पूर ओसरु लागला, पुलाचे मात्र नुकसान

    दिनांक :11-Sep-2019
भंडारा, 
दोन दिवसांपासून जिल्हयात असलेली पुरपरिस्थिती आता ओसरू लागली असली तरी गोसेखूर्द धरणाच्या पाण्यामुळे अजूनही काही ठिकाणी नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. कारधा येथील वैनगंगेच्या जून्या पूलावर चढलेले पाणी आता खाली गेली आहे. मात्र या पूरामुळे पुलाचे चांगलेच नुकसान झाल्याचे समजते. 
 
 
मध्यप्रदेशातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्हयात मागील दोन दिवसांपासून पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. वैनगंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरुन वहात होत्या. नद्यांची पातळी वाढल्याने जिल्हयातील अनेक नाल्यांना पूर आला व मार्ग बंद झाले. ग्रामीण भागाला शहराशी जोडणारे रस्ते बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनीत पाणी साचले होते. आज तिसऱ्या दिवशीही या कॉलनीतील पाणी कायम आहे.
 
 
वैनगंगेची पाण्याची पातळी कमी झाली असली तरी धोक्याच्या पातळी खाली आलेली नाही. पाण्याखाली गेलेला वैनगंगेवरील पूल आज दिसू लागला. मात्र पुरात या पलाचे नुकसान झाले आहे. सहसा पूर येण्याची शक्यता लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापनाकडून पूलाचे कठडे काढून ठेवले जातात. मात्र यावेळी ते करण्यात न आल्याने प्रचंड प्रमाणात कचरा, झाडांचे ओंडके या कठड्यांना अडकले व कठड्यांचे नुकसान केले. अनेक लोखंडी कठडे तुडून पडल्याचे समजते. पूलावर खड्डे पडले आहेत.
 
 
आज बुधवारी जिल्हयातील काही मार्ग सुरु झाले. पाण्याखाली गेलेली शेती मात्र अजूनही पाण्याखालीच असल्याचे समजते. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान होणार, हे तेवढेच खरे! वैनगंगेचे पाणी कमी झाले असले तरी गोसेखूर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणाच्या वरच्या भागात पुरपरिस्थिती कायम आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील नाले अजूनही फुगले आहेत.