भावंडांचे मृतदेह आढळले विहीरीत; घातपाताची चर्चा?

    दिनांक :10-Sep-2019
वरुड, 
शहरातील सावताचौक परिसरात राहणाऱ्या दोन अविवाहित व अल्पभुधारक शेतकरी भावंडांचे मृतदेह राहत्या घरातील विहीरीतच आढळुन आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. सदर घटना सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री उघडकीस आली. मात्र, त्या दोन्ही भावंडांची आत्महत्या नसुन त्यांचा घातपात झाल्याची मोठया प्रमाणात परिसरात चर्चा असल्याने पोलिस आता या प्रकरणी कोणत्या दिशेने तपास करतात याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. 

 
 
मिळालेल्या माहीतीनुसार, शहरातील सावताचौक मागील परिसरात वास्तव्यास असलेले प्रभाकर रामराव गोरडे (62) व मनोहर रामराव गोरडे (48) हे दोन्ही अविवाहित भावंड एकाच घरातील दोन वेग वेगळ्या खोलीत एक एकटेच राहत होते. त्यांना आई व तिन बहीणी असुन तिन्ही बहीणींचे लग्न झाल्याने त्या सासरी राहत होत्या. दरम्यान या दोन्ही भावंडांना दारुचे व्यसन असल्याने त्यांचे घरातील तेल, मिठ, भाजी , पोळीच्या शुल्लक कारणांवरून नेहमीच भांडण व्हायचे. त्यामुळे काही महीण्यापुर्वीच लहान मुलगी आईला स्वतःचे घरी मोहपा येथे घेउन गेली होती. तान्हा पोळयाचे नंतर नागरीकांना ते दिसुनच आले नाही किंवा मागील 15 दिवसात त्या भावंडांचे आपसात भांडण सुध्दा झाले नसल्याचे परिसरातील नागरीकांनी सांगितले. मात्र गेल्या काही दिवसांपासुन त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच असुन लाईट पंखा सुरूच होता असेही सांगण्यात आले. 

 
 
विहीरीमधुन दोन्ही मृतदेह बाहेर काढल्यानंतर मनोहर हा पॅन्टवर तर प्रभाकर हा निकर वरच दिसुन आला. दोघांचेही मृतदेह पुर्णतः कुजलेले असल्याने विहीरीत पडतांना त्यांच्या शरीरावरील जखमा सुध्दा दिसुन आल्या नाही. यामुळे दोन्ही भावंडांनी आत्महत्या केली किंवा एकमेकांना वाचवण्यात त्यांचा विहिरीत पडुन मुत्यु झाला की, त्यांचा कोणी घातपात केला हे मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. 9 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजताचे दरम्यान त्या दोन्ही भावंडांचे मृतदेह घरातीलच 65 फुट खोल विहीरीमध्ये असल्याची चर्चा संपुर्ण परिसरात पसरली. या घटनेची फिर्याद मृतकांचे नातेवाईक प्रकाश बळीराम अकर्ते (55) रा.साई संगम कॉलनी वरुड यांनी पोलिसात दिल्यावरुन ठाणेदार मगन मेहते यांनी घटनास्थळी भेट देऊन विहीरीत दोन्ही मृतदेह असल्याची खात्री करुन घेतली आणि आज सकाळी दोघांचे मृतदेह विहीरीतुन बाहेर काढण्यात आले. 
 
घटनास्थळावर नागरीकांनी एकच गर्दी केल्याने पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पंचनामा करण्यात आला. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर मृतदेह कुजलेले असल्याने घटनास्थळीच वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविछेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या आकस्मिक मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दोन्ही भावंडांचा घातपात तर झाला नाही ना ? असा संशय सुध्दा नागरीकांमधुन व्यक्त केल्या जात आहे.