विघ्नहर्ता सर्वांची मनोकामना पूर्ण करो

    दिनांक :01-Sep-2019
अरुण देशपांडे
 
सांस्कृतिक वारसा लाभलेले आपले कुठलेच सण किंवा उत्सव बंद होऊ नयेतच... पण, साजरीकरणावर चर्चा नक्कीच हवी. गणेशोत्सवाचंच बघा ना... हा उत्सव साजरा करताना बर्‍याच मंडळांना काही गोष्टींचा विसर पडतो. दिवसेंदिवस मंडळांची संख्या वाढतच चालली आहे. आधीच वर्गणीचं भूत कायमच लोकांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यात रस्त्यावरील मंडप, वाहतुकीची कोंडी, ध्वनिवर्धकांचे भोंगाडे, डीजेची धूम, विजेचा अनधिकृत वापर, काही ठिकाणी कार्यकर्त्यांची दंडेली, नियोजनातील अभाव या सर्व गोष्टींची आणखी भर पडली आहे. कालानुरूप उत्सवाचे स्वरूप बदलणे साहजिक आहे. तरीही एक विधायक दृष्टिकोन समोर ठेऊन संघटित संकल्पाची एक पोषक रूपरेखा तयार करणे काही अवघड नाही. 
 
 
धर्मशास्त्र आणि पर्यावणाच्या दृष्टीनेही गणेशाची मूर्ती ही मातीची म्हणजे विसर्जित होणारी असावी, असे आदेशवजा स्पष्ट सरकारी निर्देश असतानादेखील अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची सर्रास विक्री सुरूच आहे. तसेच फॅशनेबल मूर्ती बनवून श्रद्धेला तडा देणे सुरुच आहे. डावी गल्ली असो वा उजवी गल्ली... वर्गणी देणारा तर एकच आहे. मोठ्या मंडळांची तर गोष्टच न्यारी. वर्गणीसाठी प्रत्येकाच्या घरी किंवा दुकानात एक ठराविक आकडा लिहिलेली रसीद टाकून ते मोकळे होतात. मग त्यासाठी तगादा लावतात म्हणून मग वाद होतो. त्या भागातील रहिवासी मानसिक दबावाखाली असतात. स्टेज, मंडप डेकोरेशन, विद्युत सजावट, स्वयंचलित देखावे, प्रसिद्ध वास्तू िंकवा मंदिराचे उभारलेले सेेट्स, ध्वनिव्यवस्था, विसर्जन मिरवणुकीवर होणारा अफाट खर्च या सर्वांचा हिशोब केला तर तो कोट्यवधींच्या घरात जातो. हे सगळे केवळ वर्गणीच्या भरवशावर अशक्यच. मग हा खर्च राजकीय पाठबळ असल्याशिवाय होत नाही. यामुुळे आजचा गणेशोत्सव हा सांस्कृतिक कमी आणि राजकीय जास्त होत चालला आहे. सार्वजनिक गणपतीसुद्धा नवसाचे झाले आहेत; त्यामुळे नवसाची नवलाई ही आज कोट्याधीश झाली आहे. दृष्ट लागावी असे स्टेज, मूर्ती समोरील सभा मंडपात लागलेले एसी आणि पंखे, महागड्या खुर्च्या, ही श्रीमंती, हा थाटबाट, या जेवणावळी बघितल्या नंतर सामान्य माणसाला पडलेला प्रश्न म्हणजे - आजचा गणेशोत्सव हा खरोखरच भक्ती आणि श्रद्धेपोटी साजरा होतोय की केवळ मौज आणि मनोरंजन म्हणून श्रींची स्थापना केली जाते? यात धार्मिक आस्था कुठे? प्रदूषण आणि पर्यावरण याकडे कुणाचेेेच लक्ष नसते. काही शहरे आणि छोटी मोठी आदर्श मंडळे सोडली तर लोकांमध्ये निराशेचाच सूर दिसून येतो. त्यामुळे भीती ही वाटते की आजची अति उत्सवप्रियता उद्या धर्मास बाधक ठरेल की काय!
 
लोकमान्य टिळकांच्या काळापासून सुरू झालेला गणेशोत्सव आज चर्चेत आला कारण आज माणूस देवापेक्षा मोठा झाला. आता हा उत्सव राहिला नसून ही स्पर्धा झाली आहे. छोटी मोठी गणेश मंडळे ही एकमेकांवर कुरघोडी करायला निघालेली आहेत. एक गाव एक गणपती ही संकल्पना आता राजकीय हस्तक्षेपामुळे आता ‘एक राव अनेक गणपती’ अशी झाली आहे. यामुळे विसर्जनाला गर्दी वाढली आहे. मोठ्या मंडळांच्या राजेशाही मिरवणुकीमुळे, ‘तू आधी की मी’, असा विसर्जन वादही वाढला आहे. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीतील शिस्त इतरांनीही पाळण्यासारखी आहे. गणेशोत्सव साजरीकरणाच्या मूळ उद्देशाला धक्का लागू नये, एवढीच लोकांची अपेक्षा असते. संघटित आनंदाचा हा उत्सव असाच सुरू राहावा, अशीच सर्वांची इच्छा. कुठलाही उत्सव त्रासदायक न ठरता सामाजिक आरोग्य चांगलं ठेवणारा असावा हीच लोकांची मागणी. देखाव्यावरील प्रचंड खर्चापेक्षा पूर्वीसारखे वादविवाद, परिसंवाद असे दर्जेदार आणि इतर मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे. श्रीमंत मंडळांनी जनकल्याणाच्या योजना हाती घेतल्यास आदर्श मंडळ म्हणून लौकिकास पात्र ठरू शकतात. आणखी एक विनंती म्हणजे रात्री उशिरा पर्यंत गाणे बजावणे सुरू ठेऊ नये. असे झाले तर परीक्षार्थी, आबालवृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना हायसे वाटेल आणि विघ्नहर्त्याला आनंदच होईल. संघटित शक्तीचा जागर करावा; पण सामाजिक हित लक्षात घेऊन ! विघ्नहर्ता सर्वांची मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा !
9423686600