भूमिपूजन स्थळी नागरिकांचा राडा; आमदार साहेबांचे हाताची घडी तोंडावर बोट

    दिनांक :11-Sep-2019
दर्यापूर, 
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खड्ड्यात परावर्तित झालेल्या राम मंदिर रस्त्यावर तोकडा निधी टाकल्याने दर्यापुरकर नाराज होते. त्यावर वाढीव निधी देण्याचे पत्र आमदार बुंदीले यांनी दिले होते. आचारसंहिता लागेल म्हणून भूमीपूजनाचा सपाटा सत्ताधारी पक्षाने लावला. हा रस्त्या वाढवून सुयोग्य करावा या मागणीसाठी जमलेल्या नागरिकांचे ऐकून न घेता भूमिपूजन केल्याने संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींना खरीखोटी सुनावत मंगळवारी सांयकाळी राडा केला. 

 
 
दर्यापुरातील अतिशय रहदारीचा असलेला राम मंदिर रस्ता केवळ 3 मीटर रुंदीचा करीत आजूबाजूची जागा सुटली असल्याने तो वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी उपस्थित आमदार रमेश बुंदीले व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना याबाबत अवगत केले. यासह गणेश विसर्जनसाठी डीजेची संमती मिळवून द्यावी याकरिता आर्जव ही केले. मात्र लोकांचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेता उपस्थितांनी टोलवाटोलवी केली. यावर नागरिकांनी आमचे म्हणणे ऐकावे असा आग्रह धरला. त्यामुळे आमदार भारसाकळे यांनी संतप्त होत उत्तरे दिल्याने उपस्थित नागरिक अवाक झाले. दर्यापूरच्या आमदारांना बोलू द्या असा सूर निघाल्याने आमदार भारसाकळे आणखी संतप्त झाले. माझ्या विकासकामात कुणी बोलू नये, पोलिस संरक्षणात काम करू, हे काम असेच होईल, असा दम भरल्याने नागरिक संतप्त झाले. त्यातील काहींनी तर आमदार बच्चू कडू जिंदाबादचे नारे लावल्याने अखेर घाई गडबडीत भुमिपूजन आटोपते घ्यावे लागले.
 
 
विशेष म्हणजे मागील आठवड्यात या रस्त्याची दखल घेत काम सुरु केल्याबद्दल नागरिकांनी आमदार बुंदीले यांचे कौतुक करीत पुष्पगुच्छ देत सन्मान केला होता. त्यावेळी आमदार बुंदीले यांनी लोकांच्या रास्त मागणीवर बांधकाम विभागाला पत्र देत रस्त्यासाठी वाढीव तरतूद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आनंदीत झालेल्या नागरिकांनी भूमिपूजनाला मोठी उपस्थिती लावली होती. मात्र पुन्हा जैसे थेच स्थिती राहणार असल्याचे कळताच नागरिकांनी मागणी रेटून धरली होती. आमदार भारसाकळे यांनी संबध नसताना मागणी धुडकावल्याने नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. विशेष म्हणजे हे सर्व सुरु असताना आमदार बुंदीले शांत होते. नागरिकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.