शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

    दिनांक :10-Sep-2019
- महाराष्ट्रातील जागावाटपाच्या दृष्टीने झाली चर्चा
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक आघाडी करून लढवण्याचा निर्णय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी घेतला आहे. या निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या आघाडीतील जागावाटपाला अंतिम रूप देण्यासाठी शरद पवार यांनी आज 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
 
 

 
 
या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाला या दोन नेत्यांच्या भेटीत अंतिम रूप देण्यात आल्याचे समजते. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यावर या बैठकीत ढोबळ मानाने एकमत झाले आहे. मात्र, कोणत्या जागा कोणत्या पक्षाने लढवायच्या याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांमध्ये होणार्‍या बैठकीत घेतला जाणार असल्याचे समजते. 2014 मध्ये महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आघाडी करून लढवली होती.
 
 
शरद पवार यांच्या भेटीमुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य िंशदे यांच्यासोबत आज होणारी सोनिया गांधी यांची भेट पुढे ढकलण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य िंशदे यांच्यातील मतभेद वाढले आहेत. शिंदे यांना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्याची काही कॉंग्रेस नेत्यांची मागणी आहे. मात्र त्याला मुख्यमंत्री कमलनाथ आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयिंसह यांचा विरोध आहे.
 
कमलनाथ आणि ज्योतिरादित्य िंशदे यांच्यातील मतभेदांचा परिणाम मध्यप्रदेशातील सरकारवर होऊ नये, म्हणून या दोन नेत्यांतील मतभेद मिटवण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे, त्याचाच भाग म्हणून त्यांनी मंगळवारी ज्योतिरादित्य िंशदे तर बुधवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भेटायला बोलावले होते. विशेष म्हणजे, ज्योतिरादित्य िंशदे कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील छाननी समितीचेही प्रमुख आहेत. मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात आणि के. सी. पाडवी या समितीचे अन्य सदस्य आहेत.