'पर्लकोटा'चे रुद्ररूप ओसरले; भामरागड वासियांनी घेतला सुटकेचा निःश्वास

    दिनांक :10-Sep-2019
प्रशासन, स्थानिक लोकबिरादरी प्रकल्पाच्या श्रमदानातून मार्ग झाला सुरळीत.
 
मिलिंद खोंड
 
अहेरी,
सलग आठ दिवस पुराने वेढलेल्या भामरागडाचा पूर आणि पाऊस ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेल्या आठ दिवसांच्या पुरामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा, लाकडे, गाळ जमा झाल्याने पाणी ओसरूनही रस्ता वाहतुकीसाठी सुरू झालेला नव्हता. पुलावरील गाळ, कचरा साफ झाल्यानंतरच मार्ग सुरळीत करण्याचे काम जिल्हा आपत्ती निवारण प्रशासन, तथा स्थानिक नागरिक, व्यापारी आणि दुसऱ्या बाजूने लोकबिरादरी प्रकल्पाच्या शालेय विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रमदान करून हाती घेण्यात आले व  रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.  
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुलावर तसेच मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाल्याने जेसीबीद्वारे हा गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. आठ दिवसांनंतर मार्ग मोकळा झाल्याने भामरागड वासियांनी सुटकेचा श्वास घेतला. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे नदीवरील नव्या पुलासाठी 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून नवीन पूल लवकरात लवकर उभारण्यात यावा यासाठी लोकप्रतिनीधी, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 
 
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भामरागड येथे अतिवृष्टीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत देण्यात यावी यासोबतच सामजिक संस्थांना सुद्धा आर्थिक मदतीसोबत जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन केले आहे.