पर्यावरणपूरक गणेशविसर्जन

    दिनांक :12-Sep-2019
मीरा टोळे 
 
ठरल्याप्रमाणे तिथीनुसार गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. रोज बाप्पासमोर मनोभावे आरती, प्रसादाची धावपळ हे सगळं अगदी उत्साहाने भाविकांनी केले. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्याची वेळ केव्हा येऊन ठेपली हे कळतच नाही. जड अंतःकरणाने ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करीत बाप्पाला निरोप दिला जातो. 

 
 
बाप्पाला निरोप देण्याकरिता प्रत्येक जण जशी तयारी करतो तसेच प्रशासनही सज्ज असते. निसर्गाची हानी न होता, विसर्जन कसे योग्य पद्धतीने करता येईल याबाबत वेळोवेळी विचार करून प्रशासनाने यात पुढाकार घेतला आहे. गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर तलावाचे किंवा नदीचे पाणी खराब होऊ नये, याकरिता प्रशासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्थांनीही या कार्याला हातभार लावला आहे.
 
 
बाप्पाला घरी आणण्यापासून तर विसर्जनापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. विसर्जनही उत्साहात होते. परंतु, विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी मात्र नदी असो, तलाव असो की समुद्र, सर्वत्र फार भयाण स्थिती असते. आधल्या दिवशी विसर्जित केलेल्या मूर्ती अक्षरशः अर्धवट विरलेल्या अवस्थेत बाहेर पडलेल्या असतात. ते भग्नावशेष बघून मन खिन्न होते. इतक्या श्रद्धेने, भक्तीने दहा दिवस आपण ज्याची आराधना करतो, त्याची अशी अवस्था अजीबात बघवत नाही. यावर आपणच उपाय शोधायला हवा. मूर्ती मातीची असल्यास तिचे विसर्जन नीट होते. परंतु, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मात्र पाण्यात विरघळत नसल्याने त्याचे अवशेष तसेच राहतात. तसेच मूर्तींकरिता वापरण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे जलसाठे दूषित होतात. या वर्षीच्या उन्हाळ्यातील पाण्याचे चटके सर्वांनीच अनुभवले आहेत. त्यामुळे महत्‌प्रयासाने साठवलेले पाणी शुद्ध ठेवणे आपलीही जबाबदारी आहे. गणेशविसर्जनाच्या दिवशी प्रशासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्थाही पर्यावरणरक्षणाच्या कार्यात सहभागी होतात. विसर्जनाच्या वेळी जमा होणारे निर्माल्य ही देखील एक मोठी समस्या आहे. याचे योग्यप्रकारे संकलन झाल्यास त्यापासून खतनिर्मिती केली जाते.
 
 
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी बादलीत किंवा टपात करून आपण पर्यावरणरक्षणात आपले योगदान देऊ शकतो. जलसाठ्यांजवळ तयार केलेल्या कृत्रिम टाक्यात विसर्जन करायचे असेल, तर आपल्याकडून पर्यावरणाला कुठलाही धोका होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. आज आपण जे काही वाचविण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आपल्या भावी पिढीकरिता साहाय्यभूत ठरणार आहे. तेव्हा सर्व मिळून पर्यावरणपूरक गणेशविसर्जनाचा संकल्प करू या!