पुरामुळे अडकलेली बस तीन तासांनी सुटली

    दिनांक :09-Aug-2019
- विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
वर्धा, 
वर्धा- कारंजा-नारा-तारासावंगा मार्गावरील सावहरडोह गावाजवळील खडका नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने बसमधील प्रवाशांसह अनेकजण अडकले होते. तब्बल तीन तासानंतर नाल्याचे पाणी उतरल्यावर अडकलेली बस आपल्या मार्गावर निघाली.
 

 
 
शाळेचे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना घेऊन ही बस सावरडोह भागातून जात होती. दरम्यान या भागातून जात असताना खडका नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने बस मध्येच अडकली. यावेळी इतर वाहनेसुद्धा अडकून पडली होती. या बसमध्ये जवळपास 60 ते 70 प्रवाशी अडकून असल्याची माहिती बस चालक निळकंठ काकडे यांनी प्रशासनाला दिली. यावेळी तहसीलदार यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. पंचायत समिती सभापती मंगेश खवशी देखील बिस्कीट व खाण्याचे साहित्य घेऊन बसमध्ये पोहचले. सकाळपासून शाळेसाठी निघालेली मुले भुकेने व्याकुळ झाली होती. यावेळी चिमुकल्यांच्या हाती बिस्कीटचे पुडे येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अखेर नाल्याचे पाणी उतरल्यावर साडेसहा वाजतापासून अडकलेली बस तब्बल साडेनऊ वाजताच्या सुमारास गावाकडे निघाली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्रवाश्यानी सुटकेचा श्वास सोडला.