वरचेवर आजारी पडू नये म्हणून...

    दिनांक :09-Aug-2019
सध्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव बराच जास्त आहे. ताप, सर्दी, खोकला झालेल्या रूग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. असं असलं तरी अनेकजण तंदुरूस्त आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर, गर्दीतला वावर असं सगळं असूनही काहींना साधी सर्दीही झालेली नाही. एखाद्या ठिकाणचं शिळं अन्न खाऊनही असे लोक आजारी पडत नाहीत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी... 
 
  • अशक्तपणा, वेदना तसंच मायग्रेन्सची समस्या असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं योग्य ठरतं, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उष्ण वातावरणात थंड पाण्याने आंघोळीला सुरूवात करता येईल. थंड पाण्याने आंघोळ करताना शरीराचा खालचा भाग आधी भिजवा. हृदयविकार जडलेल्या रूग्णांनी आंघोळीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने थंड पाण्याचा वापर करावा.
  • हात स्वच्छ धुवा. ही कृती सातत्याने करत राहा. कमीत कमी 20 सेकंद हात धुवा. नखांमधली घाण स्वच्छ करायला विसरू नका. हात धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.
  • आहारात आल्याचा समावेश करा. आल्यामुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. पोटाचे स्नायू बळकट होतात आणि अन्नपचन अधिक सुलभ होतं.
  • आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करा. ‘क’ जीवनसत्त्वामुळे सर्दीसारख्या विकारांची तीव्रता कमी व्हायला मदत होते. पण ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात घेऊ नये. दिवसभरातल्या ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण 2000 एमजीपर्यंत असावं. या जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त झालं तर किडनीचे विकार होऊ शकतात. आहारात झिंकचा समावेश करायला हवा.
  • लसूण हा अँटिऑक्सिडंट्‌सचा प्रभावी स्रोत मानला जातो. लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसंच जळजळ कमी व्हायला मदत होते.
  • नियमित मसाजमुळे शरीराला अनेक लाभ होतात. स्नायू मोकळे होतात. ताणतणाव कमी होतात. रक्तदाब सुधारतो. हृदयगती नियंत्रणात राहते. महिन्यातून एकदा मसाज करायला हरकत नाही.
  • सकारात्मक रहा. सकारात्मक राहिल्याने शरीर आजारांचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतं. या काळात आपण आजारी पडू, असा विचार अजिबात करू नका. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.