उमा चौधरी : भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ

    दिनांक :01-Sep-2019
डॉ. अच्युत देशपांडे
 
अमेरिकेतील ‘ड्यु पॉन्ट’ या प्रसिद्ध कंपनीमध्ये उच्च पदावर पोचणार्‍या आणि सुपरकंडक्टर्सवर मोलाचं संशोधन करणार्‍या उमा चौधरीचा जन्म मुंबईचा, 1947 सालचा. शाळेत असतानाच उमाला विज्ञानाची आवड उत्पन्न झाली, त्यातही भौतिकशास्त्र हा तिचा आवडीचा विषय. पुढे भौतिकशास्त्र विषय घेऊन ती 1968 साली मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये तिचं शिक्षण झालं. न्युक्लिअर फिजिक्स शिकण्याच्या हेतूने तिने अमेरिका गाठलं. पण दोन व्यक्तींच्या प्रभावामुळे भौतिकशास्त्रावरून तिची गाडी रसायनशास्त्राकडे वळली. त्यातील एक व्यक्ती म्हणजे तिचा भावी पती विनय चौधरी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे प्रो. पॉल डुवेझ. 
 
 
पॉल डुवेझ हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) मध्ये मटेरियल्स केमिस्ट म्हणून काम करीत होते. 1970 साली उमाने कॅलटेकमधून पदव्युत्तर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर अगदी थोडा काळ उमाने फोर्ड मोटर कंपनीमध्ये काम केले आणि लगेचच ती पीएच. डी. करण्यासाठी मॅसॅच्युसेटस्‌ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये दाखल झाली, आणि मटेरियल्स सायन्स विषयात 1976 साली तिने डॉक्टरेट प्राप्त केली.
 
ड्यु पॉन्ट या नावाजलेल्या कंपनीमध्ये वैज्ञानिक म्हणून उमाने आपले करिअर सुरू केले. विलिंमग्टन येथील प्रयोगशाळेत तिने अनेक संशोधनाचे प्रकल्प राबवले. त्यातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॉनच्या उत्पादनाच्या नवीन फायदेशीर पद्धती शोधून काढणे. हा पदार्थ द्रावक म्हणून औद्योगिक जगात वापरला जातो. उमाने हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला.
 
उमाने आता सिरॅमिक्सवर काम करायला सुरवात केली. सिरॅमिक्स हे चिनी मातीच्या भांड्यांप्रमाणे असतात, ज्यांचे रासायनिक गुणधर्म काचेप्रमाणे असतात. सिरॅमिक्स हे विद्युतवाहक नसतात. त्यामुळे अनेक विद्युत उपकरणात इन्सुलेटर म्हणून त्यांचा उपयोग केला जातो. उमाने आपले रसायनशास्त्राचे ज्ञान वापरून विद्युतवाहक सिरॅमिक्स बनवले. धातुपेक्षाही चांगले विद्युतवहन करणारे सिरॅमिक्स तिने तयार केले. अशा पदार्थांना सुपर कंडक्टर्स असे म्हटले जाते. त्याचे अनेक उपयोग आहेत.
 
उमाने जे तंत्रज्ञान तयार केले, त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक पॅकेिंजग, फोटोव्होस्टाईक्स, बॅटरीज, बायोफ्युएल आणि इतर अनेक उत्पादनांत होतो. ज्यांचा वापर आपण आज आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतो. ड्यु पॉन्ट कंपनीने आता उमाच्या ज्ञानाचा उपयेाग कंपनीच्या व्यवस्थापनात करण्याचा निर्णय घेतला. संशोधन आणि व्यवस्थापन या दोन्ही मोठ्या जबाबदार्‍या सांभाळण्यात ती यशस्वी ठरली. 2006 मध्ये उमा चौधरी ड्यु पॉन्ट कंपनीच्या मुख्य विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकारी पदावर विराजमान झाल्या. या पदावर 2010 पर्यंत काम करून त्या सेवानिवृत्त झाल्या. 33 वर्षे त्यांनी कंपनीला आपली सेवा दिली. 1996 साली उमा चौधरींची नॅशनल अॅकेडमी ऑफ इंजिनीअर्समध्ये निवड करण्यात आली. अमेरिकन अॅकेडमी ऑफ आर्टस्‌ अॅन्ड सायन्सेसमध्ये 2003 साली त्यांची निवड करण्यात आली. मुंबईमध्ये जन्मलेल्या एका मुलीने उत्तुंग झेप घेत अमेरिकेतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा ही खरोखरच गौरवाची बाब नाही का ?
9404848496