झारखंडचा कौल पुन्हा भाजपालाच!

    दिनांक :12-Sep-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार
 
महाराष्ट्र आणि हरयाणासोबत यावेळी झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होत आहे. या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा या आठवड्यात होऊ शकते. निवडणुकांची घोषणा झाली नसली, तरी झारखंडमध्ये निवडणुकांच्या हालचालींना आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे.
 
 
2014 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजय मिळवला होता. झारखंड हे नक्षलप्रभावित राज्य असल्यामुळे 81 जागांसाठी 25 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत 5 टप्प्यांत राज्यात विधानसभा निवडणूक झाली होती. 23 डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी पार पडून निकाल लागले होते. 81 सदस्यीय झारखंड विधानसभेची निवडणूक भाजपाने, आपला मित्रपक्ष झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करत लढवली होती. राज्यात भाजपाने 37 जागा िंजकल्या होत्या. झारखंड विद्यार्थी संघटनेला पाच जागा मिळाल्या होत्या. भाजपा आघाडीचे संख्याबळ 42 झाले होते. जे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षा एकने जास्त होते. 

 
 
हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने 19, तर बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)ने आठ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त सात जागांवर समाधान मानावे लागले होते. बसपा आणि अन्य छोट्या पक्षांना प्रत्येकी एकप्रमाणे पाच जागा मिळाल्या होत्या.
 
 
रघुवरदास यांच्या नेतृत्वात भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले. सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्यातच झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)च्या आठपैकी सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाने स्वबळावर बहुमताचा 43 चा आकडा गाठला व आघाडीचे संख्याबळ 48 झाले.
 
 
2009 च्या तुलनेत राज्याला प्रथमच स्थिर आणि सक्षम सरकार मिळाले. 2009 च्या निवडणुकीत भाजपा आणि जदयु यांच्या आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. यावेळी राज्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपा आणि जदयु आघाडीला फक्त 20 जागा मिळाल्या, यात भाजपाच्या 18 तर जदयुच्या दोन जागांचा समावेश होता. भाजपाएवढ्याच 18 जागा झारखंड मुक्ती मोर्चालाही मिळाल्या. काँग्रेसला 14, तर झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)ला 11 जागांवर समाधान मानावे लागले. अखिल झारखंड विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय जनता दलाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. काँग्रेस आणि झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. या आघाडीचे संख्याबळ 25 झाले होते. पण, ते सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे नव्हते.
 
 
भाजपाने झारखंड मुक्ती मोर्चा तसेच अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. भाजपाच्या पाठिंब्याने झामुमोचे शिबु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र त्यांचे सरकार फार काळ टिकू शकले नाही. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. नंतर, भाजपाचे अर्जुन मुंडा मुख्यमंत्री झाले. मुंडा यांनी दोन वर्षे चार महिने मुख्यमंत्रिपद सांभाळले. पुन्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. यावेळी राष्ट्रपती राजवट पाच महिन्यांसाठी होती. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर झामुमोचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. जवळपास दीड वर्षं सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यामुळे 2014 मध्ये भाजपाला मिळालेले यश लक्षणीय होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपाचे रघुवरदास राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री होते!
 
 
2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, झारखंडसोबत छत्तीसगड आणि उत्तराखंड या तीन नव्या राज्यांची निर्मिती झाली होती. मात्र, निर्मितीपासूनच आतापर्यंत एकदाही काँग्रेसला झारखंडमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआची सत्ता असतानाही काँग्रेसला राज्यात फारसे यश कधी मिळाले नाही. झारखंडच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच दुय्यम भूमिका पत्करावी लागली.
 
 
2000 मध्ये राज्यात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बाबुलाल मरांडी मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ दोन वर्षे चार महिन्यांचा होता. मरांडी यांच्यानंतर भाजपाचेच अर्जुन मुंडा राज्याचे मुख्यमंत्री झाले. एक वर्ष 11 महिने त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. यांच्यानंतर 2005 मध्ये राज्यात झालेल्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे झामुमोचे शिबु सोरेन मुख्यमंत्री झाले. पण, विधानसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे 10 दिवसांतच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे अर्जुन मुंडा दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी दीड वर्षं मुख्यमंत्रिपद सांभाळले. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मुंडा यांनी राजीनामा दिल्यानंतर मधू कोडा राज्याचे मुख्यमंत्री झाले. कसेतरी त्यांनी एक वर्ष 11 महिने मुख्यमंत्रिपद सांभाळले. पुन्हा झामुमोचे शिबु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतले. पण, यावेळी त्यांना जवळपास पाच महिनेच मुख्यमंत्री राहता आले. राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लावावी लागली.
 
 
2009 मध्ये राज्यात झालेल्या तिसर्‍या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कोणत्याच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. त्यामुळे झामुमोचे शिबु सोरेन तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळीही मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ अल्पजीवी म्हणजे पाच महिन्यांचा ठरला. पुन्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली.
यानंतर भाजपाचे अर्जुन मुंडा तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाचा मुंडा यांचा कार्यकाळ दोन वर्षे चार महिन्यांचा होता. पुन्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. जवळपास सहा महिन्यांच्या राष्ट्रपती राजवटीनंतर झामुमोचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. जवळपास दीड वर्षं सोरेन मुख्यमंत्री होते.
 
 
झामुमोचे शिबु सोरेन आणि भाजपाचे अर्जुन मुंडा यांनी प्रत्येकी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तीन कार्यकाळ पकडूनही शिबु सोरेन यांना फक्त दहा महिनेच मुख्यमंत्रिपद भूषवता आले; तर अर्जुन मुंडा यांचा तीन कार्यकाळातील मुख्यमंत्रिपदाचा कालावधी पाच वर्षे दहा महिन्यांचा होता. म्हणजे आतापर्यंत तरी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम मुंडा यांच्या नावाने आहे.
 
 
बाबुलाल मरांडी, मधू कोडा आणि हेमंत सोरेन यांना एकेकदाच राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवता आले. यात मरांडी दोन वर्षे चार महिने, मधू कोडा एक वर्ष 11 महिने, तर हेमंत सोरेन एक वर्ष पाच महिने मुख्यमंत्री होते. रघुवरदास यांनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळत राज्याला प्रथमच स्थिर आणि सक्षम सरकार दिले. दुसर्‍या आणि तिसर्‍या विधानसभेत राज्यात अनेकवेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली, मात्र चौथ्या विधानसभेत म्हणजे रघुवरदास मुख्यमंत्री असताना राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागली नाही.
 
 
झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे. त्यामुळे आतापर्यंतचे झारखंडचे सर्व मुख्यमंत्री आदिवासी समाजाचे होते. रघुवरदास हे पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत, जे गैरआदिवासी आहेत. यावेळची विधानसभा निवडणूक भाजपा, मुख्यमंत्री रघुवरदास यांच्या नेतृत्वात लढवणार आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा अर्जुन मुंडा यांचा विक्रम मोेडण्याची संधी रघुवरदास यांना मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 14 पैकी 12 जागा पटकावून सर्व विरोधकांना चारोखाने चित केले होते.
 
 
नव्याने बांधण्यात आलेल्या झारखंड विधानसभेचे तसेच किसान मानधन योजना, किरकोळ व्यापार्‍यांसाठी असलेल्या निवृत्तिवेतन योजनेचा तसेच एकलव्य मॉडेल योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडची राजधानी रांचीत होत आहे. यानिमित्ताने भाजपा आपल्या निवडणूक प्रचाराचाही शुभारंभ करणार आहे.
 
 
राज्यात काँग्रेसचे अस्तित्व उरले नाही आणि झामुमोची ताकद आता पहिल्यासारखी राहिली नाही. त्यामुळे स्थिर आणि सक्षम सरकारसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी जनतेचा कौल भाजपा आणि विद्यमान मुख्यमंत्री रघुवरदास यांनाच राहणार, यात शंका नाही!
 
 
9881717817