चौराकुंडच्या जंगलात सांबराची शिकार

    दिनांक :10-Sep-2019
धारणी, 
धारणी तालुक्यातील चौराकुंड जंगलातील उत्तर मालूर वनखंडातील झालेल्या सांबराच्या शिकाराची माहिती 5 दिवसानंतर प्राप्त झाल्यावर बालाजी धिकारला व्याघ्रच्या कर्मचार्‍यांनी अटक केली आहे. जंगलत गस्त न घालता जनावर गमावल्यानंतर नेहमी चौराकुंडच्या जंगलात शिकारींवर कारवाई करण्याचा खेळ खेळला जात असतो, हे विशेष. 

 
 
सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या कम्पारमेंट नं. 585 च्या जंगलात 6 सप्टेंबर रोजी 10 ते 15 लोकांनी सांबराची शिकार केली. तब्बल 5 दिवसानंतर गावातील मुखबीरकडून व्याघ्रचे रेंजर प्रफुल्ल निर्मळ यांना माहिती मिळाल्यावर मुख्य आरोपी बालाजी मोतीराम धिकारला अटक करण्यात आली. मात्र इतर 12-13 जण तात्काळ गावातून फरार झाले. बालाजीला धारणी न्यायालयात हजर केल्यावर 4 दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आलेली आहे.
 
 
भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा कायम करण्यात येऊन या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहा वर्षापूर्वी वनरक्षक ओंकार शेळकेवर जंगलात शिकार करणार्‍यांनी बंदूक उगारलेली होती, त्या घटनेपासून वनरक्षक, वनमजूर आणि वनपालांनी जंगलात गस्त लावणेच बंद केलेले होते. 5 दिवसानंतर गावातील मुखबीरकडून माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. चौराकुंडच्या जंगलात मोठ्या संख्येत वन्य प्राण्यांचा अधिवास असून जंगलाला लागूनच मध्यप्रदेश असल्याने शिकार नेहमी होत असते. जर जंगलात नियमित गस्त लावली असती तर सांबराचा जीव गेला नसता. घटना झाल्यावर कारवाई म्हणजे वन्यजीवाचे रक्षण करणे, असा चुकीचा अर्थ व्याघ्र प्रकल्प काढत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. चौराकुंडच्या जंगलातच वाघाच्या शिकारासाठी कमला पारधनसह मध्यप्रदेशातील अनेक आरोपींवर गुन्हे दाखल असून सेशन ट्रायल सुरु आहे, हे विशेष.
सांबराच्या शिकारातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरु असले तरी जंगलात गस्त करणे अती आवश्यक असून जेणेकरुन शिकार होणारच नाही. चौराकुंडच्या जंगलात दामजीपूरा भागातील परप्रांतीय शिकारी सुद्धा सक्रीय असतात.