयारी सुरू व्हायची. नागपूरचे आजोबा दुधाची बाटली घेऊन यायचे. त्या काळात पहाटे पहाटे दुधाची गाडी यायची. काचेच्या बाटलीतले दूध- त्याला ताजं दूध संबोधलं जायचं.
 
चहात टाकलेली- तुळीशीची पानं, आलं, गवती चहा, चहाचा दरवळ घरात पसरायचा. हलकेच जाग यायची. या दरवळात उमलत जाणारी सकाळ, पोटातल्या बाळाला आवडत असेल का?
आठवा महिना लागलेला, मी आईकडे वर्धेला बाळंतपणासाठी गेलेले. चहा घेताना नागपूरची आजी म्हणायची- ‘‘अगं, कितीदा मेंदी लावतेच हाताला. मुलगी झाली तर तिची मेंदी रंगणार नाही बरं.’’ मला हसू यायचं. याच्यामागचा शास्त्रीय आधार काय? वाटायचं, पोटातलं माझं बाळ मुलगा असेल, तर तोही खुदकन हसत असेल आणि म्हणत असेल, ‘‘पणजी आजी, लावू दे आईला मेंदी.’’ 
 
 
त्या काळात आजच्यासारखे गर्भसंस्कार केंद्र नव्हते. पणजी आजी, आई, सासूबाई या सगळ्या जणीच चालतेबोलते गर्भसंस्कार केंद्र होते.
 
बाबांनी लावलेला जाईजुईचा वेल बराच मोठा झालेला. उगवत्या सूर्याची भूपाळीची जाळी आता तिने कवेत घेतलेली. तो जाईजुईचा सुगंध, गौरी-गणपतीची आणि बाळाच्या येण्याची चाहूल सगळंच कोवळी लकेर घेणारं. आजीला काळजी महालक्ष्म्यांच्या वेळीच ही दवाखान्यात गेली तर? किती धावपळ?
 
शेजारचा बंगला सुपेकाकूंचा. कॉमन कंपाऊंडवॉलवरून चढत गेलेली मेंदी. तिचा घनदाट वावर पूर्ण कंपाऊंडवरच असायचा. आई आणि सुपेकाकू दिवसातून एकदातरी- आत्मा आणि त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास यावर बोलायच्या. कारण काकूंचा मोठा मुलगा राजू नुकताच वारलेला आणि घरातलं बाबांचं वास्तव्य संपलेलं. विषय सुरू झाला की माहीत नाही, पण मला भीती वाटायची. खरं म्हणजे आयुर्वेदात आत्मा, मन, प्रकृती सर्वांचा अभ्यास केलेला. पण, तो विषय निघाला की, मी तिथून निघून जायची.
अनंतचतुर्दशीचा दिवस, पहाटे पहाटे बाळाने येण्याची चाहूल दिली. हिरव्या झबल्यातलं लालचुटूक ओठांचं ते बाळ पाहून श्रावणातली पोपटी रंगाची पाचूची कोवळी लकेर मनात रुजून गेली.
 
सहा वर्षांनी जानेवारी महिन्यात अशाच एका सुंदर बाळाला जन्म दिला. पण, यावेळी पोपटी पाचूची कोवळी लकेर गर्द हिरवी झालेली. जबाबदारीची जाणीव व्हायला लागलेली. कोवळा पोपटी रंग त्या वेळी गर्द हिरवा बनून मनात भिनून गेलेला. खरं म्हणजे दोघांसोबत माझे लहानपणाचे दिवस आठवायचे होते. सगळं उत्साहात, आनंदात करायचं होतं. पण, आभाळाएवढ्या जबाबदारीने मनातलं कोवळेपण हरवून जात होतं. वाडा संस्कृती मागे पडत होती. एवढंच काय, गोष्टीमधल्या व्यक्तिरेखा/चित्ररेखा बदलत होत्या.
 
माझ्या लहानपणी ‘टोपीवाला आणि माकड’ या गोष्टीतला माकड या पिढीत शहाणा झालेला. टोपीवाल्याने टोपी खाली टाकली, तरी पूर्वजांच्या चुका लक्षात घेऊन टोपी खाली न टाकणारा तो. काऊचिऊच्या गोष्टीतही तसंच काहीसं. भविष्यात काऊदादाची गरज पडली तर? या भावनेने काऊदादाला घरात घेणारी चिऊताई!
 
हा होणारा बदल, कोवळेपण संपत गेलेलं मन... मुलांचं शिक्षण संपून ते नोकरीला लागलेत. मोठा समीन ‘वरनॉन हिल’ (शिकागो)ला गेला. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. तो तिथे पोहचला हे ऐकण्यासाठी मनाची अधीरता. त्याला एअरपोर्टवर सोडायला गेले आणि लालचुटूक ओठांचं ते लहानगं बाळाचं रूप आठवलं. कुठेतरी नाळ तुटली जात नाही ना? मनातला एक कोपरा उदास झालेला.
 
मोठी सून केतकी पॅरिसला गेली. ती तिथे अतानाच बॉम्बस्फोट झाला. मन हळुवार झालं. पासपोर्टची गरज नसलेलं मन तिच्यापर्यंत जाऊन पोहोचलंपण. ती सुखरूप आहे, हे कळल्यावर देवापुढे निरांजन लावून साखर ठेवली. दत्तजयंतीच्या दिवशी तिने पॅरिसमध्ये उपवास केला, जप केला. हे ऐकलं आणि चाफा पानापानांत फुलून यावा, त्याचा दरवळ पसरावा तसंच काहीसं वाटलं. दत्तजयंतीत ती मनाने सोबत असल्याच्या जाणिवेनं उत्साह वाटू लागला. धाकटा सुयश आणि त्याची सुप्रिया, दोघांना तर कॅनडाचा पी.आर. मिळाला. फार कमी दिवसांत सुप्रियाने माझ्या मनाचा ताबा घेतलेला. माहेर सोडल्यावर पहिल्यांदाच माझ्या सुखदु:खात जिव्हाळ्याची जोड मिळाली होती. माझ्या ऑफिसचं पॉलिटिक्स, नातेवाईक, मैत्रिणी... ती सर्वांमध्येच सामील झाली. तिचं जायचं ठरलं आणि पुन्हा एकदा माहेर सोडतानाची होणारी जाणीव झाली.
 
सुयशचं कॅनडात जायचं ठरलं आणि एक उदासीनता मनात भिनून गेली. सर्वांमध्ये असूनही मन रमत नव्हतं. तो जायच्या दिवशी हातपाय दुखायला लागलेत. डोळ्यांत िंकचितसा लालिमा आलेला. त्याचे सासू-सासरे त्याच्या पॅिंकगमध्ये बिझी. एअरपोर्टवर कधी नव्हे तो मी ‘बर्गर’ खाल्ला. माझं मलाच आश्चर्य वाटलं. मनाचा तोल बिघडल्याचं ते प्रतीक होतं का? मनातून येणारे कढ...
 
त्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर मी शांत बसलेली. तो फार मोठा झाल्यासारखा वाटत होता. ती हिरवी गर्द पोपटी लकेर- सुयश दूर जातो आहे ही संवेदना लपेटत होती.
 
बॅगचं वजन जास्त झालं म्हणून सुयश आतून बाहेर आलेला. सुनेची आई माझ्याहीपेक्षा जास्त वेगाने धावत गेल्या, काय झालं म्हणून? मनाला समाधान मिळालं की, देवाजवळ आशीर्वादासाठी, माझ्यासारखेच हात जोडणारे अजून दोन हात त्याच्या सोबत आहेत म्हणून. उदासीनतेची जागा समाधानाने घेतली. पुन्हा तो आत गेला तेव्हा मात्र डोळ्यातलं पाणी थांबेना.
 
आता तिन्ही सांजेची वेळ आहे. मी ऑफीसमधून घरी परतते. कंपाऊंडलगतची जाईजुई आताही बहरलेली. पण, तिचा सुगंध आता लकेरी घेत नाही- गाभार्‍यातल्या शांततेत विसावण्याचा ध्यास त्याला लागला आहे. बोगनवेल आपल्याच विचारात मग्न आहे.
 
तिन्ही सांजेच्या वेळी आभाळातले रंग घरातल्या डायिंनग टेबलच्या काचेवर रेखाकृती बनवतात. किचनच्या खिडकीतून येणारा गार वारा... जर्मनीत आता किती वाजले असतील? कॅनडात आता पहाट होत असणार. मन कातर होतं. मनात भिनलेली पोपटी लकेर/गर्द हिरवी लकेर भावुक होते. मनाच्या आंदोलनात भिनलेलं आईपण... साद घालू लागतं-
‘‘भैरवी सुरू होताना
परत फिरा रे पाखरा...’’
मी देवघरात दिवा लावते. क्षितिजापल्याडचा एक कोवळा प्रकाशाचा कवडसा माझ्या मनात विसावतो. सगळंच नवीन. वासांसि जिर्णानी...!