चंद्राबाबू नायडूंसह मुलगा नजरकैदेत

    दिनांक :11-Sep-2019
- TDP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
वायएसआर काँग्रेस विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी जगन रेड्डी सरकारविरोधात ‘चलो आत्मकूर’ आंदोलनांची हाक दिली होती. बुधवारी होणाऱ्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा नारा लोकेश यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

 
 
वायएसआर काँग्रेस विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. त्याविरोधात चंद्राबाबू यांनी ‘चलो आत्मकूर’ आंदोलनाची हाक दिली होती. पलांडू विभागातील गुंटूर येथील पक्ष कार्यालयापासून ते आत्माकूरपर्यंत बुधवारी रॅली काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी चंद्राबाबू नायडूसह त्यांचा मुलगा नारा लोकेश याला ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे. दोघांनाही त्यांच्याच घरात ठेवण्यात आले आहे.
 
रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टीडीपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. टीडीपीचे नेते भूमा अखिला प्रिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, विजयवाडातील नोवोटेल हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर नंदीगामा शहरात आंदोलन करणाऱ्या टीडीपीचे माजी आमदार तंगिराला सोमया यांच्यासह कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले असून, सोमया यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, नजरकैदेत ठेवल्यानंतर काही वेळाने चंद्राबाबू नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मानवी हक्क आणि मूलभूत अधिकारांचा हे सरकार भंग करत आहे. मी या सरकारला आणि पोलिसांना इशारा देतो की, अशा प्रकारचे राजकारण करू शकत नाही. आम्हाला अटक करून तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. ज्यावेळी माझी सुटका होईल, तेव्हा मी पुन्हा ‘चलो आत्मकूर’ आंदोलन सुरू करेल” असा इशारा चंद्राबाबू यांनी जगन नायडू सरकारला दिला आहे.