निष्ठा आणि क्षमता

    दिनांक :09-Aug-2019
न मम  
 श्रीनिवास वैद्य 
 
 
महाराष्ट्रात, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधून बरेचसे नेते भाजपात आल्याने, निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी अनेकानेक विनोद सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करावा लागला की, निष्ठावंतांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. परंतु, ही अस्वस्थता शमली आहे, असे मात्र म्हणता येणार नाही.
याच काळात, बंगालमध्ये नुकत्याच निवडून आलेल्या भाजपाच्या एका खासदाराला प्रश्न विचारण्यात आला की, तृणमूल, कम्युनिस्ट व कॉंग्रेस पक्षातील अनेक लोक भाजपात येत आहेत. त्यामुळे जे मूळ भाजपाचे होते, त्यांच्यावर हा अन्याय नाही का? या खासदाराने प्रश्नकर्त्याला उलट प्रश्न केला की, आम्ही मंगळ ग्रहावरून माणसे आणावीत अशी तुमची अपेक्षा आहे का? बंगालमध्ये आम्हाला भाजपाचे काम वाढवायचे आहे, तर बंगालमधीलच माणसे आम्ही भाजपात आणणार की नाही? यावर तो प्रश्नकर्ता निरुत्तर झाला. पक्ष वाढवायचा असेल तर पक्षात नसलेल्यांना पक्षात आणणे, हाच मार्ग असतो आणि गूळ असेल तिथेच मुंगळे येतात. जे भूस्तरावर पक्षवाढीचे नेटाने कार्य करीत असतात, त्यांना दुसर्‍या पक्षातील कार्यकर्त्यांचा विटाळ नसतो. परंतु, म्हणून निष्ठावंत जी चिंता व्यक्त करतात, तीदेखील अगदीच अनाठायी नसते. बर्‍याच ठिकाणी, स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून, ‘आयाराम’ला महत्त्व देण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु, भाजपामध्ये त्या अपवादानेच घडल्या आहेत, असे माझे निरीक्षण आहे.
 
आता दुसर्‍या कोनातून विचार करून बघू. आज भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. दहा कोटीच्या आसपास त्याची सदस्यसंख्या आहे. म्हणजे एकप्रकारचा सागरच आहे. अशा या सागरात, काही शे कार्यकर्ते सामावून घेतले, तर अस्तित्वाची भीती कुणाला असायला हवी? सागराला, की त्या शे-दीडशे कार्यकर्त्यांना? संघटनशास्त्रात निपुण असणार्‍यांना माहीत असते की, संघटनेच्या प्रगतीचे टप्पे कोणकोणते असतात. ते टप्पे पार करत पुढे जाणारी संघटनाच काळाच्या कसोटीवर टिकते. विकसित होते. व्यापक होते. आज भाजपा हा राजकीय पक्ष इतरांसाठी आकर्षक बनला आहे तो, त्या पक्षाच्या निष्ठावंत अनुयायांच्या कठोर परिश्रमामुळेच, हे सत्य जर शीर्षनेतृत्व सतत ध्यानात ठेवत असेल, तर समस्याच उद्भवत नाही. निष्ठावंत आणि नव्याने येणारे, यांच्यातील सुवर्णमध्य साधणे, हेच तर नेतृत्वाचे कौशल्य असते.
शेवटी पक्ष म्हणजे तरी काय? त्याला काही वेगळे अस्तित्व नसते. पक्षातील कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा, क्षमतेचा एकजिनसी शक्तिसमूह म्हणजे पक्ष असतो. यात प्रत्येकाची क्षमता कधीअधिक असते. परंतु, त्याचा सामूहिक आविष्कार शक्तिसंपन्न असतो. एखाद्या कार्यकर्त्यात जितकी क्षमता असेल तितक्या तो पक्षांतर्गत प्रगतीच्या पायर्‍या भराभर वर चढतो. दुसरा एखादा कार्यकर्ता आपल्या क्षमतेच्या आधारावर कुठल्या तरी एका पायरीवरच थांबलेला असतो. त्यामुळे निष्ठा आणि क्षमता या दोन बाबी आहेत, हे आपण मान्य केले पाहिजे. उदाहरणार्थ, कुठलाही उद्योग सुरू करायचा म्हटले की प्रारंभी भांडवल लागते. ते गोळा झाले की, त्या आधारावर बँका कर्ज देण्यास तयार होतात. स्वत:चे भांडवलच नसेल तर कुणीही कर्ज देणार नाही आणि उद्योगवाढीसाठी कर्जाची आवश्यकता असते. या कर्जाचा योग्य उपयोग केला तर त्या उद्योगाची भरभराट होते. अन्यथा काय होते, हे सर्वांना माहीत आहे. पक्षातही निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे त्या पक्षाचे भांडवल असते. परंतु, केवळ या भांडवलावरच पक्षवाढ होऊ शकत नाही. त्यासाठी कर्ज म्हणजे दुसर्‍या पक्षातून आलेले कार्यकर्तेही लागतात. त्यांचा योग्य सदुपयोग करून घेतला तर पक्ष व्यापक होऊ लागतो. भाजपाचेही तसेच झाले आहे. ज्याप्रमाणे नफा/तोटा पत्रक उत्तम असणार्‍या एखाद्या यशस्वी उद्योगाला, कर्ज देण्यास बँका मागे लागतात, त्याचप्रमाणे भाजपाचेही झाले आहे. भाजपाचे नफा/तोटा पत्रक उत्तम आहे आणि म्हणून इतर पक्षातून अनेकानेक कार्यकर्ते भाजपात येत आहेत. त्यांचे निश्चितच स्वागत झाले पाहिजे. येणारा कार्यकर्ता कितीही कलंकित असला, मळका असला तरीही त्याचे स्वागत झाले पाहिजे. कारण, भाजपातील निष्ठावान, नि:स्वार्थी कार्यकर्त्यांच्या सहवासात त्याचे कलंक, मळकेपणा निश्चितच धुवून निघणार असतो. आणि पक्षाची ही अपेक्षा निष्ठावंतांनी पूर्ण केली पाहिजे.
 
आपण निष्ठावंत असलो, पक्षासाठी खूप सोसले असले, तरी आपली क्षमता किती आहे, याचाही विचार झाला पाहिजे. निष्ठा आहे म्हणून क्षमता असेलच असे नाही आणि क्षमता आहे म्हणून निष्ठा असेलच असे नाही. ज्याप्रमाणे आंधळा आणि लंगडा यांची सामंजस्याने युती झाली तर ती यशस्वी ठरते, तद्वतच, निष्ठावंत आणि क्षमतावान यांचीही अशी युती झाली पाहिजे. या दोघांमध्ये समन्वय आणि समरसता कशी उत्पन्न होईल, याची काळजी नेतृत्वाने घेतली पाहिजे, एवढीच एक अट असते.
भाजपाचे नेतृत्व अतिशय क्षमतावान, कुशल आणि दूरदृष्टीचे आहे. विशाल आकाशात विहरणार्‍या घारीप्रमाणे त्यांची दृष्टी आहे. त्यामुळे निष्ठावंतांनी, दुसर्‍या पक्षातील येणार्‍या कार्यकर्त्यांच्या लाटेने घाबरून जाऊ नये, असे मला वाटते. कारण, लाट समुद्राची असते; लाटेचा समुद्र नसतो. लाटेवरून आठवले. सध्या पावसाळ्यात समुद्राकाठी गेलो, तर प्रचंड मोठ्या लाटा किनार्‍यावर धडकताना दिसतील. आपल्याला ही लाट लांबवरून येताना दिसत असते. मुळात ती तशी येते का? नाही. समुद्राच्या पाण्यातील प्रत्येक कण आपापाल्या जागीच असतो. त्याला बाजूच्याचा धक्का बसतो. तो धक्का हा कण पुढच्या कणाला देतो. असे सातत्याने व एका शिस्तीने झाले की, काठावरच्या पाण्यातील कण उंचावले जातात आणि वेगाने किनार्‍यावर धडकतात. आता आतील खोलवर पाण्याच्या कणाने म्हटले की, मीच स्वत: धावून किनार्‍यावर आपटतो, तर लाट निर्माण होईल का? ज्याचे जे काम आहे, ते त्याने आपल्या जागी राहून निष्ठेने केले पाहिजे, हाच संदेश समुद्राची लाट आपल्याला देत असते. संघासारख्या प्रगल्भ संघटनेचेही हेच सूत्र आहे. आम्ही भगवद्गीतेचा खूप अभिमान बाळगतो. पण, त्यातील एक-दोन विचारकण आचरणात आणण्यात काय हरकत आहे? कर्मफळाचा विचार न करता कर्म करत राहणे आणि आपल्या वाट्याला जे कर्म आले आहे ते म्हणजे जणू परमेश्वराची पूजा आहे, या भावनेने करणे, ही दोन मार्गदर्शक तत्त्वे गीतेत सांगितली आहेत. ती जर आपण आपल्या जीवनात उतरविली, तर मला वाटते, कुणाच्याही मनात कुशंका, आशंका येण्याचे काही प्रयोजन राहणार नाही. या भावनेने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजवर काम केले म्हणूनच तर आज हा पक्ष जगात क्रमांक एकचा आणि भारतात सर्वात शक्तिशाली म्हणून प्रस्थापित झाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या स्थानी राहून जे काम वाट्याला आले ते निष्ठेने सतत पार पाडले असल्यामुळेच आज किनार्‍यावरच्या लोकांना भाजपाची ही प्रचंड मोठी लाट अनुभवास येत आहे. आता त्या लाटेत आपण प्रत्यक्ष सहभागी नसलो, तरी त्या लाटेला आपण कारणीभूत आहोत, ही समाधानाची भावना कमी महत्त्वाची आहे का?
तुम्ही जितके व्यापक होत जाता, तितके तुम्ही पसरटही होत असता. धरणातील खोल, शांत पाणी जेव्हा तृषार्त जमिनीची तहान भागविण्यासाठी, पिकांना नवजीवन देण्यासाठी कालव्याद्वारे शेतात पोहचते तेव्हा ते पसरट झालेले असते. एवढेच नाहीतर, मातीच्या संपर्काने गढूळही झालेले असते आणि या प्रक्रियेत धरणातील पाण्याची पातळी खालावत असते. म्हणून, पातळी कमी होईल या भीतीने कालव्यांतून बाहेर पडण्यास पाण्याने नकार द्यावा काय? धरणातील पाण्याचे सार्थकत्व धरणातच राहण्यात आहे की, पसरट व गढूळ होऊन नवसंजीवनी देण्यात आहे? आणि म्हणून ज्या पक्षाचा पाया मजबूत आहे, ‘भांडवल’ स्थिर आहे, त्या पक्षाने इतरांसाठी आपले दरवाजे सदैव उघडे ठेवले पाहिजे.
9881717838 पप