ट्रेकिंगची धमाल अनुभवायची तर...

    दिनांक :10-Sep-2019
दोस्तांनो, पावसाळ्यात ट्रेकिंग करायला खूप धम्माल येते. आकाशातून कोसळणार्‍या जलधारांमध्ये चिंब भिजत आपण डोंगरमाथ्याच्या दिशेने कूच करू लागतो. हिरवाईने नटलेला आसपासचा परिसर आपल्याला खुणावत असतो. मान्सून ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण म्हणजे कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. 1646 मीटर उंचीचं कळसूबाई शिखर गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षित करतं. मान्सूनमध्ये तर या परिसराचं सौंदर्य खूप खुलतं. 

 
 
कळसूबाई परिसरात सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो.तो ऐकण्यासारखा असतो. सूर्योदयाचा सुंदर नजारा मन खिळवून ठेवतोे. सकाळची सूर्यकिरणं अंगावर झेलत आपण मस्तपैकी ट्रेकिंग करू शकतो. इथे तुम्ही वन्यजीवनाचा आनंद लुटू शकता. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याला भेट द्यायला विसरू नका. कसळूबाई मंदिरातही जा. बारी या गावापासून कळसूबाईच्या ट्रेकिंगला सुरूवात होते. भंडारदर्‍यापासून हे गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकहून हे ठिकाण जवळ आहे. मुंबई-पुण्याहूनही कळसूबाईला जाता येतं. मग यंदाच्या मान्सूनमध्ये कळसूबाईची सैर नक्की करा.