तृणमूल, राष्ट्रवादी, भाकपाची राष्ट्रीय मान्यता धोक्यात!

    दिनांक :10-Sep-2019
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर
राष्ट्रीय पक्ष म्हणून आपला दर्जा काढून घेण्यात येऊ नये, अशी विनंती तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाकपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेण्यात येऊ नये, अशी विचारणा निवडणूक आयोगाने एका नोटिसीतून या पक्षांना केली होती. निवडणूक आयोगाने या पक्षांना दिवाळीनंतर पुन्हा आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे.
 
 
 
आमचे पक्ष अतिशय जुने असून, देशाच्या आतापर्यंतच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही पार पाडली आहे, त्यामुळे फक्त लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर याबाबतचा निर्णय घेऊ नये, तर येत्या विधानसभा निवडणुकीबाबत वाट पहावी, असे आवाहन या पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आले. कॉंग्रेसनंतर भाकपाच देशातील सर्वांत जुना पक्ष आहे, लोकसभेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिकाही आमच्या पक्षाने पार पाडली आहे, असे आयोगाला भेटून आल्यानंतर भाकपाचे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांनी सांगितले.
 
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक नसली तरी याआधी अनेक राज्यात आम्ही सत्तेवर होतो, घटना मजबूत करण्यात आमचेही योगदान आहे, याकडे राजा यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्य आंदोलनातही आम्ही आघाडीवर होतो, याकडे लक्ष वेधत राष्ट्रीय पक्षाचा आमचा दर्जा कायम ठेवावा, अशी विनंती आम्ही आयोगाला केली असल्याचे राजा यांनी सांगितले.
 
 
2014 मध्ये आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, तो 2024 पर्यंत कायम राहिला पाहिजे, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे, तर राष्ट्रीय पक्ष म्हणून पडताळणी करण्याची ही योग्य वेळ नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मजीद मेमन यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, ही अपवादात्मक अशी बाब होती. महाराष्ट्रात सलग 15 वर्षे आमची सत्ता होती, त्यामुळे यातून आम्हाला वगळण्यात यावे, असे मेमन म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार किमान चार राज्यात किमान 6 टक्के मते तसेच लोकसभेत किमान चार खासदार असणार्‍या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असतो. याच निकषामुळे बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला.
 
 
देशात सध्या भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बसपा, भाकपा, माकपा आणि मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. याआधी दर पाच वर्षानी राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या दर्जाची पडताळणी केली जात होती, पण 2016 मध्ये निवडणूक आयोगाने यासंदर्भातील कायद्यात दुरुस्ती करीत, या कालावधी दहा वर्षाचा केला. त्यामुळेच त्यावेळी बसपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाकपला दिलासा मिळाला होता.