हा डबिंग आर्टिस्ट देतो बिग बॉसला आवाज

    दिनांक :11-Sep-2019
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी दबंग सलमान खान पुन्हा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण छोट्या पडद्यावरील रिॲलिटी शो बिग बॉस-१3 या लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आता सारेच उत्सुक असून यंदा कोणते चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद अशा अनेक घडामोडी पाहणे रसिकांना आवडते. या कार्यक्रमातील सगळ्याच सिझनचे स्पर्धक, सूत्रसंचालक सलमान खान यांना प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे. पण त्याचसोबत या कार्यक्रमातील आणखी एक गोष्ट प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात असते. ते म्हणजे बिग बॉस चाहते है... हा आवाज...

बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षक या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. हा आवाज कोणाचा आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच अतुल कुमार यांचा आवाज या कार्यक्रमाला लाभलेला आहे. त्यांच्या या आवाजामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
अतुल कुमार हे अनेक वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतात. ते 2002 ला या क्षेत्रात आले. या क्षेत्रात प्रस्थापित व्हायच्याआधी त्यांनी काही छोट्या-मोठ्या नोकऱ्या देखील केल्या आहेत. सोनी टिव्हीने त्यांना 2003 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. मोना सिंगची जस्सी जैसी कोई नही ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेच्या काही प्रोमोमध्ये अतुलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. त्यांनी आजवर अनेक पाश्चिमात्य देशातील मालिका, चित्रपटांना हिंदी भाषेत डब केले आहे.
या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानने नुकताच एक प्रोमो शूट केला आहे ज्यात तो स्टेशन मास्टराच्या वेशात आहे आणि नवीन सीझनची घोषणा करत आहे. केबिनमध्ये बसलेल्या रेल्वेच्या हादऱ्यांनी हलणारा सलमान नवीन सीझनची संकल्पना आणि अपेक्षेप्रमाणे तो वेगवान शो कसा बनणार आहे हे स्पष्ट करताना दिसत आहे. स्टेशन मास्टरचा वेश आणि टोपी परिधान करून सलमानने प्रोमो मध्ये स्वतःचा तडका घातला आहे त्यामुळे तो गंमतीदार बनला आहे.