सहा लोककलांतून साकारणार शिवराज्यभिषेक गीत

    दिनांक :10-Sep-2019
मुंबई,
'प्रत्येक आई असतेच हिरकणी' अशी टॅगलाइन घेऊन अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक एक नवा इतिहासपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हातात बाळ घेऊन रायगडाकडं पाहणाऱ्या आईचं हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यातच प्रसाद ओक चित्रपटाबाबत आणखी एक सरप्राइज घेऊन आला आहे. नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून शिवराज्यभिषेक गीत सादर करणार आहे. नुकताच या गीताचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
 
 
 
चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, सुहास जोशी आणि क्षिती जोग यांची झलक या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. हिरकणीची साहसकथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. चित्रपटात कलाकार कोण असतील हे मात्र अद्याप गुलदस्यात आहे. दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.