'अलिबाबा'चे संस्थापक जॅक मा निवृत्त

    दिनांक :10-Sep-2019
नवी दिल्ली,
‘तुम्ही नावीन्यपूर्ण विचार करत आहात, म्हणजे आजच्या दिवसाकडे उद्याच्या दृष्टिकोनातून पाहात आहात…’ असा यशाचा पासवर्ड सांगत ‘अलिबाबा’ या कंपनीच्या माध्यमातून स्वत:चं आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे ‘अलिबाबा’ या चीनच्या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक जॅक मा आज वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाले. कंपनीचे सीईओ डॅनियल झांग यांच्याकडे त्यांनी कंपनीच्या कारभाराची सर्व सूत्रे दिली आहेत. अमेरिका-चीन दरम्यान व्यापार संघर्ष सुरू असतानाच निवृत्त होणारे जॅक मा आता निवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रात काम करणार आहेत.

जॅक मा निवृत्त झाले तरी २०२०च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत राहणार आहेत. कंपनीचे सल्लागारपदही ते सांभाळणार आहेत. तसेच त्यांची ४१.७ अब्ज डॉलरची संपत्ती शिक्षणविषयक प्रकल्पांना देणार आहेत.
जॅक मा यांनी १९९९मध्ये अलिबाबा ही कंपनी सुरू केली होती. त्यापूर्वी ते इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करत होते. चीनच्या व्यापाऱ्यांना थेट अमेरिकेतील व्यापाऱ्यांशी देवाण-घेवाण करता यावी म्हणून जॅक मा यांनी अलिबाबा ई-वाणिज्य कंपनी सुरू केली होती. ‘अलिबाबा’ने चीनमध्ये लाखो रोजगार दिले असून, कंपनीचा व्यापही बहुतेक सर्व देशांत पोहोचला आहे. त्यामुळे, चीनमधील सर्वांत लोकप्रिय ‘व्हीआयपीं’मध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे. या यशाच्या टप्प्यावर असतानाच त्यांनी कंपनीतून ‘एक्झिट’ जाहीर केली. ‘तुम्ही तुमच्या विशीतील आयुष्य शिकण्यासाठी घालवा, तिशी-चाळीशीमध्ये धोके स्वीकारा आणि पन्नाशीनंतर ज्या गोष्टी उत्तम साधतात, त्या गोष्टींसाठी जगा,’ हा सल्ला ते नेहमी द्यायचे. तोच कित्ता गिरवत ते आता पुन्हा शिक्षणक्षेत्राकडे वळत आहेत.