...म्हणूनच रोहितने विश्वचषकात झळकावली पाच शतकं : रवी शास्त्री

    दिनांक :10-Sep-2019
नवी दिल्ली, 
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. टी-२०, वन-डे आणि त्यानंतर कसोटी मालिकेत भारताने यजमान विंडीजला व्हाईटवॉश दिला. विंडीज दौऱ्याआधी कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्याती बेबनावाच्या वृत्तामुळे भारतीय संघाचं वातावरण ढवळून निघालं होतं. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

 
“गेली पाच वर्ष मी भारतीय संघासोबत आहे, ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडू खेळीमेळीने वागत असतात. रोहित-विराटमधील बेबनावाचं वृत्त मूर्खपणाचं आहे. विराट आणि रोहितला मी एकत्र खेळताना पाहत आलोय. जर दोघांमध्ये काही वाद असता तर रोहित विश्वचषकात पाच शतकं कसा झळकावू शकला असता?? विराट आता ज्या फॉर्मात आहे त्या फॉर्मात तो दिसलाच नसता, दोघांमध्ये मैदानात भागीदारी होऊ शकली नसती.” रवी शास्त्रींनी भारतीय खेळाडूंमध्ये असलेल्या वादाचं वृत्त फेटाळून लावलं.
भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला आपलं मत मांडण्याची मूभा आहे. काहीवेळा अनेकांची मत वेगवेगळी असतात. प्रत्येकाने एकच विचार करावा अशी माझी अपेक्षा नसतेच, विविध विचारांमधून कधीकधी नवीन कल्पना सुचतात. त्यामुळे संपूर्ण विचारांती संघात योग्य खेळाडूला संधी दिली जाते, रवी शास्त्री टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल बोलत होते. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून, दोन्ही संघध यात ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.