इम्रानच्या देशात हिंदू हतबल!

    दिनांक :10-Sep-2019
तिसरा डोळा  
 चारुदत्त कहू 
 
या ना त्या कारणावरून भारताचा शेजारी देश सतत चर्चेत असतो. कुठल्याही देशाची अथवा व्यक्तीची चर्चा व्हावी ती चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या कृत्यांसाठी. पण, पाकिस्तानचे तसे नाही. कधी हा देश आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी जगात चर्चिला जातो, तर कधी या देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था चर्चिली जाते. कधी या देशातील नागरिकांच्या होणार्‍या मानवाधिकाराच्या उल्लंघनाची जागतिक व्यासपीठावर चर्चा होते, तर कधी या देशातील सत्ताधीश आणि लष्करी अधिकार्‍यांमधील वितंडवाद माध्यमांपर्यंत पोहोचतो. गेल्या काही दिवसांपासून या देशाचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या देशातील समस्यांकडे लक्ष न देता, भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविल्याविरुद्ध जगभरात जनमत जागृतीसाठी आणि त्याविरुद्ध निषेधाचा आवाज बुलंद करण्यात गुंतले आहेत. त्यांचे जनजागरणाचे प्रयत्न किती व्यर्थ गेले, हे खोर्‍यातील शांततेचा आढावा घेतल्यास ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही.
 
 
असो. सध्या हा देश अल्पसंख्यकांच्या जबरदस्तीने होणार्‍या धर्मांतरणासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पाकिस्तानातील 1947 मधील हिंदूंच्या लोकसंख्येत आज 2019 मध्ये प्रचंड घट आली आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतरण, हिंदू समुदायाच्या लोकांचा होणारा छळ, त्यांचे मानसिक खच्चीकरण, राजकीय दबाव आणि त्यांच्या समस्यांची दखल न घेण्याची एकापाठोपाठ एक सार्‍याच राज्यकर्त्यांची रीत, यामुळे पाकिस्तानातील हिंदू हतबल होत चालला आहे. असेच प्रकार ख्रिस्ती, शीख आणि वांशिक अल्पसंख्यकांबाबत वषार्र्नुवर्षांपासून सुरू आहेत. किशोरवयीन मुलींचे अपहरण, जोरजबरदस्तीने त्यांचे धर्मांतरण, त्यांचा मुस्लिम मुलांसोबत निकाह लावणे आणि काही दिवसांनी न्यायालयात उभे राहून नवा धर्म स्वीकारल्याची जाहीर घोषणा करणे, या गोष्टी काही नव्या राहिलेल्या नाहीत.
 

 
 
आता पाकिस्तानच्या नानकाना साहेब सीटीमध्ये कट्‌टरपंथींनी जगजित कौर नामक 19 वर्षीय शीख मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मनाविरुद्ध तिच्याशी निकाह केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे या प्रकरणी मदत मागण्यात आली. सरकारवर मोठा दबाव आल्याने तिची सुटका झाली असून, या प्रकरणी 8 तरुणांना अटकही करण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी काही हत्यारबंद लोकांनी भगवानसिंग या शीख ग्रंथीच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर त्याच्या मुलीला घरातून उचलून नेले. मुलीच्या भावाने आपली कैफियत मांडताना म्हटले की, माझ्या बहिणीला धाक दाखवून जबरदस्तीने इस्लाम कबूल करून घेतला. इस्लाम कबूल न केल्यास तुझ्या वडिलांची हत्या केली जाईल, अशी धमकीही तिला देण्यात आली. या मुलीच्या नातेवाईकांनी झाल्या घटनेचा निषेध करून, तिच्या सुटकेसाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे याचना केली. तिची सुटका न झाल्यास आम्ही स्वतःला जाळून घेऊन, अशी धमकीही इम्रान खान यांना या मुलीच्या नातेवाईकांनी दिली होती. अखेर सरकारवरचा दबाव वाढल्याने या युवतीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
 
यापूर्वी सिंध प्रांतातील 13 वर्षीय रविना आणि 15 वर्षीय रीना या दोन मुलींचे होळीच्या पूर्वसंध्येला या परिसरात राहणार्‍या काही लब्धप्रतिष्ठित परिवारांनी अपहरण केले. या घटनेमुळे आमच्या जगण्याच्या हक्कांवर बाधा येत असून, त्यामुळे आमच्या मानवाधिकारांचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांकडून झाल्याने हे प्रकरण जागतिक मंचावर चर्चेस येऊन, पाक सरकारची मोठी बदनामी झाली होती. या मुलीचे वडील निराश होऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर बसलेले असून, मुलींच्या सुटकेच्या मागणीसाठी ते गयावया करीत असल्याचा व्हिडीओ त्या वेळी व्हायरल झाला होता. एकतर माझ्या मुलींची सुटका करा अथवा मला ठार मारून टाका, अशी विनवणी या मुलींचे वडील या व्हिडीओत करीत असल्याचे जगाने बघितले. या अपहरण प्रकरणाचे मोठे राजकीय पडसादही उमटले. भारताच्या तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फव्वाद हुसैन यांच्यात या प्रकारावरून ट्विटरवरून वादावादीही झाली.
 
 
आमच्या देशातील अल्पसंख्यकांना कसे वागवायचे याचे धडे भारताने आम्हाला देऊ नये, या चौधरी फव्वाद हुसैन यांच्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तत्पूर्वी जुलै 2018 मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इन्साफ या राजकीय पक्षाने हिंदूंच्या होणार्‍या जबरदस्तीच्या धर्मांतरावर आळा घालू, असे आश्वासन मतदारांना दिले होते. एकीकडे पाकिस्तानातील हिंदू न्यायासाठी याचना करीत असताना, भारताने आपल्या देशातील अल्पसंख्यकांना कसे वागवावे, याबाबतची सूचना इम्रान खानने चालू वर्षाच्या मार्चमध्ये माध्यमांशी बोलताना केली होती. भारतातील मुस्लिमांना दुसर्‍या दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक दिली जात असताना आम्ही मात्र आमच्या देशातील हिंदूंना मुस्लिमांसारखीच वागणूक देऊ, अशी जाहीर घोषणाही त्यांनी केली होती. त्यामुळे शीख मुलीच्या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर तिच्या परिवारातील सदस्यांनी ‘‘आता कुठे गेले तुमचे आश्वासन?’’, ‘‘तुम्ही अपहरणाकडे दुर्लक्ष केले आहे का?’’, ‘‘आपण झोपेचे सोंग तर घेतलेले नाही?’’... असे प्रश्न विचारून इम्रान खान यांना भंडावून सोडले.
 
 
पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात सध्या अवैध धर्मांतरण आणि किशोरवयीन मुलींच्या अपहरणाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून, सरकारच्या याबाबतच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही चर्चिला जात आहे. एकीकडे अल्पवयीन मुली, कुटुंबाचे बरेवाईट होऊ नये म्हणून निमूटपणे धर्मांतरणाला होकार देत आहेत आणि दुसरीकडे याविरोधात न्यायालयात आवाज उठविणार्‍या याचिकाकर्त्यांच्या विनंत्यांना सरकारचे रबरस्टँप असलेले न्यायाधीश कचर्‍याच्या टोपल्या दाखवण्यात धन्यता मानत आहेत. अल्पसंख्यक हिंदू मुलींच्या अपहरणाच्या खटल्यांमध्ये मुस्लिम युवकांचे समर्थक हातात बंदुका आणि शस्त्रास्त्र घेऊन न्यायालयातदेखील उपस्थित राहतात, अशी हिंदू नागरिकांची तक्रार आहे. अपहृत मुलींच्या मोजक्याच नातेवाईकांना कोर्टात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. या पार्श्वभूमीवर कोर्टातील दहशतीच्या वातावरणात पीडित मुलींजवळ इस्लाम कबूल करण्याशिवाय दुसरा मार्गच उरलेला नसतो.
 
 
कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला असलेला धोका बघून त्या धर्मबदल आणि निकाहच्या कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या करून मोकळ्या होतात. आजच्या घडीला पाकिस्तानात फक्त 25 लाख हिंदू वास्तव्याला आहेत. त्यातील 94 टक्के लोक सिंध प्रांतात असून, हा सारा भाग भारताच्या सीमेलगतचा आहे. 1951 मध्ये पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या 15 टक्के होती. आज घटून ती केवळ 1.6 टक्के झाली आहे. कुठे गेले 13.4 टक्के हिंदू? याचा विचार पाक सरकारने करायला नको? भारतातील मुस्लिमांच्या भविष्याबद्दल कंठरव करणार्‍या पाकिस्तानी राज्यकर्त्यांना, त्यांच्या देशातून हद्दपार होणार्‍या हिंदू धर्मीय लोकांकडे लक्ष द्यायला फुरसत का नाही? हा प्रश्न विचारलाच जायला हवा. एका सर्वेक्षणानुसार, दर महिन्याला पाकिस्तानात किमान 25 हिंदू तरुणींचे जोरजबदस्तीने अपहरण होते, त्यांचा निकाह केला जातो आणि त्यांचे धाकदपटशाने धर्मपरिवर्तनही केले जाते. ज्या वेळी अल्पसंख्यकांबाबत असे अत्याचार केले जातात, त्या वेळी त्यांच्या पाठीशी त्यांच्या समाजसंस्था हिरिरीने उभ्या ठाकतात.
 
 
ख्रिश्चनांची प्रताडना झाल्यास व्हॅटिकनपासून भारतापर्यंतच्या संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या ठाकतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर दबाव टाकतात. शिया लोकांवरील हल्ले परतवून लावण्यासाठी पाकिस्तानातील शियांचे गट आणि देश-विदेशातील शियांच्या संघटना उभ्या ठाकतात. पण, असहाय हिंदूंच्या पाठीशी भारताशिवाय कुठलाच देश उभा ठाकत नाही. आजतर नेपाळदेखील हिंदू राष्ट्र राहिलेले नाही. पाकिस्तानातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कुठलेही घटनात्मक अधिकार नाहीत. अल्पसंख्यकांबाबत विचार करू शकणारे मंत्रालयही तेथे अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडूनही हिंदूंना कधी दिलासा मिळत नाही. अशा विपरीत परिस्थितीत त्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
 
9922946774