तालिबानसोबत आता चर्चा नाही

    दिनांक :10-Sep-2019
- ट्रम्प कडाडले; कठोर कारवाईचा इशारा
वॉशिंग्टन,
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबान्यांसोबत सुरू असलेली चर्चा निरर्थक ठरली आहे. यापुढे तालिबानशी कुठलीच चर्चा होणार नाही, असे जाहीर करताना, मागील 10 वर्षात केली नसेल, इतकी कठोर कारवाई आता आम्ही करणार आहोत, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. काबुलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दोन भीषण हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी वॉशिंग्टनजवळील कॅम्प डेव्हिड येथे अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि तालिबानी नेत्यांमध्ये आयोजित गोपनीय बैठकही रद्द केली.
 
 
 
 
अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने तालिबानला शांतता चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. तालिबान शांततेला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा होती, पण लागोपाठ दोन मोठे हल्ले करण्यात आले. यात आमचेही काही सैनिक मारले गेले. या दोन्ही हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली असल्याने, या संघटनेकडून शांततेची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे माझे ठाम मत झाले आहे. भविष्यात तालिबान्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही, आता फक्त कठोर कारवाईचाच विचार आम्ही करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही शांतता चर्चा करीत आहोत आणि ते आमच्या हितावर आघात करीत आहेत. हा काय प्रकार आहे? अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करून, आपले सैन्य माघार घेण्याची आमची योजना होती, पण तालिबान्यांनी हल्ले करून, शांतता चर्चाच मोडीत काढली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
तालिबान्यांचाही लढण्याचा निर्धार
दरम्यान, ट्रम्प यांच्या इशार्‍यानंतर तालिबाननेही, अफगाणमधील अमेरिकन फौजांविरोधात आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही चर्चा आम्ही नाही, तर अमेरिकेनेच संपुष्टात आणली आहे आणि यासाठी ट्रम्प यांना पश्चातापच होणार आहे. अफगाणमधील अमेरिकेची घुसखोरी संपविण्यासाठी आमच्याकडे दोन पर्याय होते, एक म्हणजे, जिहाद आणि दुसरा म्हणजे शांतता चर्चा. ट्रम्प यांना शांतता चर्चा मान्य नसल्याचे आता स्पष्ट झाले असल्याने, आम्ही जिहादचा पर्याय आता निवडला आहे, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.