जंगल अनुभवायचंय? त्रिपुराला जा!

    दिनांक :10-Sep-2019
पल्लवी खताळ-जठार
 
 
भारताच्या सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जात असलेल्या अनेक राज्यांत आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली असली, तरी अद्यापही त्रिपुरा हे राज्य म्हणावे तसे पर्यटननकाशावर पुढे आलेले नाही. मात्र, वाईल्ड लाईफची आवड असलेल्या पर्यटकांसाठी त्रिपुरा हे परिपूर्ण पर्यटन राज्य ठरू शकते. हे राज्य अनेक वाईल्ड लाईफ अभयारण्यांसाठी नावाजले जात आहे तसेच येथील निसर्ग विविधता, पहाडांचे सौंदर्य, अनेक नद्या, सरोवरे पर्यटकांना भुरळ घालतीलच, पण एकदा का या राज्याची सैर केली की, ती विसरणे पर्यटनप्रेमींसाठी अशक्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 
 
 
दक्षिण त्रिपुरातील, देशातील निवडक अभयारण्यातील एक असलेले गुमरी हे प्रचंड अभयारण्य 389.59 चौरस किलोमीटर परिसरात असून, त्यातील 300 किमी.चा भाग पाण्याने व्यापलेला आहे. सदाहरित अशा या अभयारण्यात खास पाहायचे ते हत्तींचे कळप. शिवाय हरण, सांबर, रानरेडे असे अन्य जंगली प्राणीही आहेतच.
 
 
उत्तरेकडे असलेले रोवा अभयारण्य आकाराने छोटे आहे, मात्र येथील पक्षी, वनस्पती तुम्हाला कायम खेचून घेतात. तसेच सेपाहिजाला वाईल्ड लाईफ सेंक्च्युरी राजधानी अगरताळापासून फक्त 35 किमी. आहे. येथेही विविध जातींचे विविध प्रकारचे सुंदर पक्षी पाहता येतात, पण येथील खासियत आहे ती मोठमोठी माकडे. जैवविविधता व इको टूरिझमसाठी ही अभयारण्ये प्रसिद्ध असून, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ येथे जाण्यासाठी अतिशय योग्य असतो. चारी बाजूंनी पर्वत-पहाडांनी, हिरव्यागार दर्‍याखोर्‍यांनी व अनेक सरोवरांची वेढलेले हे राज्य पर्यटकांना नक्कीच पुन:पुन्हा भेटीसाठी मोह घालेल, यात शंका नाही.