परदेशी भाजीपाला लागवड

    दिनांक :11-Sep-2019
महाराष्ट्रात निरनिराळ्या भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. परंतु अजूनही पारंपरिक भाज्यांचीच शेती केली जाते. त्याऐवजी काही परदेशी भाजीपाल्यांची लागवड हमखास उत्पन्न मिळवून देणारी ठरते. या भाज्यांना इंग्रजीत एक्झॉटिक व्हेजीटेबल म्हणतात. या परदेशी भाज्यांमध्ये लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, झुकिनी, ॲस्परागस, सेज, सबर्ब, आर्टिचोक, टर्निप, स्वीट कॉर्न लिक, पास्ली यांचा समावेश होतो. यातील ब्रोकोली या भाजीपाला पिकाविषयी जाणून घेऊ... 

 
 
ब्रोकोली हे कोबीवर्गीय पीक असून त्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वं, उच्च तंतुमय पदार्थ आणि कमी उष्मांक असतात. दिर्घायुरारोग्यासाठी स्वादिष्ट भाजी म्हणून तसंच ब्रोकोलीचे सॅलड, सूप, बर्गर, पॅटीस आदी पदार्थही लोकप्रिय आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशिंखड, पुणे येथून ब्रोकोलीचे अधिक उत्पादन देणारी गणेश ब्रोकोली ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे.
 
 
भोपळावर्गीय परदेशी फळभाजी झुकिनीचा शिजवून खाण्यात, भाजी, जॅम िंकवा फळावरील साल काढून चायनिज डिशमध्ये मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उपयोग केला जातो. या फळभाजीपासून फार कमी फॅटस्‌ मिळतात. म्हणून तिचा उपयोग मेदवृद्धी टाळण्यासाठी होऊ शकतो. चायनीज कोबीचे गड्डे मध्यम, घट्ट, उभट, लंबगोल अकाराचे असतात. याचा सलाडसाठी प्रामुख्याने वापर होतो. शलगम (टर्निप) हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. त्याचा तसंच पानांचा भाजीसाठी तर मुळाचा उपयोग लोणच्यासाठी उपयोग करतात. शलगममध्ये पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. कंदमुळापेक्षा शलगमच्या पानात जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे आणि क्षार असतात. परदेशी भाज्यांचे उत्पादन थंड हवामानात चांगल्या प्रकारे घेता येते. काही भाज्यांची लागवड वर्षभर खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पॉलिहाऊसमध्ये उत्तम प्रकारे करता येते. शेतकरी पारंपरिक भाजीपाला लागवडीसोबत प्रायोगिक स्वरूपात काही क्षेत्रावर परदेशी भाज्यांची लागवड करू शकतात.