बँकांमधील पैशांची लूट सुरूच ;पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींची फसवणूक

    दिनांक :11-Sep-2019
नवी दिल्ली,
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सार्वजनिक बँकांमध्ये फसवणुकीच्या 2,480 घटना घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनांमध्ये बँकांना तब्बल 32 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारातील (आरटीआय) एका अर्जाला उत्तर देताना सांगितले.
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल करून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या बँक फसवणुकीच्या घटनांची आकडेवारी मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच ऑगस्टपर्यंतच्या चार महिन्यांच्या कालावधीत 18 सार्वजनिक बँकांमध्ये तब्बल फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये बँकांचे एकूण 31,898.63 कोटी रुपये बुडाले आहेत. गौड यांनी बँकांना झालेल्या नुकसानाचे प्रमाणही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नुकसानीच्या प्रमाणाची माहिती उपलब्ध नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
 

 
 
या घटनांमध्ये सर्वाधिक फसवणूक भारतीय स्टेट बँकेची झालेली आहे. या बँकेच्या एकूण कर्जांपैकी 38 टक्के पैसे बुडाले आहेत. केवळ स्टेट बँकेतच 1,197 फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये या बँकेला 12,012.77 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर अलाहाबाद बँकेमध्ये 381 फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली असून, या बँकेने 2,855.66 कोटी रुपये गमावले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) देखील 2,526.55 कोटी रुपयांना चुना लागला आहे. बँक ऑफ बडोदाला 75 प्रकरणांमध्ये 2,297.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये फसवणुकीच्या 45 घटना समोर आल्या असून, यामध्ये बँकेला 2,113 कोटी रुपये गमवावे लागले आहेत.
याशिवाय कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांसह जवळपास सर्वच सरकारी बँकांना चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे.