पुरणपोळी, सोशल मीडिया आणि आरोग्य

    दिनांक :09-Aug-2019
•वैद्य सुचित्रा कुळकर्णी
 
फेसबुक आणि व्हॉट्‌स ॲप हे दोन सोशल मीडिया सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. बघावं तेव्हा तरुण, वृद्ध, स्त्री-पुरुष सगळे खाली मान घालून टुकटुक करण्यात गुंतलेले असतात. यातल्या सुप्रभात, शुभरात्री, शुभेच्छा, अभिनंदन, सहानुभूती अशा वैयक्तिक संदेशांचं ठीक आहे. पण विषय जेव्हा धार्मिक श्रद्धांवर हल्ला किंवा आरोग्य टिप्स यांच्याकडे वळतो, तेव्हा परिस्थिती बिकट होते. वाचणारे पूर्ण पोस्ट वाचतात की नाही, वाचली तर त्यावर विचार करतात की नाही सगळे प्रश्नच आहेत. वेगळी वाटली पोस्ट असा एकच निकष लावून ती धडाधड पुढे धाडली जाते. फुकटचे सल्ले मिळाले, की काही वाचणारे त्याचं उतावीळपणे अनुकरण करतात आणि नसलेलं संकट ओढवून घेतात. 
 
 
दुर्दैवानं आरोग्यविषयक अशा भुरट्या संदेशांमधील बहुतांश संदेश आयुर्वेदाच्या नावावर फिरत असतात. दम्यावर पुरणपोळी, मलावष्टम्भावर शेंगदाणे, मुतखड्यावर कोथिंबीर, वजन कमी करायला टोमॅटो, प्रमेहावर कारलं, सगळ्या रोगांवर आळशी, तिनशे रोगांवर शेवग्याची शेंग, कॅन्सरवर सुदी, अमक्या-तमक्या रोगावर फ्रोजन लिंबू, डिप्रेशनवर कुठल्यातरी फुलाचा अर्क असे शेकडो संदेश आत्ता बाजारात फिरत असतील. आता हे असं जोड्या जुळवण्याइतकं सोपं असतं, तर सरकारनं साडेपाच वर्षांचा आयुर्वेदाचा अभ्यासक्रम कशाला बरं आखला असता? मुलांच्या तारुण्यातला बहुमूल्य वेळ आणि कष्टाच्या कमाईचा पैसा खर्च करून, आईबापांनी पोरांना तिथं कशाला शिकायला पाठवलं असतं? पण विचार कोण करतो?
 
बरं हे संदेश ज्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावानं फिरतात, त्यांनीच खरोखर ते लिहिले आहेत का?, अप्रसिद्ध व्यक्तींनी लिहिले असतील तर त्यांचा या विषयातला अभ्यास किंवा अधिकार किती आहे?- असे कुठलेही विचार हा माध्यम वाचक करत नाहीत. एरवी घरातल्या बिघडलेल्या नळासाठी प्लंबरलाच बोलावणारे लोक, या अश्या संदेशांची विश्वासार्हता मात्र तपासून बघत नाहीत. कित्येक संदेश तर, एखाद्या वर्षाचा पोस्टल अभ्यासक्रम करून स्वत:च्या नावामागे मागे बिनदिक्कत डॉक्टर ही उपाधी लावणार्‍या नॅचरोपॅथिस्ट्‌स लोकांनी लिहिलेल्या असतात. (त्या देखील आयुर्वेदाच्या नावावर) नॅचरोपॅथी म्हणजे आयुर्वेदाचाच एक भाग असा एक मोठा गैरसमज जनसामान्यांमध्ये कसा काय दृढ झाला आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. नैसर्गिक गोष्टींचा चिकित्सेसाठी वापर- हेच नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद यांच्यातलं एकमेव साम्य असावं. स्वत:चे मूलभूत सिद्धांत (ते देखील बर्‍याच शास्त्रज्ञांनी निरीक्षण, अवलोकन, तर्क, परीक्षण इ. करून निश्चयपूर्वक मांडलेले) हे फक्त आयुर्वेदालाच आहेत, हे आपल्याला माहीतच नसतं.
 
माझ्या एका रुग्णाच्या नातेवाईकानं स्वतःच्या कंबरदुखीवर असाच एक मीडियामध्ये फॉरवर्ड होऊन आलेला इलाज चालू केला. चारच दिवसात त्याला मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. मग त्यावर सुद्धा एक रामबाण इलाज त्याच्या मोबाईलमध्ये जपून ठेवलेला होताच. तो चालू केल्यावर पित्त वाढलं. शेवटी माझा रुग्ण त्यांना बळजबरीनं माझ्याकडे घेऊन आला. आपला स्वतःचा असा गिनी पिग बनवण्याची लोकांना का हौस असते, मला कळतच नाही. हेच लोक वैद्यांकडे गेल्यावर मात्र, साईड इफेक्ट होणार नाही ना? औषध उष्ण पडणार नाही ना? नक्की बरं वाटेल, याची गॅरंटी आहे ना? असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. (या प्रश्नावलीवर माझा आक्षेप नाही, पण हीच जागरूकता भोंदू लोकांसमोर का दाखवली जात नाही?)
 
प्रत्येक व्यक्तीचे जगण्याचे, विचार करण्याचे, विचार पसरवण्याचे स्वातंत्र्य जरी गृहीत धरले; तरी एखाद्या शास्त्राच्या नावावर ते उद्योग करणे अयोग्य आहे. आयुर्वेदाच्या नावावर जेव्हा असे उद्योग केले जातात, तेव्हा जनसामान्यांच्या मनात शास्त्राविषयी गैरसमजच जास्त पसरतात. सब घोडे बारा टक्के, या पद्धतीनं केलेल्या या उपचारांना अपयश आलं, त्याचे काही साईड इफेक्ट्‌स झाले; तर लोकांना आयुर्वेद निरुपयोगी वाटू लागतो. त्याचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की, जेव्हा आयुर्वेदिय उपचार अत्यंत उपयुक्त ठरू शकतात अशा वेळी लोक गैरसमजापोटी आयुर्वेदातील तज्ज्ञ व्यक्तीकडे जात नाहीत किंवा नाईलाज झाल्यावर खूप उशिरा जातात. त्यामुळे एका यशस्वी, उत्तम, नैसर्गिक, आणि स्वस्त उपचार पद्धतीला आपल्या देशातील बहुतांश जनता कायम मुकते.
 
आजही खेड्यापाड्यात माणसांच्या आणि गुरांच्या अनेक आजारांवर, सर्पदंश किंवा विंचू दंशावर यशस्वी उपचार करणारे वैदू किंवा म्हातारी माणसं आहेत. पण त्यांचं ज्ञान हे असं मोबाईल फॉरवर्डेड नसून, पिढ्यान्‌ पिढ्या फॉरवर्डेड असतं. त्याला दीर्घकालीन अनुभव आणि नि:स्पृहता (यातले 99.99 % लोक पैसे न घेता उपचार करतात.) यांचा भक्कम आधार असतो, आणि मुख्य म्हणजे तिथे जवळपास लवकर उपलब्ध होणार्‍या व्यक्ती त्याच असतात. शहरात तशी अवस्था नसते. तरी शिकलेले लोक सांगीवानगीवर विश्वास कसे ठेवतात?
 
म्हणून म्हणते ....
आला जरी का आरोग्य संदेश।
धाडू नये पुढे निःसंदेह।।
गिनी पिग नसे मनुष्य देह।
सर्वथा न विसरावे।।