पाकिस्तानात दूध पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही महाग

    दिनांक :11-Sep-2019
पाकिस्तानात दुधाच्या किंमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोल आणि डिझेललाही मागे टाकलं आहे. मंगळवारी मोहरमच्या दिवशी पाकिस्तानात दुधाचा दर पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही जास्त होता. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, दुधाचा भाव १४० रुपये (पाकिस्तानी चलन) प्रतिलिटर झाला होता. कराचीमधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असल्याने हे दर वाढले होते. मात्र या तुलनेत दुसरीकडे पेट्रोलचा दर ११३ रुपये तर डिझेलचा दर ९१ रुपये प्रतिलीटर होता.
 
 
 
सरकारने दुधाची किंमत ठरवली असून अधिकृतरित्या ९४ रुपये प्रतिलीटर विक्री होते. तर दुकानदारांसाठी ही किंमत ११० रुपये ठरवण्यात आली आहे. मात्र तरीही काही दुकानदार १४० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री करत आहेत.
मोहरमदरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागात स्टॉल्स लावण्यात आले होते. या ठिकाणी दूध, ज्यूस तसंच थंड पाण्याचं वाटप केलं जात होतं. यामुळे दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मर्यादित दूध उपलब्ध असल्याचं सांगत काही व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून दुधाचा तुटवडा निर्माण केला. ज्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ झाली असंही सांगण्यात आलं आहे. याप्रकऱणी १३ सप्टेंबर रोजी भागधारकांची बैठक बोलावण्यात आली आहे.