साहित्यातील श्रीगणेश...

    दिनांक :01-Sep-2019
संगीता वाईकर
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ असे म्हणून श्रीगजाननाला नमन करून ज्ञानेश्वरी या सर्वश्रेष्ठ ग्रंथाला प्रारंभ केला. गण म्हणजे समूह आणि जो समूहाचा अधिपती तोच गणपती. या समूहात कला, विद्या, खेळ, कष्टकरी, सर्वच प्रकारच्या माणसांना एकत्र आणणारा देव म्हणजे प्रत्यक्ष गणराय. बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा स्वामी म्हणजे देवांचा देव गजानन होय.
 
गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलंची, विद्येची, प्रतिभेची आणि मानवी जीवनातील शुभंकराची आणि म्हणूनच अगदी मनोभावे, प्रेमाने, आस्थेने आपण तिचे पूजन करतो, वंदन करतो. कोणत्याही शुभकार्याचा मान म्हणूनच आपण श्रीगणेशाला देतो. आपल्या संस्कृतीतही गणेशोत्सवाला फार मोठे स्थान आहे. 10 दिवसांच्या कालावधीत श्रीगणेश आपल्या भक्तांसाठी साक्षात पृथ्वीवर अवतरीत होतो आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. भक्तिभावाने त्याचे पूजन करणारा भक्त आणि देव यांच्यात एक अनोखे नाते निर्माण होते. निसर्ग संपन्न-समृद्ध तर असतोच, पण आनंद, उत्साह यामुळे वातावरण अक्षरशः भारावून जाते. 

 
 
आपल्या महाराष्ट्रात गणेशभक्तीची परंपरा आहे. त्याचप्रमाणे गणेशभक्तांची मांदियाळी आहे. गणेशभक्तीची विविधस्थाने वेदपुराणाने मान्य केली आहेत, त्यात गणेशाचा मान प्रथम आहे. गणपती हा देवांचा सेनापती आहे. सेनापती म्हटलं की तो सर्वांचे ऐकून घेणारा, अपराध पोटात घालणारा, सरळ विचार करणारा, सर्वांकडे बारीक नजर ठेवणारा, असा हा दीनदुबळ्यांचा पाठीराखा आहे. बुद्धिवंतांचा दाता आहे. साहित्याचा ज्ञाता आहे. कलेचा उद्गाता आहे. भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून ते रंगभूमीपर्यंत सर्वत्र अग्रस्थानी पूजन केल्या जाणार्‍या गणांचा पती िंकवा नेता आहे. गणपतीचे गुणवर्णन करणार्‍या अनेक कथा वेद-पुराणात, साहित्यात आहेत तसेच अनेक अभंग, श्लोक, गाणी, आरत्याही लिहिल्या गेल्या आहेत. एवढेच नाही तर शिक्षणाचा प्रारंभ करत असताना सर्वप्रथम ‘श्रीगणेशाय नमः’ असं लिहूनच प्रारंभ केला जातो, जेणेकरून त्याच्या आशीर्वादाने प्रत्येक व्यक्ती ज्ञानी होऊन तिचे जीवन समृद्ध होईल. साहित्यातील गणपती हा विषय अभ्यासताना आपल्या विचारांना प्रेरणा देणार्‍या गणेशाचे स्वरूप आणि गुण याचे दर्शन घेताना साहित्य, जे देवनागरी या मराठी लिपीची मूळ संस्कृत लिपी आहे. या लिपीचा निर्माणकर्ता स्वतः सिद्ध गणेश आहे. म्हणूनच ‘देवां तूचि गणेशु’ असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. श्रीगणेशाची लिपी सरळ, स्वच्छ मनाचे व लेखनाचे प्रतीक आहे. गणेशाने विविध अवतार घेतले ते सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि म्हणूनच सुखकारक आणि दुःखहारक असे म्हणून त्याला पूजले जाते. अनेक देवतादेखील श्रीगणेशाला शरण गेल्या आहेत ते त्याच्या श्रेष्ठतेमुळेच.
 
आपली भाषा, त्यातील शब्द, त्यांचे उच्चार यांचा प्रारंभ ‘ॐ’कारातून झाला. ‘गं’ हे गणेशमंत्राचे मूळ बीज. ‘गं’ म्हणजे स्वयंभू. शब्दब्रह्म, बादब्रह्म, परब्रह्म आणि परमार्थ या सर्वांमध्ये गणपतीचे अधिष्ठान आहे. कलियुगात गणपतीचे नाव धूम्रवर्ण आहे. धूम्र म्हणजे धूर. आज वातावरणात जे भयावह प्रदूषण झाले आहे त्या दृष्टीने विचार करता हे नाव सार्थ आहे. संसार नेटका करायला जसे ‘वित्त’ हवे तसे शरीर स्वस्थ ठेवायला ‘पित्त’ हवे आणि परमार्थात ‘चित्त’ हवे. पण, या सर्वांचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यासाठी दूर्वा आणि शमी ही गणेशाची आवडती पत्री या विकारांना आटोक्यात ठेवतात आणि तशीच गरज मानवालाही आहे. साहित्य लेखन करायचे तर मन स्थिर असावे, चंचलता नसावी, हेच मन स्थिर ठेवण्याचे काम ‘अथर्वशीर्षाने’ साध्य होते. डोक्याचे (विचारांचे) थरथरणे नष्ट करणारे हे स्तोत्र म्हणजे ‘अ-थर्व-शीर्ष’ स्तोत्र होय. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ गणेशउपासनेत अंतर्भूत आहे.
 
कोणत्याही शुभप्रसंगी, विद्यारंभापूर्वी पहिले नमन श्रीगणेशाला, पहिले आमंत्रण त्यालाच. तो आला की संकटाचा, अडचणीचा नाश होणार, हा विश्वास प्रत्येक गणेशभक्ताला अगदी मनापासून असतोच. एवढेच नव्हे, तर जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकदही श्रीगणेशाच्या नामस्मरणाने येते, हा विश्वास त्याला मनापासून वाटतो. कवींचा कवी व्यास महर्षी यांनीही ‘ॐ गं गणपतये नमः’ या नवाक्षरी मंत्राचा अखंड जप करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि श्रीगणेशाने व्यास महर्षीचे लेखक म्हणून काम करण्याची नम्रताही दाखविली.
 
गणेशआराधनेने व्यासांना सुचत गेलेले चार वेद, अठरा पुराणे, महाभारत त्यांनी लिहिले. गणेशपुराणातील कथांत गणेश स्थिर बुद्धीचा असून आपले सामर्थ्य आणि बुद्धिकौशल्यावर विश्वास असलेला आहे.
 
श्रीगणपती विद्येचा अधिपती मानला आहे, तरी तो असुरांशी लढणारा, भक्तिभावाला जाणणारा, युद्धतंत्र शोधणारा, कलांमध्ये रमणारा, संगीत, नृत्यकला पारंगत, पंचपक्वान्नांची रुची असणारा असा आहे. आदर्श समाजाचा आदर्श देव. गणपती आनंदाचा उपभोग घ्यायला शिकवतो. म्हणूनच त्याचा नेवैद्य मोदकाने (मोद म्हणजे आनंद) पूर्ण होतो. तो जीवनाचा अर्थ शोधतो, दुसर्‍यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करतो. उत्सव भयमुक्त व सुखपूर्ण व्हावा, असा प्रयत्न करतो.
 
श्रीगणेश मंत्र- ‘गणांना त्वा गणपती’ या मंत्रजपाने क्रोधावर नियंत्रण ठेवता येते. श्रीगणेशाची स्तुती करणारे मंत्र, उपासना सांगणारी स्तोत्रं तसेच वेद, साहित्य, उपनिषदांतून श्रीगणेशाची आराधना केली जाते. श्रीगणेश उपासनेत ॐकारसाधनेवर अधिक भर आहे, तर गणेशपुराण हे सर्वश्रेष्ठ पुराण आहे. श्रीगणेश- ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र या सर्व रूपात आहे आणि ज्ञान व समृद्धी यांची देवता म्हणून गणेशाचे पूजन केले जाते.
 
असा हा देवाधिदेव श्रीगणेशाची उपासना सातत्याने वाढते आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती मनोभावे श्रीगणेशाचे पूजन करते. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारा हा गणपती सुखकारक असाच आहे. त्याच्या दर्शनाने दृष्टी शुद्ध, मन पवित्र आणि चित्त निर्विकार होते. त्याच्या विशाल मस्तकाने ज्ञानाचे, लांब सोेंडेवरून विवेकबुद्धीचे, तर सुपाएवढे कान श्रवणभक्तीचे प्रतीक आहे. विशाल उदर सर्व संग्रह करण्याचे, तर भंगलेला दात अद्वैतभावाची जाणीव करून देणारा आहे. चार हात मन, बुद्धी, चित्त, अहंकार या मानवी विकाराचा बोध करून देतात, तर संकटातून नाश करणारा परशु, भवसागरातून तारणारा पाश, आनंद देणारा मोदक, आध्यात्मिक विकासाचे कमलपुष्प ही चार प्रतीके धारण केली आहेत. दूर्वा हे वृद्धी आणि गारवा देणारे, तर जास्वंद हे रक्तवर्णीय फूल शुभ व पावित्र्याचे प्रतीक आहे. असा हा श्रीगणेश सर्वांचा लाडका, आपलासा वाटणारा देव आहे. ‘मंगलमूर्ती मोरया!’
 
 
••