1118 अंधाना सृष्टीचे दर्शन घडविणारे नेत्रदूत माधवराव माररशेटवार

    दिनांक :01-Sep-2019
वाशीम जिल्ह्यातील 559 नेत्रदात्यांनी केले नेत्रदान
 
वाशीम,
जगातील सर्वात सुंदर अशी गोष्ट म्हणजे सृष्टी, जी विविधतेने नटलेली आहे, ज्यात आपण सर्वजन सामावलेलो आहोत. या सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव अवयव म्हणजे ‘नेत्र’. विचार करा, जर दृष्टीच नसेल तर. आपण हे जग पाहू शकू? मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी कोणीतरी ही सृष्टी पाहू शकेल. यासाठी वाशीमचे जेष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार यांनी 18 वर्षापासून नेत्रदान चळवळीचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या पुढाकाराने आतापर्यंत 559 लोकांनी नेत्रदान केले असून, त्यामाध्यमातून 1118 अंधाना सृष्टी पाहण्याची संधी मिळाली आहे.
 
 
 
नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे. शिवाय नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने कसलीच भीती नाही. नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या आत नेत्र काढणे आवश्यक असते. वाशीम नेत्रदान समिती ही मरणोत्तर नेत्रदानाविषयी मागील 18 वर्षापासून जनजागृतीचे कार्य करित आहे. दृष्टिहींनाची आर्त हाक ऐकून जेष्ठ समाजसेवक, नेत्रदूत मा. कि. मारशेटवार व त्यांच्या मित्र परिवारांनी नेत्रदान प्रचार समितीची (अशासकीय) स्थापना केलेली आहे. समितीचे संस्थापक, अध्यक्ष मा. कि. मारशेटवार हे आहेत. गेल्या 18 वर्षापासून ते नेत्रदान चळवळीचे काम करीत आहेत. यासाठी गावागावात जावून जनजागृती करुन नेत्रदानाचे महत्व ते लोकांना सांगतात. आपल्या मृत्यूनंतर आपल्यालाही जग पाहण्याची संधी आहे. त्यासाठी नेत्रदान करा. तुमच्या नेत्रदानामुळे दोन अंधाचे जीवन प्रकाशमय होईल. त्यांनाही सृष्टी पाहण्याची संधी मिळेल. नेत्रदान म्हणजे मृतू पश्‍चात आपले डोळे अंध व्यक्तीला दृष्टीदान करणे.नंतर दोन अंध व्यक्ती जग पाहू शकतात,हे भाग्याचे आहे! डोळे ही ईश्‍वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील. परमेश्‍वराने माणुसकी या नात्याने दृष्टी असणार्‍या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले, तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल, असे लोकांना सांगतात.
मा. कि. मारशेटवार यांनी नेत्रदान प्रचार समितीच्या माध्यमातून 2001 ते ऑगस्ट 2019 या 18 वर्षात वाशीम जिल्ह्यातील 559 नेत्रदात्यांनी नेत्रदान केले. त्यामुळे 1118 अंधाचे जीवन प्रकाशम झाले आहे. वाशीम जिल्ह्यातून हजारावर लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरुन दिले आहेत. नेत्रदार प्रचार समितीच्या माध्यमातून मा. कि. मारशेटवार हे शाळा, महाविद्यालये, गणेशोत्सव, दुर्गात्सव, रामकथा उत्सव, आदि धार्मिक आयोजनाचे ठिकाणी उपस्थितांचे मरणोत्तर नेत्रदानाविषयी उद्बोधन करित असतात. ग्रामीण भागात रवि मारशेटवार, मरणोत्तर नेत्रदान अभियान सर्व शक्तीनिशी राबवित आहेत. नेत्रदान चळवळीच्या या राष्ट्रीय कार्यात नेत्रदान प्रचार समितीचे रवि मारशेटवार, अविनाश मारशेटवार, डॉ. हरिष बाहेती, ठाकरे, ज्ञानेश्‍वर पोफोडे, घोडके, डॉ. कावरखे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे. मरणोत्तर नेत्रदान अभियान अधिक प्रभावी करण्याकरिता समाजाच्या सर्वस्तरातील सुशिक्षितांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन माधवराव मारशेटवार यांनी केले आहे.