खंजीर काळजात घुसला!

    दिनांक :01-Sep-2019
आता या अशा शीर्षकाचे दुसरे संगीत नाटक लिहिले जावे. एकतर बराच काळ झाला, चांगलं संगीत नाटक रंगभूमीवर आलेले नाही आणि राजकीय नाटकही आलेले नाही. त्यामुळे आता ही योग्य वेळ आहे. कारण परवा साहेबांचा लाडका खंजीर त्यांच्याच काळजात खुपसला गेला. एका पत्रकाराने अनवधानाने का होईन हे काम केले.
 
साहेब आजकाल अस्वस्थ असतात. नाहीतर साहेबांचे पाणी खूपच खोल, तळ दिसत नाही अन्‌ ढवळूनही काढता येत नाही. साहेबांच्या या खोलपणाचे खूपसारे किस्से आजही लोक कडवट कौतुकाने सांगत असतात. साहेबांनी सांगितले, मंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी करा, तर आनंद मानून घ्यायचा नाही. खरेच तशी तयारीही करायची नाही. आधी साहेबांनी दाखविलेली नावाची यादी साहेबांनी सफारीच्या कुठल्या खिशातून काढली, हे बघून घ्यायचे अन्‌ त्यातही आपले नाव हिरव्या शाईत लिहिले आहे की लाल, तेही पाहून घ्यायचे अन्‌ मग आनंदाचा निर्णय घ्यायचा...
 
साहेब अन्‌ खंजीर यांचे तर जवळचे नाते आहे. त्यांनी असा काही वर प्राप्त केला होता म्हणे की त्यांना कुणाच्याही पाठीत खुपसण्यासाठी खंजीर देण्यात आला होता. तेव्हापासून साहेबांच्या जवळचे अन्‌ दूरचेही साहेबांना पाठ दाखवित नव्हते अन्‌ साहेबांनाही खंजीर कुणाच्या पाठीत खुपसायचा ही नावे पाठ होती... त्यामुळे साहेबांकडे तोंड करून ‘हिज मास्टर्स व्हॉईस’च्या पोझ मध्ये बसून राहायचे, असा आजवरचा शिरस्ता होता. आता मात्र खंजिराची धार कमी झाली अन्‌ साहेबांची राजकीय तैलबुद्धीही क्षीण झाली. त्यामुळे आता जो तो साहेबांना पाठ दाखवू लागला आहे. सतत साहेबांकडे तोंड करून राहिल्यावरही शाबासकी देण्याच्या मिशाने का होईना साहेबांनी पाठीवर हात फिरविल्याच्या रक्तबंबाळ आठवणी साहेबांना सोडून जाणारे त्यांचे सरदार कळवळून सांगत असतात. संस्थान खालसा झाले आहे. त्यामुळे साहेबांकडे आता राजकारणाची गीता सांगण्यासाठी ‘पार्थ’ तरी उरणार नाही की काय, अशी भीती वाटू लागली आहे. सोन्या-चांदीचे भाव, शेअर बाजार आणि आजचे हवामान जसे वर्तमानपत्रांना रोजच द्यावे लागते, तसेच घड्याळाचे काटे गोतास काळ ठरू नये म्हणून साहेबांना सोडून जाणार्‍यांची नावेही आजकाल वर्तमानपत्रांना प्रकाशित करावी लागत आहेत.
 
 
 
सुरुवात झाली तेव्हा साहेबांच्या मुत्सद्देगिरीवर भयंकरच विश्वास असणारे काही भक्त म्हणत होते की, यातही साहेबांची काहीतरी चाल असली पाहिजे... आता मात्र कळते आहे की साहेबांचेच काही चालेनासे झाले आहे. कधीकाळी म्हणजे साहेबांच्याच सत्ताकाळात ‘ओपन’ आणि ‘क्लोज’चे आकडे यायचे. आता ते बंद झाले आहेत. मात्र साहेबांच्या मावळ्यांनी त्यांना सोडून जाण्याचे आकडे आजकाल साहेब सकाळी ओपन आणि रात्री क्लोज मध्ये घेत असतात. रात्री साहेब त्यांच्या घरी पोहोचतात आणि मग लेकही घरी दिसली की त्यांना हायसे वाटते. ती दिसूनही ते एकदा विचारूनच घेतात की, तू आहेस ना आपल्या पक्षात? तीही आजकाल, काय बाबा, तुम्हाला न सांगता कशीकाय जाणार मी?, असे म्हणत गुगली टाकत असते...
 
आता अशी स्थिती आहे. त्याला दयनीय, असे म्हणावे का? आता मोठ्या लोकांच्या बाबत कुठले शब्द वापरायचे, हाही एक सुसंस्कृतपणाचा प्रकार आहे. सामान्यांनी पिली ती दारू अन्‌ मोठी माणसं प्राशन करतात ते मद्य... साहेब तर जाणते राजे महाराष्ट्राचे. त्यामुळे त्यांच्याशी बा-अदबच बोलले पाहिजे. राज्य गेले, सरदार सोडून चालले, जनतेने तर कधीचीच पाठ फिरविली आहे... तरीही, तरीही साहेबांना काय प्रश्न विचारायचे, त्यांच्या बद्दल काय छापायचे आणि त्यांना काय म्हणायचे, याचे नियम आहेत आणि ते साहेबांनीच लावले आहेत. ज्येष्ठ आहेत ते, त्यांना मान आहे... असे असताना एका उद्दाम पत्रकाराने साहेबांना प्रश्न केला, ‘‘तुमचे नातेवाईक सोडून जात आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे?’’ साहेबांचा चेहरा एकदम रागीट झाला. साहेब चक्क चिडले. त्यांनी त्या पत्रकाराची चांगलीच खरडपट्टी काढली.
 
त्या लवलवत्या जिभेच्या पत्रकाराला पत्रपरिषदेच्या बाहेरच घालवावे, असे साहेबांचे म्हणणे होते. साहेबांची सत्ता असती तर त्यांनी त्या पत्रकाराची जिभच हासडली असती. अर्थात सत्ता असती तर साहेबांचे आप्त त्यांना असे सोडूनच जाते ना... मग असला प्रश्नच विचारला गेला नसता. मात्र, आता ‘सत्तेमुळे मती फिरली, मती फिरल्याने सत्ता गेली अन्‌ इतका अनर्थ झाल्यावर माणसंही फिरली’ अशी अवस्था. राज्य गेलेे तरी का होईना; पण राजाचा ना! त्यांनी मग त्या अशिष्ट पत्रकाराला माफी मागायला लावली आणि मगच पत्रपरिषद पुढे सरकली... आता यावर अनेकांना असे वाटते की, हा पत्रकाराचा अपमान आहे. पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत अन्‌ आता साहेबांसारख्यांनी चढविलेला हा वेगळ्या प्रकारचा हल्लाच आहे. त्यात रक्तपात नाही झाला; पण अश्रूपात नक्कीच झाला आहे. ही जी काय मानहानी झाली आहे त्यापेक्षा गर्दन उडविणे केव्हाही मानाचे ठरले असते...
 
आता या साहेबांनी बाळासाहेबांना, ते पत्रकारांशी नीट नाही बोलत म्हणून चार खडे बोल कधीतरी सुनावले असल्याचा दाखलाही देण्यात आला... आता पत्रकारांच्या संघटना गप्प का, असाही एक सवाल निर्माण करण्यात आला आहे. एका ‘स्वाभिमानी’ (हा प्रकार असतो माणसांचा, हे साहेबांसारख्या राजकारण्यांना कसे कळणार?) अन्‌ उसळत्या रक्ताच्या पत्रकाराने तर, यापुढे साहेबांच्या पत्रपरिषदेवर कायमच बहिष्कार घालायचा निर्णय घेतला जायला हवा, अशीही मागणी केली आहे... पण, तसे नाही. काहीही झाले तरीही साहेब आखीर साहेब आहेत. आता त्या पत्रकाराचा प्रश्न असा काही वाईट नव्हता. इतका जिव्हारी लागावा अन्‌ चक्क संस्कृतीच धोक्यात यावी, असे काहीही नव्हते त्यात. लोक सोडून जात आहेत, त्यात जवळचे आहेत, आप्त आहेत, नातेवाईक आहेत तर मग का जात आहेत, असे विचारले तर चूक ते काय त्यात? पण, नाही, साहेबांचे वय काय, अवस्था काय... त्यांची अशी चोहोबाजूंनी कोंडी झाली असताना असला प्रश्न का विचारावा? बरे साहेबांना त्यांची माणसे का सोडून जात आहेत, या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही, असा सुज्ञ माणूस उभ्या महाराष्ट्रात तरी नसावा.
 
आता या प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही ते दिले नाही तर डोक्याची शंभर शकले होऊन आपल्याच पायाशी लोळण घेतील, अशी अवस्था. असे असताना साहेबांना हा प्रश्न कशाला विचारायचा? म्हणजे त्यांच्या तोंडूनच तुम्हाला हे ऐकून घ्यायचे आहे का? की, ‘‘अरे बाबा, आता माझा करिश्मा संपला आहे. आता राजकारणही संपत आले आहे माझे. पाच वर्षे लोकांनी वाट पाहिली की आता सुधारेल स्थिती, पण नाही झाले तसे. मी आपला टपलीबाज राजकारण करण्यात अन्‌ माझे, आपले वाचविण्यात स्वत:ला खर्ची घालत राहिलो. सत्तेत असताना लाथाही गोड वाटतात लोकांना, मात्र अतीच झाले अन्‌ हसू आले अशी गत झाली.
मी साडेचार जिल्हे म्हणजेच महाराष्ट्र समजत राहिलो. ज्ञातीबांधवांच्या भरोशावर सत्ता मिळवित राहिलो अन्‌ कुटुंबियांमध्ये वाटत राहिलो. वाचवायचा तो दादा अन्‌ तुरुंगात घालायचा तो छगन... अशी नीती ठेवली. म्हणून आता माणसे सोडून जात आहेत...’’
 
शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना, ‘‘आता कसे वाटते?’’ असा दंडुकेबहाद्दर वृत्तवाहिनी थाटांचा प्रश्न विचारण्यासारखेच नाही का हे? उलट त्या पत्रकाराने साहेबांना एक सभ्य- सुसंस्कृत प्रश्न विचारायला हवा होता, ‘‘साहेब, तुम्ही कधी जाणार भाजपात?’’