तोयबाच्या आठ अतिरेक्यांना अटक

    दिनांक :10-Sep-2019
- नागरिकांना भडकविण्याचा प्रयत्न
श्रीनगर,
पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना सरकार आणि प्रशासनाविरोधात भडकविण्याचा प्रयत्न करणार्‍या लष्कर-ए-तोयबाच्या आठ अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज मंगळवारी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अटक केली. सोपोर आणि आसपासच्या परिसरासह काश्मीर खोर्‍यातील विविध भागांमध्ये या अतिरेक्यांनी पोस्टर्स लावले होते. काश्मिरात प्रशासनाने नागरी संचारबंदी लादली आहे. नागरिकांनी या संचारबंदीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
 
 

 
 
सोपोरमध्ये तोयबाचे काही अतिरेकी प्रक्षोभक व धमक्यांचे पोस्टर्स लावत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पाठलाग करून जवानांनी त्यांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
हे अतिरेकी दुकानदारांना बाजारपेठ बंद करण्यासाठीही धमकावत होते. या अतिरेक्यांकडे काही शस्त्र व आक्षेपार्ह वस्तू सापडल्या असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमधून भारतात घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानच्या सीमा कृती दल अर्थात्‌ बॅटच्या सात सैनिकांना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले.
 
पाकिस्तानी सैनिकांच्या घुसखोरीचा आणि त्यांचा फडशा पाडण्याचा व्हिडीओ लष्कराने सोमवारी जारी केला. यात पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह देखील दिसत आहेत. 31 जुलै व 1 ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली होती. केरन सेक्टरमधून पाकिस्तानी सैनिकांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय जवानांनी त्यांना रोखले असता, झालेल्या गोळीबारात सात सैनिक ठार झाले होते.