धुरंधर औरंगजेब

    दिनांक :01-Sep-2019
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
 
शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण, असा प्रश्न विचारला तर हमखास जे नाव पुढे येते- ते म्हणजे ‘औरंगजेब!’ असे म्हणतात की जर तुम्हाला नायकाला समजून घ्यावयाचे असेल तर पहिले खलनायक समजावा लागतो. जसे राम समजून घेण्याआधी रावण समजावा लागतो, म्हणजे लक्षात येते की मायावी, सामर्थ्यवान, बुद्धिवान रावणासोबत लढताना रामचंद्रांना किती तयारी करावी लागली असेल. तसेच शिवाजीराजांना समजून घ्यायचे असेल तर कुटिल, धूर्त अन चाणाक्ष औरंगजेब समजून घ्यावा लागतो. तसे न केल्यास शिवाजीराजे अन्‌ एकूणच मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम समजणे अशक्य होऊन जाते. औरंगजेब! मूळ नाव अबुल मुझफ्फर मोईनुद्दीन! त्याचे अलकाब (राजबिरुदावली) होते हजरत सलामत किबला-ए-दीन-ओ-दुनिया अबुल मुज़फ्फर मोईउद्दीन शहंशाह-ए-गाज़ी आलमगीर बहाद्दर बादशाह मुहम्मद औरंगजेब! औरंगजेब ही त्याची पदवी आहे, नाव नव्हे! औरंगजेबचा अर्थ आहे, ‘तख्ताची शोभा!’ खुर्रम (म्हणजेच शाहजहॉं) व मुमताज महलच्या 8 मुलांपैकी सहावे अपत्य व तिसरा मुलगा असलेल्या औरंगजेबाचा जन्म 24 ऑक्टोबर 1618 ला गुजरातेतील दाहोद येथे झाला. त्याच्यापेक्षा मोठी भावंडं म्हणजे पुरहुनार बेगम, जहॉंआरा बेगम, दारा शिकोह, शाह शुजा, रोशनआरा बेगम व लहान भावंडं म्हणजे मुराद बख्श व गौहरा बेगम. त्यावेळी शाहजहॉं गुजरातचा सुभेदार होता. जून 1626 मध्ये शाहजहॉंने त्याच्या वडिलांविरुद्ध (जहॉंगीर) केलेले बंड मोडण्यात आले आणि दारा शुकोह आणि केवळ 8 वर्षांच्या औरंगजेबाला त्यांचे आजोबा जहॉंगीर यांनी लाहोरच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. पुढे दोन वर्षांनी म्हणजे 26 फेब्रुवारी 1628 ला शाहजहॉं बादशाह घोषित झाला आणि औरंगजेब वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या आई-वडिलांकडे परत आला. इथून त्याचे लौकिक शिक्षण सुरू झाले. 

 
 
वयाच्या 14 व्या वर्षी घडलेली एक घटना औरंगजेबाचे शौर्य दाखवते. शाहजहॉंने हत्तीची झुंझ आयोजित केली होती. ती पाहण्यासाठी हे सगळे राजपुत्र घोड्यावर बसून गेले होते. सुंदर नावाच्या पिसाळलेल्या हत्तीने प्रतिस्पर्धी हत्तीला पळवून लावले व समोर घोड्यावर बसलेल्या औरंगजेबावर हमला केला. औरंगजेबाने आपल्या मांडीने घोड्याला दाबून धरले पण हत्तीने घोड्यासकट त्याला खाली पाडले. खवळलेला औरंगजेब तलवार घेऊन उठला व हत्तीच्या सोंडेवर सपासप वार करू लागला. इतक्या कमी वयातही तो असा मर्दाना होता. औरंगजेब स्वभावाने अत्यंत सावधचित्त होता. एकदा दारा शिकोहने आपला नवीन बांधलेला महाल पाहण्यासाठी वडील शाहजहॉं व आपल्या सर्व भावंडांना बोलाविले. आलिशान महालाची शोभा दाखवत असताना तो सर्वांना तळघराकडे घेऊन गेला. सर्वांनी आत प्रवेश केला पण औरंगजेब काही केल्या आत आला नाही. पुढे त्याच्या बहिणीने त्याला असे करण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला की खाली येताना मला असे कळले की या तळघरला केवळ एकच दरवाजा आहे आणि तो जर दारा शुकोहने बंद करून टाकला तर काय. म्हणून मी आत प्रवेश केला नाही. इतिहास आपल्याला असे सांगतो की प्रत्येक वेळी हा माणूस असाच सावध आहे.
 
मोगलांच्या पद्धतीप्रमाणे शाहजाद्याला दख्खनचा सुभेदार करण्यात येत असे. औरंगजेब वयाच्या व्या वर्षी सुभेदार म्हणून दख्खनमध्ये उतरला. त्याचा मुक्काम खडकी येथे होता, त्याने खडकीचे नाव बदलवून औरंगाबाद करून टाकले (आणि दुर्दैवाने आम्ही आजही ते मिरवतोय्‌.) इकडे शाहजहॉं आपला थोरला मुलगा दारा याला हळूहळू कारभार सोपवत होता. 1644 ला औरंगजेबाची एक बहीण वारली, तिच्या दुखवट्याला औरंगजेब 3 आठवड्यांनी आल्यामुळे क्रोधीत झालेल्या शाहजहॉंने त्याला दख्खनच्या सुब्यावरून बरखास्त केले व 7 महिनेपर्यंत दरबारात येण्याची बंदीही घातली. पण नंतर त्याला गुजरातचा सुभेदार बनविण्यात आले व पुढे बाल्खच्या (अफगाण-उजबेक), मुल्तान, िंसध या प्रदेशांमध्ये पाठविण्यात आले. पण इथे त्याला अनेकवेळा पराभवाचा सामना करावा लागला. 1652 मध्ये त्याला पुन्हा दख्खनची सुभेदारी देण्यात आली. प्रामुख्याने विजापूरकर व गोवळकोंड्याशी त्याची झुंझ होती. पण इथेच एका आदिलशाही सरदाराच्या सामान्यशा पोराने त्याला आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. आपल्या वकिलाला त्याच्याकडे पाठवून या पोराने मुगलीया सल्तनतीच्या महत्त्वाच्या बाजारपेठांवरच छापा घातला. औरंगजेबासारख्या धूर्त शाहजाद्यालाही ही चाल कळायच्या आधी त्याच्या पेठा लुटल्या गेल्या होत्या. या पोराचे नाव होते- ‘शिवाजी राजे!’ हा औरंगजेब व शिवाजीराजांचा पहिला सामना.
 
औरंगजेब इस्लामला मानणारा कडवा मुसलमान होता. इस्लाममध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे त्याने आयुष्यभर पालन केले होते. इस्लाममध्ये मद्य वर्ज्य मानण्यात आले आहे, यानेही कधी मद्याला हात लावला नाही. रोज पाच वेळा नमाज पढण्याचा त्याचा क्रम चुकला नाही. एका लढाईमध्ये तर समोरून तोफगोळे पडत असताना नामजची वेळ झाली म्हणून औरंगजेब ऐन रणमैदानावरच नमाज पढायला बसला इतका तो कट्टर अन्‌ जिगरबाज होता. इस्लामनुसार प्रत्येक माणसाला चार विवाह करण्याची परवानगी आहे, यानेही चारच विवाह केले. त्याशिवाय त्याने कुठल्याही स्त्रीवर अत्याचार केलेला दिसत नाही. औरंगाबादेजवळ कुण्या एका हिराबाई नामक दासीवर त्याचे अत्याधिक प्रेम होते असे सांगतात पण ही प्रेमकहाणी 8-9 महिन्यांमध्येच तिच्या अकाली मृत्यूमुळे संपुष्टात आली. औरंगजेबाची पहिली पत्नी दिलरसबानू बेगम, जिच्यापासून जेबुन्नीसा, झिनतुन्निसा, जुबेदतुन्निसा, आज्जम व अकबर ही मुले झाली. नवाबबाई ही दुसरी पत्नी, जिला मुहम्मद सुलतान, मुअज्जम, बदुन्नीसा ही मुले होती. औरंगाबादी महल या तिसर्‍या पत्नीला मेहेरुन्निसा ही मुलगी होती. तर चवथी पत्नी उदेपुरी बेगम हिला कामबख्श नावाचा मुलगा होता.
 
1657 ला शाहजहॉं आजारी पडला, त्याने लोकांना दर्शन देणे बंद केले (अकबरापासून ही प्रथा सुरू झाली होती की बादशाहने सकाळी खिडकीमध्ये उभे राहून जनतेला दर्शन द्यावे). यामुळे लोकांना वाटू लागले की शाहजहॉं मेला असावा. मोगलांची सत्तेसाठी असलेली रक्तपिपासू वृत्ती जगजाहीर होती. बापाच्या मरणाचीच वाट पाहत असलेले सगळे राजपुत्र दिल्लीकडे दौडत निघाले. शाहशुजाने स्वतःला बंगालचा अधिपती घोषित केले, पुढे तो डाक्यापलीकडे (आजचे ढाका, बांगलादेश) गेला पण त्याचे काय झाले ते इतिहासाला ठाऊक नाही. इकडे औरजंगजेबाने धाकट्या मुरादला वचन दिले की दाराविरुद्ध आपण एकत्र लढू आणि विजय प्राप्त झाला की मी तुला शहंशाह करतो, मुरादनें ते मान्य केले व सुरत लुटून युद्धासाठी प्रचंड संपत्ती मिळविली (म्हणजे सुरत फक्त शिवाजीराजांनी लुटली नाही, स्वतः शाहजाद्यानेही ती लुटलेली आहे.) 29 मे 1658 रोजी शामूगडला दारा आणि औरंगजेबाची समोरासमोर गाठ पडली अन्‌ घनघोर युद्ध झाले. पण मुळात दाराचा युद्धतंत्राचा अभ्यास कमी पडला की काय कोण जाणे, पण तो एक मोठी चूक करून बसला न त्याच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. पुढे त्याने दारा शुकोह व त्याचा मुलगा सुलेमान शुकोह यांची हत्या करविली. 1659 ला त्याने आजारी शाहजहॉंला कैद करून आग्य्राच्या किल्ल्यात ठेवले व 5 जून 1659 ला स्वतःला शहंशाह घोषित केले. इतकेच नव्हे तर ज्या मुराद बख्शला त्याने वचन दिले होते तेसुद्धा पाळले नाही व मुरादला पहिले बंदी बनवून नंतर 1661ला त्याची हत्या घडवून आणली.
 
औरंगजेब इस्लामचा कट्टर समर्थक होता. त्याला कुराण तोंडपाठ होते (अशांना इस्लाममध्ये ‘हाफीज’ म्हणतात.) कुराणच्या दोन प्रती त्याने स्वहस्ते लिहून मक्का व मदिना येथे नजर केल्या होत्या. त्याला हदीससुद्धा (इस्लामी कायदा) मुखोद्गत होते. त्याने इस्लामच्या तत्त्वांवर कुराणला आपल्या शासनाचा आधार बनवला. त्यानुसार नौरोजचा सण साजरा करणे, अफीमची शेती करणे इत्यादींवर बंदी घातली. तीर्थकर परत सुरू केला. हिंदू सणांवर बंदी घातली. मंदिर तोडण्याचे आदेश दिले. ओरिसामधील अनेक मंदिरांचा प्रचंड विध्वंस केला. हिंदूंचे सर्वात जुने तीर्थक्षेत्र वाराणसीचे विशवनाथाचे भव्य मंदिर त्यानेच पाडले. भारताला दार-उल-हरब म्हणजे काफरांच्या देशापासून दार-उल-इस्लाम म्हणजेच इस्लामचा देश करण्याची त्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. अर्थात त्याने काही मंदिरांना वर्षासन दिल्याचे दाखलेही मिळतात पण त्याचे कारण मंदिरांवरची निष्ठा नसून त्या त्या प्रांतातील राजकीय समतोल सांभाळण्यासाठी होते. काश्मिरातील हिंदूंवर मोगलांकडून प्रचंड अत्याचार व धर्मांतरणे होत असताना शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांनी मध्यस्थी केली तर औरंगजेबाने त्यांचीही हत्या केली. त्याचा प्रकोप फक्त हिंदूवरच नव्हे तर शिया, बोहरी, सुफी आदींवरही कोसळला. पण तो इतका क्रूर असतानाही इतर मोगल बदशांप्रमाणे विलासी अजिबात नव्हता.
 
स्वतः अत्यंत सामान्य आयुष्य जगत असताना टोप्या शिवून तो आपला उदरनिर्वाह करी. पण इस्लामी बादशाह म्हटले की त्याला जे आवश्यक आहे ते अत्याचार करायला तो मागेपुढे पाहत नसे. तो स्वतः राजनीतिशास्त्र, व्यवस्थापन, शस्त्रास्त्र आदींमध्ये पारंगत होता. एक उत्तम योद्धा आणि तितकाच जबर मुत्सद्दीही होता. भूगोल आणि भौगोलिक परिस्थितीचा त्याचा अभ्यासही वाखाणण्याजोगा होता. आपल्या मनातील भावना सहजासहजी व्यक्त होऊ न देणे, दुसर्‍याच्या मनातील इंगित ओळखणे आदी विद्या त्याला माहिती असाव्यात. कामबख्शला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो की-‘कुठेलेही काम हे केवळ नजरेच्या इशार्‍याने व संकेतांनीच व्हायला हवे.’ इथे आपल्याला त्याचा व्यवस्थापनातील बारकावा दिसतो. इटालियन निकोलाव मनुची आपल्या ‘स्टोरीया डी मोगोल’ (असे होते मोगल!) या पुस्तकामध्ये सांगतो की- ‘एकदा बादशाहने (औरंगजेबाने) झुल्फिकारखानास सांगितले की काम यशस्वी करायचे असेल तर शत्रूशी खोटे बोलणे, कपट करणे, खोट्या शपथा देणे असे काहीही करा पण दिलेले कार्य तडीस न्या.’ मासिरी अलामगिरीचा कर्ता साकी मुस्तैदखान लिहितो की- ‘औरंगजेबाने एका झटक्यात हिंदू कर्मचार्‍यांना बडतर्फ केले, हिंदूंची मंदिरे पडून टाकली. बादशाहच्या काळात हिंदूंची जितकी मानहानी झाली तितकी यापूर्वी कधीही झालेली नाही.’
 
या सर्व गोष्टींवरून असे लक्षात येते की औरंगजेबाचे व्यक्तिगत जीवन जरी साधे असले तरी त्याची राजकीय कारकीर्द अतिशय वादळी व धर्मांध होती. तो अत्यंत पराक्रमी, जिगरबाज तर होताच पण सावधही होता. आपल्या बापाला कैदेत घालण्यापासून तर भावांचे मुडदे पाडण्यापर्यंत त्याची मजल होती. सत्तेसाठीच त्याने आपला एक मुलगा मुहम्मद सुलतान याची देखील हत्या केलेली होती. तो इस्लामचा कट्टर समर्थक तर होताच पण हिंदूंबद्दल एक असह्य घृणा त्याच्या मनात असल्याचे आपल्या निदर्शनास येते. अखिल हिंदुस्थानचे राजकारण आपल्या बोटांवर खेळविणारा व दूरदूरच्या बातम्या आपल्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत यशस्वीरीत्या मिळविणारा कुशल प्रशासक होता. एका क्षणात लोकांना मोठे करणारा व नकोशा व्यक्तींची हत्या घडवून आणणारा हुशार सम्राट होता. आणि अशा या बहुरंगी, पाताळयंत्री, सावध, क्रूर, धूर्त, कावेबाज, मुत्सद्दी, पराक्रमी औरंगजेबाकडे शिवाजी महाराज आलेले होते. 11 मेची रात्र उलटत आली होती, शिवाजीराजांसमवेत सर्व टोपीकर व सुलतानांच्या नजरा स्थिरावल्या होत्या 12 मे रोजी होणार्‍या शिवाजी-औरंगजेब भेटीवर. ही भेट हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरते की औरंगजेब अथवा शिवाजीराजांचे जीवित धोक्यात आणते ते दुसर्‍या दिवशीच समजणार होते. (क्रमशः)
••