चालान फाडण्याच्या धमकीने तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

    दिनांक :10-Sep-2019
वाहतूक पोलिसांनी घटनास्थळावरून काढला पळ
नोएडातील दुर्दैवी घटना
 
नोएडा, 
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार नियम मोडल्यास आकारण्यात येणार्‍या जबर दंडाचा धसका वाहनधारकांनी घेतला आहे. अशीच एक दुर्दैवी घटना नोएडातील इंदिरापुरममध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसाने चालान फाडण्याची धमकी दिल्याने अभियंत्या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
दरम्यान, अभियंत्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.
 

 
 
मूलचंद शर्मा हे मुलगा गौरव याच्यासोबत रविवारी संध्याकाळी इंदिरापुरमकडे जात होते. गौरव कार चालवत होता. संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग 9 वर इंदिरापुरमजवळ वाहतूक पोलिस उभे होते. त्यांनी कार थांबवायला सांगितली. तसेच कारवर दंडुके मारण्यास सुरुवात केली. गौरवने पोलिसांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर पोलिसांनी चालान फाडण्याची आणि कार जप्त करण्याची धमकी देत फोटो काढण्यास सुरुवात केली. या भीतीने गौरव चक्कर येऊन बेशुद्ध पडला. मात्र, मदत करण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला.
रस्त्यावरून जाणार्‍या काही जणांनी गौरवला रुग्णालयात नेले. तेथे तपासणीनंतर गौरवला मृत घोषित केले, असे गौरवचे वडील मूलचंद शर्मा यांनी सांगितले. कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक वैभव कृष्ण यांनी दिली.