व्याख्येच्या चिमटीत पकडता न येणारे फडणवीस!

    दिनांक :11-Sep-2019
यथार्थ 
श्याम पेठकर  
 
फेसबुकादी समाजमाध्यमांची सवंगपणे हेटाळणीच होत असते. अर्थात, त्यात चुकीचं असं काहीच नाही. या माध्यमांवर अत्यंत आक्रस्ताळेपणानं (आवेशानं चाललं असतं, त्यात विवेक असतो) प्रत्येक जण अंतिम सत्य मांडत असतो. अगदी प्रेषिताच्या पातळीवरचे सगळेच विचारवंत वाटतात. त्यामुळे या माध्यमांत जे काय व्यक्त होतं ते टोकाचं असतं... तरीही काही प्रमाणात गांभीर्याने घ्यावे, असे काही समाजमाध्यमांवर ‘पोस्टत’ असतात काही लोक. राजकारणाच्या शुद्धतेसाठी सज्जनांनीही राजकारणात यावे, असे आवाहन काही वर्षांपूर्वी केले जात होते. श्रीकांत भारतीय विद्यार्थी परिषदेतून भारतीय जनता पार्टीत पूर्णवेळ म्हणून गेल्यावरच्या काळात युवा मोर्चात ‘जाईन पॉलिटिक्स अॅज अ मिशन’ अशी एक चळवळ राबविली गेली होती. त्या वेळी त्याची भाषणे जोरकस असायची.
 
श्रीकांत वक्ता चांगलाच आहे... अर्थात सांगायचे हे नाहीच, हे असे होते, गाडी अशी भरकटते. तर सांगायचे हे की, आता समाजमाध्यमांवरही गंभीर असे आणि संतुलित असे चिंतन व्हावे, यासाठी अत्यंत आग्रही, सातत्याने काही लोक त्यांचे विचार मांडत असतात. ही मंडळी कबीरपंथीच आहेत. इकडची नाहीत अन्‌ तिकडचीही नाहीत. त्यांची एक पोस्ट वाचाताना ते डावे वाटतात अन्‌ दुसरी वाचताना उजवे वाटू लागतात... गेल्या आठवड्यात, मराठीतले आघाडीचे कथाकार आणि वाङ्‌मयचळवळे लेखक राजन खान यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मजकूर फेसबुकच्या भिंतीवर डकवला होता. त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या. एकतर सामाजिक आणि वाङ्‌मयीन चिंतने मांडणार्‍याने एकदम राजकीय भाष्य करावे अन्‌ त्यातही ते व्यक्तिनिष्ठ वाटावे असे असावे, यावरून बोरूबहाद्दरांच्या जगात खासच अशा प्रतिक्रिया उमटल्यात. 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यक्ती आणि राजकारणी नेता म्हणून समकालीन राजकारणाच्या पृष्ठभूमीवर केलेल्या, राजन खान यांच्या समीक्षेची समीक्षा करण्याचे काही कारण नाही. मतदार ती करतीलच आणि मत नोंदवतील. मात्र, एका दांडग्या कथालेखकाने, कादंबरीकाराने नायक म्हणून, महत्त्वाचे पात्र म्हणून त्यांच्याकडे बघावे/तसे त्यांना वाटावे, यातला काव्यात्म भाव काळजाला सृजनस्पर्श करून गेला. गेल्या काही वर्षांत (दशकांतच) राजकीय कथा, कादंबरी लिहिली गेली नाही. राजकारण हा शिष्टांसाठी अस्पृश्य आणि असभ्यांचा प्रांत, अशीच काहीशी विचारधारा निर्माण झाली असल्याने आणि त्यामुळे राजकारणावर काय लिहायचे असे वाटले असावे, पण लिहिले गेले नाही, हे खरेच आहे. या पृष्ठभूमीवर राजन खान यांच्यासारख्या नेमकेपणाने लिहिणार्‍या लेखकाला एखाद्या लोकनायकाकडे त्या अर्थाने बघावेसे वाटणे आणि सुरुवात म्हणून व्यक्त व्हावेसे वाटणे, हे राजकारणाच्या बदलत्या पोताचे आणि समकालीन राजकीय नायकांचे यश आहे, असे वाटते.
 
 
खान यांनी अत्यंत नेटकेपणाने अन्‌ तटस्थपणे देवेंद्र फडणवीस मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे खरेच आहे की, देवेंद्र फडणवीस हे आजच्या राजकारणात सहज मिसळून म्हणण्यापेक्षा विरघळून गेले आहेत. वेगळे असे दिसत नाहीत, पण तरीही ते जाणवतात. एखादा पदार्थ विलीन होतो, पार्थिव रूपात तो दिसत नाही तरीही त्याची चव, गंध, रंग मात्र ज्यात तो विरघळला त्याला आलेले असते. फडणवीसांचे तसेच झालेले आहे. एकतर सलग पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असे बहुतांश लोकांना वाटत नव्हते. त्याची खूपसारी कारणे होती. राजन खान म्हणतात तसे, ‘पूर्वीच्या सत्तेचा अजीबात अनुभव नाही, पदावर बसेपर्यंत भोवती सगळी दिग्गज, बेरकी राजकारण्यांची गर्दी, राजकारणातला जातवाद, राज्यातल्या विविध अस्मितांचे अहंकार, राज्याचे नेहमीचेच प्रश्न आणि आतले-बाहेरचे मात करू पाहणारे पुढारी, पक्षश्रेष्ठींचे कल आणि लहरी, या सगळ्या दबावात हा माणूस पाच वर्षं या पदावर टिकून राहिला, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे...’
 
 
हे खरेच आहे की, या आधीच्या युतीच्या सरकारपासून 2014 पर्यंत एकही मुख्यमंत्री पाच वर्षे सलगपणे पदावर राहिलेला नाही. अर्थात, सलग पाच वर्षे पदावर राहणे, हेच काही एखाद्या लेखकाच्या प्रतिभेला स्पर्श करण्यास कारण ठरत नाही. फडणवीसांनी चौकटी टाळल्या. परंपरागत राजकारणाची जी काय शैली आहे अन्‌ महाराष्ट्रात रांगड्या, बेरकी शैलीचे जे काय राजकारण आहे, असल्या कुठल्याच चौकटीत फडणवीस अडकले नाहीत. प्रतिमेच्या मोहात भलेभले पडतात, पण फडणवीस पडले नाहीत. प्रतिभावंतांना तर प्रतिमेचा मोह होतोच आणि फडणवीस हे प्रतिभावंत आहेत, तरीही त्यांनी तो मोह अत्यंत योजक नजाकतीने टाळला. आपल्या शैलीने ते वावरत राहिले. अत्यंत सायलेंटली म्हणता येईल तसे वाटचाल करत राहिले आणि आता राजकारणाची एक वेगळी शैली त्यांनी प्रस्थापित केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आता कालपर्यंत हा कनिष्ठ वाटणारा नेता आज राज्याचा सर्वात ज्येष्ठ नेता वाटू लागलाय्‌. भल्याभल्या दिग्गजांना त्यांनी पाणी पाजलंय्‌ अन्‌ तरीही त्याचा अभिनिवेश नाही, आवेश नाही, विजयाच्या आरोळ्या नाही, युद्धाच्या रणदुदुंभीही वाजविल्या नाहीत. विश्वनाथन्‌ आनंद बुद्धिबळाच्या पटावर जसा अत्यंत शांत असतो आणि म्हणूनच तितकाच खोलही असतो अन्‌ सहजपणे एखादी गोटी समोर करून चेकमेट करत असतो, तसेच काहीसे फडणवीसांच्या बाबत जाणवत राहिले. म्हणजे एकीकडे मित्रपक्ष शिवसेनेला हाताळत त्यांनी पवारांना पॉवरलेस केले. आरक्षणासारखी नाजूक सामाजिक समस्या, दुष्काळासारखे प्रश्न आणि मग शेती-मातीच्या नेहमीच्याच समस्यांशी दोन हात करत त्यांनी सक्षम, जाणता विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची निर्माण झालेली प्रतिमा सत्तेत विलीन करून टाकली. अगदी कुणालाच आणि कुठेच टणकपणे हाताला न लागता, कुणालाही न बोचता आपले असणे त्यांनी सिद्ध केले आहे. इतक्या वेगळ्या शैलीत वावरत असतानाही खान म्हणतात तसे, ‘एकाच वेळी राजकारणाच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या सगळ्या आघाड्यांवर त्याच्याच नख्या मजबूत रोवलेल्या आहेत, असं ते जास्तच विचित्र आहे.’
 
 
राजन खान हे सुरुवातीच्या काळात पत्रकार होते. अगदी प्रारंभी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावाच्या काळात शिवसैनिकही असल्याचे आठवते. ते बारामतीचे आहेत आणि पवारशरण नाहीत. त्यांना राजकीय मतं आहेत, पण ते कुणाचेच समर्थक नाहीत. ‘अक्षरमानव’ ही चळवळ ते चालवितात. त्यात अक्षर आहे आणि मानवही आहे, यावरून त्यात सगळे आले. 2009 च्या निवडणुकीच्या आधी त्यांनी पुण्यात राज्यातील युवा आणि ज्यांच्याकडून आशा ठेवता येईल, राजकारणाला काही वेगळे वळण जी मंडळी देऊ शकतील, अशांच्या प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम ठेवला होता. राज ठाकरे, सुप्रिया सुळे ही नावे त्यांची होती. विदर्भातून िंकवा एकुणातच राजकारणातून आणखी कुठली नावे असली पाहिजेत, अशी विचारणा त्यांनी केली होती. त्या वेळी अर्थातच ‘देवेंद्रभाऊ’ आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे नाव समोर आले. त्यांनी ती दोन्ही नावे नक्की केली आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत तुम्हीच घ्या, असे मला सांगितले. त्या वेळी ती मुलाखत घेताना, मी, महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतो आहे, असे अजीबात वाटले नव्हते.
 
 
मात्र राजन खान यांनी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि फडणवीस यांच्यापैकी कुणीतरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आहे, असे भाकीत केले होते. देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्या मुलाखतीसाठी सुचविताना मी म्हणालो होतो की, राज्यात जनतेत आंदोलन करून आणि विधिमंडळातही अत्यंत अभ्यासूपणे प्रश्न मांडून एखादी समस्या सोडविण्याची ताकद, जाण आणि अभ्यास असलेला शरद पवारांनंतर कुणी नेता आता असेल तर तो देवेंद्र फडणवीसच आहे! कुठल्या समस्येवर आणि केव्हा आंदोलन उभे करायचे आणि ते कुठवर ताणायचे, हे जसे त्यांना कळते तसेच अॅक्रॉस दी टेबल बातचीत करून नेमकेपणाने प्रश्न मांडण्याचा अभ्यासही फडणवीसांचा आहे. सभागृह आणि मैदान या दोन्ही पातळ्यांवर अत्यंत सक्षम असलेला दुसरा नेता नाही, असे मी त्या वेळी म्हणालो होतो. तरीही राज्याचा प्रमुख म्हणून सक्षम असणे आणि सहज असणे, यात फरक आहे. आक्रमक असणे आणि शांत-कणखर असणे, यातही फरक आहे... इतके सगळे असूनही कुठल्या व्याख्येच्या चिमटीत पकडता न येणे, हे फडणवीसांचे यश आहे. त्यांच्या राजकारणाच्या शैलीची यथोचित स्थापना या पाच वर्षांत झाली आहे अन्‌ तरीही त्याची व्याख्या करण्याइतके त्याचे आकलन कुणालाच झाले नाही म्हणून गूढ कायम आहे, उत्सुकता वाढती आहे अन्‌ म्हणूनच कारकीर्द दीर्घ आहे, हवीहवीदेखील आहे!