देश जोडण्याचे काम केले चांद्रमोहिमेने!

    दिनांक :11-Sep-2019
विक्रम लॅण्डरशी इस्रोचा संपर्क होऊ शकला नसला, तरी लॅण्डर सुरक्षित आहे आणि ते कललेल्या स्थितीत पडले आहे, ते सुरक्षित असून त्याची कुठलीही तुटफूट झालेली नाही, असे इस्रोने स्पष्ट केले आहे. विक्रम सुरक्षित आहे आणि त्याच्याशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे. विक्रमशी संपर्क झाला नसला तरी चांद्रयान-2 ने आपले 95 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे, हे वैज्ञानिकांचे म्हणणे खरे मानले, तर चांद्रयान-2 मोहीम यशस्वीच झाली आहे, असे म्हणण्यास वाव आहे. 22 जुलैला प्रक्षेपण झाल्यानंतर तब्बल 47 दिवसांचा प्रवास करीत चांद्रयान-2, सर्व अडथळे पार करत चंद्राजवळ पोहोचले होते. 7 सप्टेंबरच्या पहाटे विक्रम लॅण्डरसह रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार होते. पण, तत्पूर्वी चंद्राच्या भूमीपासून 2.1 किमी. अंतरावर असताना विक्रमशी इस्रोचा संपर्क तुटला आणि संपूर्ण देश हळहळला. ते जे शेवटचे शंभर सेकंद होते, त्या शंभर सेकंदांत देशभर जे काही घडले ते अभूतपूर्व असे होते. संपूर्ण देश जोडण्याचे, एका सूत्रात बांधण्याचे काम त्या शंभर सेकंदांनी केले होते. 

 
 
इस्रोतील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकही भावुक झाले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर काळजीचे भाव होते, एवढी वर्षे प्रचंड परिश्रम करूनही अपयश आल्याची खंत होती. देशातील जनता, इस्रोतील शास्त्रज्ञ, इस्रोचे प्रमुख के. सिवान, त्या वेळी तिथे उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातले भाव आणि चेहर्‍यावर दिसत असलेली िंचता एकसारखीच होती. देशभर जी भावना निर्माण झाली होती, ती देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानली पाहिजे. ती भावना लक्षात घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या शंभर सेकंदांत निर्माण झालेल्या परिस्थितीला ‘इस्रो स्पिरिट’ असे जे संबोधले आहे, ते योग्यच म्हटले पाहिजे. भारताने पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, त्यानंतर मागच्याच महिन्यात कलम 370 आणि 35 ए रद्द केले, त्या वेळी देशातील सामान्य जनता जशी एकजूट दिसली, तशीच यावेळीही दिसली, ही मोठी उपलब्धी मानावी लागेल.
 
 
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आपल्या परीने प्रचंड परिश्रम घेतले. चांद्रयान-2 मोहीम फत्ते होणार, त्यास काही सेकंद उरले असताना विक्रमशी संपर्क तुटला आणि सगळीकडे थोडी निराशा पसरली. पण, त्यानंतर जे काही घडले ते अभूतपूर्व आणि ऐतिहासिकच होते. संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी उभा ठाकला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. सिवन यांना धीर दिला, त्यांचे सांत्वन केले. सगळे काही अद्‌भुत असेच होते. संपर्क तुटला असला तरी संकल्प नव्हे, ही जी भावना तयार झाली आणि आजतागायत टिकून आहे, ती देशाला आणखी पुढे पुढेच घेऊन जाणारी आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचे लक्षही चांद्रमोहिमेकडे लागले होते. प्रत्येक जण या मोहिमेशी भावनिकदृष्ट्या जुळलेला होता. त्यामुळेच बिहारमधील एक रिक्षेवाला दुसर्‍या दिवशी सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना एका पत्रकाराने जेव्हा त्याला विचारले की, काय वाचतो आहेस, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने चांद्रमोहिमेचे सामान्य माणसाला असलेले महत्त्वही अधोरेखित झाले.
 
प्रत्येक भारतीयाची ती भावना होती, हे स्पष्ट झाले. अतिशय थोडक्याने हुकले, नाहीतर आपले चांद्रयान चंद्रावर सुरक्षित उतरले असते, ही त्याची भावना अतिशय बोलकी होती. ते जे स्पिरिट देशभर दिसून आले, ते देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले पाहिजे. काही नतद्रष्ट सोडले, एका इंग्रजी वृत्तवाहिनीचा नतद्रष्ट, वाह्यात पत्रकार सोडला, तर संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी होता, हेही लक्षात घेतले पाहिजे. चांद्रयानाने पंधरा मोठे अडथळे पार केल्यानंतर चांद्रयान केवळ दोन पावलं दूर असताना जे काही घडले ते निराश करणारे जरूर होते. पण, भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पंधरा अडथळे पार करवले, ते प्रशंसनीय, अभिनंदनीय होते. विक्रमशी संपर्क तुटला म्हणून चांद्रयान-2 मोहीम अपयशी ठरली, असे मुळीच म्हणता यायचे नाही. कारण, चांद्रयान-2 चे ऑर्बिटर सुरक्षित आहे, ते आपले काम चोख बजावत आहे, त्याच्याकडून छायाचित्रेही प्राप्त होत आहेत, त्याच्याच माध्यमातून विक्रमचे ‘हार्ड लॅण्डिंग’ होऊनही ते सुरक्षित असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे, ऑर्बिटर आणखी सात वर्षे काम करणार आहे, त्याच्याकडून या काळात संदेश प्राप्त होत राहणार आहेत, विशेष म्हणजे ऑर्बिटरकडून अनेक प्रकारची उपयुक्त माहिती मिळू शकणार आहे, हे काही कमी महत्त्वाचे नाही. विक्रम सुरक्षित असल्याने त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आणि आणखी दहा दिवस आपल्या हाती आहेत. त्यामुळे आशा सोडून चालणार नाही. इस्रोतील शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्यांचे मनोबल कसे वाढीस लागेल, त्याला प्रोत्साहन कसे मिळेल, याचा विचार देशवासीयांनी केला तर अपेक्षित यश निश्चितपणे मिळणार आहे.
 
 
आपल्या शेजारच्या पाकिस्तानला भारताची मोहीम फत्ते न झाल्याचा राक्षसी आनंद झाला होता. पाकच्या एका मंत्र्याने तर भारतावर जहरी टीकाही केली होती. चांद्रयान मोहिमेवर नऊ हजार कोटी रुपये खर्च केला आणि वाया गेला, अशी टीका या मंत्र्याने केली होती. या टीकेतूनही त्याचे अज्ञानच प्रकट झाले. कारण, भारताने नऊ हजार कोटी रुपये नव्हे, तर केवळ 900 कोटी रुपयेच खर्च केले आहेत आणि एवढ्या कमी खर्चात चंद्रावर यान पाठविणारा भारत हा जगातील पहिला देश आहे, हे वास्तव माहिती नसणारा पाकचा तो मंत्री महामूर्खच म्हटला पाहिजे! पण, जगभरातील देशांनी भारताच्या मोहिमेचे कौतुकच केले. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले, हे विसरता यायचे नाही. जर का सगळे काही ठरल्याप्रमाणे व्यवस्थित झाले असते, तर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा जगातला पहिला देश ठरला असता, हे वास्तवही दुर्लक्षित करता येणार नाही.
 
यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी रीत्या यान उतरविले आहे, पण अतिशय कठीण अशा दक्षिण ध्रुवावर नव्हे, कारण दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅण्डिंग करणे अतिशय कठीण आहे आणि हे कठीण आव्हान भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने स्वीकारले होते. नवनवीन माहिती प्राप्त झाली पाहिजे, हा इस्रोचा प्रामाणिक उद्देश होता. भारताने कठीण लक्ष्य स्वीकारल्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रमोहिमेकडे लागले होते, हेही सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भारताने अतिशय कठीण लक्ष्य निर्धारित केले होते, त्या लक्ष्याच्या जवळ आपण पोहोचलो होतो. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 7 सप्टेंबरच्या पहाटे जरी आपण यशस्वी झालो नसलो तरी अजूनही नाउमेद झालेलो नाही, ही फार मोठी उपलब्धी मानली पाहिजे. विक्रमशी संपर्क करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू आहे आणि त्यात यश मिळण्याची शक्यता ही 60 टक्के आहे. जे आजवर कुणीही केले नव्हते, ते करण्याचा प्रयत्न भारताने केला. दक्षिण ध्रुवावरच्या दगडी आणि टणक पृष्ठभागावर यान उतरविणे आव्हानात्मक होते आणि ते आव्हान पेलण्याचे धाडस भारतीय शास्त्रज्ञांनी दाखविले, याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे!