अमेरिकेतील निवडणुकीत पुतिनचा हस्तक्षेप होता

    दिनांक :10-Sep-2019
- सीआयए अधिकार्‍याचा खळबजनक दावा
वॉशिंग्टन,
अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशिया विशेषत: व्लादिमिर पुतिन यांचा थेट हस्तक्षेप होता, असा खळबळजनक दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने केला. निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपामुळे त्या काळात वातावरण चांगलेच तापले होते. डोनाल्ड ट्रम्प रशियाच्या हातचे बाहुले असल्याचेही म्हटले जात होते. तथापि, दोन्ही देशांनी हे आरोप नाकारले होते. मात्र, आता या नव्या दाव्यामुळे खळबळजनक उडाली आहे. ब्लादिमिर पुतिन यांनी व्यक्तिगत पातळीवर अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केला होता, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकार्‍याच्या हवाल्याने दिले आहे.
 
 
 
 
 
आपला दावा सिद्ध करण्यासाठी या अधिकार्‍याने 2017 मध्ये देण्यात आलेल्या काही सूचनांचे विश्लेषण कसे करण्यात आले, याची माहिती दिली. पुतिन यांच्या हस्तक्षेपाची सुरुवात 2016 च्या निवडणुकीच्या आधीच झाली होती. रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प उमेदवार म्हणून समोर येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हस्तक्षेपाच्या हालचाली आणखी वाढल्या होत्या. निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप वाढल्याची माहिती अतिशय संवेदनशील होती आणि सीआयएचे तत्कालीन संचालक जॉन ओ ब्रेनन यांनी, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्रपरिषदांपासून ही माहिती दूर ठेवण्याचा काटेकोर प्रयत्न केला होता. ब्रेनन अशी माहिती बंद लिफाफ्यातून शेअर करीत होते.
 
दरम्यान, न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, सीआयएने या गुप्तहेरांच्या माहितीची विश्वसनीयता पडताळण्यासाठी अनेक प्रकारे विश्षेलण केले होते. ही माहिती समोर आल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये खळबळजनक वृत्त प्रकाशित होत होती. मात्र, या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे व्हाईट हाऊसने वारंवार स्पष्ट केले होते.