काँग्रेसला तिसरा धक्का; कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा

    दिनांक :10-Sep-2019
मुंबई,
काँग्रेसला आज दिवसभरात तिसरा धक्का बसला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. कृपाशंकर हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
 
 
कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कृपाशंकर सिंह दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कार्यालयात गणेश दर्शनासाठी गेले होते. त्यावेळीच कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेशी कृपाशंकर असहमत होते. त्यांनी काँग्रेसच्या छाननी समितीत ही नाराजी व्यक्त करतानाच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक भवनमध्ये भेट घेऊन त्यांची नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला.
दरम्यान, कृपाशंकर हे भाजपमध्ये गेले तरी त्यांना सांताक्रुझमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघ हा कृपाशंकर यांचा पारंपारिक मतदारसंघ असून तो त्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र तिथे सध्या शिवसेनेचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात शिवसेना भाजपसाठी ही जागा सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृपाशंकर यांना दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.