केवळ नियुक्त्या न करता पक्षात निवडणूक घ्यावी

    दिनांक :10-Sep-2019
- शशी थरूर यांचे मत
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
कार्य समितीसह अन्य महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यापेक्षा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केली आहे. कॉंग्रेस कार्यसमितीसह अन्य महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या या संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून करण्यात याव्या, जेणेकरून भविष्यातील नेते त्यातून तयार होऊ शकतील, तसेच पक्षात चैतन्य निर्माण होईल, असे स्पष्ट करत थरूर म्हणाले की, अशी मागणी मी याआधीही अनेकवेळा केली आहे. कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात अशा निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, त्यादृष्टीने पक्ष पावले टाकेल, असा विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केला.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या चांगल्या कामगिरीची दखल घेतली पाहिजे, फक्त त्यांच्या सरकारवर टीकाच करू नये, या कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांच्या विधानाचे शशी थरूर यांनी समर्थन केले होते. मोदी सरकारने केलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत, ज्याकडे सकारात्मक नजरेने पाहात येईल, असे रमेश यांनी म्हटले होते आणि ते खरे आहे, त्यामुळेच मी त्यांचे समर्थन केले होते, असे ते म्हणाले.
 
 
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपली मतांची टक्केवारी 31 वरून 37 वर नेली, कॉंग्रेस मात्र 19 टक्क्यांवरच राहिली, यामागच्या कारणांचा विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा थरूर यांनी व्यक्त केली. राजकीय पदे मिळवण्यासाठी मी कॉंग्रेसमध्ये आलो नाही, तर सर्वसमावेशी भारताचा विचार पुढे नेणारे प्रभावी माध्यम असल्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये आलो, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी कॉंग्रेसने आपला सर्वसमावेशी भारताचा विचार राजकीय फायद्यासाठी सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले. ‘द िंहदू वे अॅन इंट्रोडक्शन टू िंहदुइझम’ हे थरूर यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.